लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

या पृथ्वीवर आतापर्यंत झालेली सर्वांत मोठी लढाई जगातील कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली नाही. जेव्हा येशूने त्याच्या मृत्यूद्वारे कालवरीवर या जगाचा अधिपती सैतान याचा पराभव केला. आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू नये असे एक वचन म्हणजे इब्री लोकांस पत्र २: १४,१५. मला खात्री आहे की हे वचन आपल्याला माहित व्हावे असे सैतानाला कधीही आवडणार नाही. स्वतःच्या पराभवाबद्दल किंवा अपयशाबद्दल कोणालाही ऐकण्यास आवडत नाही आणि सैतान त्याला अपवाद नाही. हे वचन असे आहे: "ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही (येशू ) त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने (कालवरीच्या क्रुसावरच्या मरणाने) शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे."

जेव्हा येशू मरण पावला तेव्हा त्याने सैतानाला शक्तीहीन केले. का? जेणेकरून आपण सैतान आणि त्याने आपल्या आयुष्यभर आपल्यावर घातलेल्या भीतीच्या गुलामगिरी पासून आपण कायमचे मुक्त व्हावे. जगातील लोकांच्या मनात अनेक प्रकारची भये आहेत - आजारपणाची भीती, दारिद्र्याची भीती, अपयशाची भीती, लोकांची भीती, भविष्या बद्दलची भीती इत्यादी. सर्व भयांपैकी सर्वात मोठी भीती म्हणजे मृत्यूची भीती. प्रत्येक इतर भीती मृत्यूच्या भीतीपेक्षा तोकडी आहे. मृत्यूच्या भीतीचे रूपांतर मृत्यूनंतर काय होईल या भीतीत होते. बायबल अतिशय स्पष्टपणे शिकवते की जे लोक पापामध्ये राहतात ते शेवटी नरकात जातील - जे पश्चात्ताप करीत नाहीत अशा लोकांसाठी देवाने राखून ठेवलेले स्थान. सैतान सुद्धा अग्नीच्या सरोवरात अनंतकाळ घालवेल आणि त्यांच्या बरोबर ज्यांना त्याने फसविले आणि ज्यांना या पृथ्वीवर पापाकडे नेले. येशू आमच्या पापांची शिक्षा घेऊन या अनंतकाळच्या नरकापासून आपले रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर आला. त्याने आम्हांवरील सैतानाचे सामर्थ्य नष्ट केले जेणेकरून तो पुन्हा कधीही आमचे नुकसान करु नये.

आपल्या सर्वांनी हे सत्य आपल्या आयुष्यात लक्षात ठेवावे अशी माझी इच्छा आहे की सैतानाच्या विरोधात देव नेहमीच आपल्या बाजूने राहील. हे असे गौरवशाली सत्य आहे ज्याने मला इतके उत्तेजन आणि सांत्वन आणि विजय मिळवून दिला आहे की, मी सर्वत्र जाऊन जगातील प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याबद्दल सांगू इच्छितो. पवित्र शास्त्र म्हणते "म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल." (याकोबाचे पत्र ४:७). येशूचे नाव असे नाव आहे ज्यामुळे सैतान नेहमी पळून जाईल. बहुतेक ख्रिस्ती लोकांच्या मनात असलेले चित्र म्हणजे सैतान त्यांचा पाठलाग करतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. पण हे पवित्र शास्त्राच्या शिकवणुकीच्या अगदी उलट आहे. तुम्हांला काय वाटते? सैतान येशूला घाबरत होता की नाही? आपल्या सर्वांना माहित आहे की सैतान आपल्या तारणहारापुढे उभे राहण्यास घाबरला होता. येशू जगाचा प्रकाश आहे आणि त्याच्यासमोरून अंधाराच्या राजपुत्राला अदृश्य व्हावे लागले.

स्वर्गात सैतानाचे पतन कसे झाले हे येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. आणि तेथे येशू म्हणाला,“सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.(लूक १०:१८) जेव्हा देवाने त्याला टाकून दिले. जेव्हा वाळवंटात येशूने सैतानाला सांगितले, "अरे सैताना, चालता हो,” तर तो विजेच्या वेगाने येशू समोरून नाहीसा झाला. आणि आज जेव्हा आपण येशूच्या नावाने सैतानाचा प्रतिकार करतो, तेव्हा तोही प्रकाशाच्या वेगाने आपल्यापासून पळून जाईल. अंधकार प्रकाशा समोरून पळून जातो. सैतानाला येशूच्या नावाची भीती वाटते. येशू प्रभू आहे याची कोणी आठवण करून दिल्यास त्याला भीती वाटते. भूताने पछाडलेले लोक येशू ख्रिस्त प्रभू आहे याची कबुली देणार नाहीत, किंवा ते कबूल करणार नाहीत की सैतान वधस्तंभावर पराभूत झाला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात असे सामर्थ्य आहे की ते कोणतेही भूत काढून टाकेल आणि कोणत्याही भुताला आपल्यापासून पळवून लावेल - विजेच्या वेगाने. हे कधीही विसरू नका.

तुमच्या आयुष्यात कधीही, जर तुम्ही एखाद्या अडचणीत असाल किंवा तुम्हाला एखादी समस्या सोडवता येत नसेल, जेव्हा तुम्हाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल ज्यासाठी मनुष्या कडून मिळू शकेल असे कोणतेही उत्तर नाही, तर प्रभू येशूच्या नावाचा धावा करा. त्याला म्हणा, "प्रभु येशू, तू सैताना विरुद्ध माझ्या बाजूने आहेस. आता मला मदत कर". आणि मग सैताना कडे वळा आणि त्याला सांगा, “येशूच्या नावाने मी तुला विरोध करतो, सैताना”. मला सांगायचे आहे की सैतान त्वरित तुमच्या पासून पळून जाईल कारण येशूने त्याला वधस्तंभावर खिळले. जेव्हा तुम्ही देवाच्या प्रकाशात चालता आणि येशूच्या नावात त्याचा विरोध करता तेव्हा सैतान तुमच्याविरूद्ध शक्तिहीन आहे.

सैतान साहजिकच त्याच्या पराभवाबद्दल आपल्याला कळावे असे इच्छित नाही आणि म्हणूनच त्याने आपल्याला याबद्दल इतके दिवस ऐकण्यापासून रोखले आहे. म्हणूनच त्याने बहुतेक प्रचारकांना आपल्या पराभवाचा प्रचार करण्यासदेखील थांबविले आहे. प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे वधस्तंभावर सैतानाचा एकदा आणि कायमचा पराभव झाला आहे हे आपणा सर्वांना स्पष्टपणे कळले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आपल्याला पुन्हा सैतानाची भीती बाळगण्याची गरज नाही. तो तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. तो तुम्हाला इजा करु शकत नाही. तो तुम्हाला मोहात पाडेल. तो तुमच्यावर हल्ला करेल. परंतु ख्रिस्ता मध्ये देवाची कृपा आपल्याला नेहमी त्याच्यावर विजय मिळवून देईल, जर आपण स्वत:ला नम्र केले, देवाला शरण गेलो आणि नेहमीच त्याच्या प्रकाशात चालत राहिलो तर.