WFTW Body: 

आमच्या सीएफसी मंडळ्यांमध्ये, आम्ही मेल्यानंतर स्वर्गात कसे जायचे यावर उपदेश करत नाही. येशूने आम्हाला प्रत्येक राष्ट्रात जाऊन शिष्य बनवण्यास सांगितले आहे – आणि त्याने आज्ञा केलेल्या सर्व गोष्टी त्यांना शिकवण्यास सांगितले आहे – नरकातून कसे सुटायचे आणि स्वर्गात कसे जायचे हे सांगण्यास नाही सांगितले !! पण, दुर्दैवाने, आज सुवार्तेच्या उपदेशाच्या बऱ्याच भागात मेल्यानंतर स्वर्गात कसे जायचे यावरच अधिक भर दिला जातो. मी ती सुवार्ता सांगत नाही कारण मला लोकांना स्वर्गात नेण्यात रस नाही. ते देवाचे काम आहे. मी या पृथ्वीवर येशू ख्रिस्तासाठी शिष्य बनवण्याचा प्रयत्न करतो आणि मग येशूने आज्ञा केलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायला त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. हीच आज्ञा प्रभूने आम्हाला मत्तय २८:१८-२० मध्ये अगदी स्पष्टपणे दिली आहे. आणि गेल्या ५० वर्षांपासून, जगाच्या अनेक भागांतील आमच्या सीएफसी मंडळ्यांमध्ये आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.

माझी सुवार्ता ही आहे की या पृथ्वीवर येशू ख्रिस्ताचे शिष्य कसे बनावे आणि दररोज त्याचे अनुसरण कसे करावे. येशूने म्हटले आहे की जीवनाकडे नेणारा एक लहान दरवाजा आणि एक अरुंद मार्ग आहे (मत्तय ७:१४). आपण आपल्या पापांचा पश्चात्ताप करून आणि ख्रिस्ताच्या मृत्यूवर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्या अरुंद दरवाज्यातून प्रवेश करू शकतो. मग आपला वधस्तंभ उचलून, दररोज स्वतःसाठी मरण पावून, आपल्या जीवनात ख्रिस्ताला प्रथम स्थान देऊन आणि त्याचे अनुसरण करून त्या अरुंद मार्गावरून चालण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. हाच जीवनाचा आणि शिष्यत्वाचा मार्ग आहे, जो येशूने वरील वचनात शिकवला आहे – आणि हाच सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे जो आम्ही आमच्या सर्व मंडळ्यांमध्ये शिकवतो.

शिष्यत्वाच्या संदर्भात, येशूने लूक १४:२६ मध्ये म्हटले आहे, “जो कोणी माझ्याकडे येतो आणि आपल्या स्वतःच्या बापाचा, आईचा, पत्नीचा, मुलांचा, भावांचा, बहिणींचा आणि स्वतःच्या जीविताचा द्वेष करत नाही, तो माझा शिष्य होऊ शकत नाही.” येशूने त्या वचनात सांगितल्याप्रमाणे, आपल्या प्रियजनांचा द्वेष करण्याबद्दल कोणी उपदेश करताना तुम्ही किती वेळा ऐकले आहे? प्रभू येशूचा शिष्य होण्यासाठी ही पहिली अट आहे. आणि येशूने आपल्याला सर्वत्र शिष्य बनवण्याची आज्ञा दिली आहे – धर्मांतरण करण्याची नाही. म्हणून, जर आपल्याला शिष्य बनवायचे असतील, तर त्यांना इतर काहीही शिकवण्यापूर्वी, आपण त्यांना शिष्यत्वाची ही पहिली अट शिकवली पाहिजे.

जेव्हा एखादे मूल शाळेत जाते, तेव्हा त्याला सर्वात आधी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र शिकवले जात नाही. नाही. त्याला सर्वात आधी वर्णमाला – अबक – शिकवली जाते. त्याचप्रमाणे, जे आपल्या मंडळीत सामील होतात, त्यांना सर्वात आधी शिष्यत्वाची वर्णमाला शिकवली पाहिजे – येशूवर सर्वश्रेष्ठ प्रेम करणे. ज्यांना ही अट पूर्ण करायची नाही, त्यांना अगदी सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होऊ शकत नाहीत. आणि शिष्यांचा दुसरा अजून कोणताही दर्जा नाही. शिष्यांचा फक्त एकच दर्जा आहे – ते जे “बाप, आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुले आणि स्वतःच्या जीविताचा द्वेष करतात” (लूक १४:२६).

येशूच्या या मागणीचा, पवित्र शास्त्रातील “आपल्या आई-वडिलांचा आदर करा”, “ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली तशी आपल्या पत्नीवर प्रीती करा” आणि आपल्या मुलांवर व आपल्या भाऊ-बहिणींवर प्रीती करा, या इतर आज्ञांशी आपण मेळ कसा घालायचा?

येशू आपल्या संदेशांमध्ये एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अनेकदा दृष्टांतांचा वापर करत असे. म्हणून, माझ्या कुटुंबातील सदस्यांवर प्रेम करा आणि त्यांचा द्वेष करा, या वरवर पाहता परस्परविरोधी वाटणाऱ्या आज्ञा समजून घेण्यासाठी मी एखादा दृष्टांत शोधू लागलो! आणि ह्या दृष्टांताने मला ते स्पष्ट केले आहे; मी माझ्या आई-वडिलांवर, पत्नीवर, मुलांवर, भावांवर आणि बहिणींवर असलेल्या माझ्या प्रेमाची तुलना ताऱ्यांच्या प्रकाशाशी करतो – जे तेजस्वी, स्वच्छ आणि ज्यात अंधाराचा लवलेशही नसतो – हे आपल्या कुटुंबातील सदस्यांवर असायला हव्या असलेल्या प्रेमाचेच एक चित्र आहे. पण सकाळी, जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा तारे अदृश्य होतात. ते तिथेच असतात, पण आपल्याला ते दिसत नाहीत. त्याचप्रमाणे, ख्रिस्तावरील माझे प्रेम सूर्याच्या प्रकाशासारखे असले पाहिजे, ज्या प्रकाशात माझ्या कुटुंबातील सदस्यांवरील माझे प्रेम नगण्य होऊन जाते. माझ्या कुटुंबातील सदस्यांवरील माझे प्रेम अजूनही कायम आहे (जसे सकाळी तारे अजूनही असतात). पण ख्रिस्तावरील माझे प्रेम इतके महान आहे की, आता इतर सर्वांवर केवळ माझ्या ख्रिस्तावरील प्रेमामुळेच प्रेम केले जाते. याचा अर्थ असा की, ख्रिस्तावरील माझे प्रेम इतके महान आहे की, मी माझ्या पत्नीला, माझ्या आई-वडिलांना किंवा माझ्या जवळच्या कोणालाही माझ्या आणि ख्रिस्ताच्या मध्ये कधीही येऊ देणार नाही. मी यापुढे इतर सर्वांवर केवळ ख्रिस्तावरील माझ्या असीम प्रेमाद्वारेच प्रेम करीन.

येशू म्हणाला, "मी माझी मंडळी उभारीन." केवळ तोच ती उभारू शकतो. आपण केवळ त्याच्या शरीराचे अवयव आहोत – एक जिभेसारखा, दुसरा हातासारखा आणि तिसरा पायासारखा आहे. आणि काही विश्वासणारे, जे फारसे प्रमुख नाहीत, ते शरीराच्या गुप्त अवयवांसारखे आहेत. पण ख्रिस्त मस्तक आहे, जो त्याचे शरीर उभारतो. आपण केवळ त्याच्या शरीराचे अवयव म्हणून स्वतःला त्याला अर्पण करू शकतो, जेणेकरून तो आपल्यावर राज्य करेल, आपल्याला नियंत्रित करेल आणि आपला उपयोग करून घेईल. हात आणि पाय स्वतःहून काहीही करू शकत नाहीत. मस्तक हाताला काय करायचे ते सांगते आणि पायांना कुठे जायचे ते सांगते. अशा प्रकारे आपण ख्रिस्ताला समर्पित व्हायचे आहे. आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचे शरीर कार्य करते आणि उभारले जाते. आणि याच गोष्टीवर आम्ही जोर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पण जेव्हा देव एखाद्याचा थोडासा उपयोग करू लागतो आणि त्याला एखाद्या ठिकाणी ख्रिस्ताचे शरीर उभारले जात असल्याचा चमत्कार दिसू लागतो, तेव्हा आध्यात्मिक गर्वाचा मोठा धोका असतो. जेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो, तेव्हा गर्व दबा धरून बसलेला असतो. आपण अशी कल्पना करू लागतो की ती स्थानिक मंडळी आपणच उभारली होती किंवा त्या लोकांना आपणच ख्रिस्ताकडे आणले होते. आणि जेव्हा देवाचा सेवक किंवा एखादी मंडळी गर्विष्ठ होते, तेव्हा देव तात्काळ त्या व्यक्तीचा आणि त्या मंडळीचा विरोध करू लागतो.

आपण सर्वजण दररोज देवाचे भय बाळगूया आणि त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याचा शोध घेऊया, जेणेकरून आपण आपल्या जीवनात देवाचा गौरव करू शकू आणि या शेवटच्या दिवसांमध्ये त्याची मंडळी उभारू शकू.