WFTW Body: 

येशूने आपल्याला शिकवलेल्या पहिल्या तीन विनंत्या ह्या आहेत, “तुझे नाव पवित्र मानले जावो,” “तुझे राज्य येवो,” आणि “तुझी इच्छा पूर्ण होवो.” लक्षात घ्या, या सर्व गोष्टी देवाशी संबंधित आहेत. माणूस मुळात आत्मकेंद्रित आहे . आदामपासून आपल्याला वारसाहक्काने मिळालेले जीवन स्व-केंद्रित आहे, ज्यामुळे आपण प्रामुख्याने स्वतःचाच विचार करतो आणि अनेकदा फक्त स्वतःचाच विचार करतो. मी, मला आणि माझे कुटुंब, एवढीच बहुतेक लोकांना चिंता असते. जेव्हा ते ख्रिस्ताचा स्वीकार करतात, तेव्हा ते फक्त याबद्दल विचार करतात की ख्रिस्त आता मी, मला आणि माझ्या कुटुंबाला कसा आशीर्वाद देऊ शकतो. हि ख्रिस्ती शिकवण नाही. येशू आपल्याला या स्व-केंद्रित जीवनापासून मुक्त करण्यासाठी आला आहे, जे आपल्या सर्व दुःखांचे आणि असंतोषाचे मूळ कारण आहे.

बहुतेक ख्रिस्ती लोक नेहमी आनंदित राहू शकत नाहीत याचे कारण ते स्वतःमध्येच केंद्रित आहेत. जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी चांगले घडते, तेव्हा ते आनंदित असतात ; आणि जेव्हा काही गोष्टी त्यांच्या इच्छेनुसार घडत नाहीत - जर त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही - तेव्हा त्यांचा आनंद नाहीसा होतो. का? देव अजूनही सिंहासनावर आहे, तुमच्या पापांची क्षमा अजूनही झाली आहे, सैतानाचा अजूनही पराभव झाला आहे! तुम्ही आनंद करू शकत नाही कारण तुम्हाला हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळाली नाही. येशू आपल्याला स्व-केंद्रित जीवनापासून मुक्त करण्यासाठी आला आहे, जे आपल्या सर्व समस्यांचे मूळ कारण आहे.
आपण अन्नासाठी प्रार्थना करू शकतो का? अर्थातच, आपण करू शकतो, येशूने आपल्याला मत्तय ६:११ मध्ये प्रार्थना करायला शिकवले आहे, “आमची रोजची भाकर आज आम्हास दे.” ‘रोजची भाकर’ यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि मुलांचे शिक्षण यांचा समावेश आहे, कारण त्यांना शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे आवश्यक आहे जेणेकरून ते त्यांची रोजची भाकर कमवू शकतील. या गोष्टींसाठी प्रार्थना करण्यात काहीही गैर नाही. “आमच्या पापांची क्षमा कर,” आणि “आम्हाला वाईटापासून सोडव” या देखील चांगल्या विनंत्या आहेत, परंतु आपल्याशी संबंधित या तीनही विनंत्या देवाचे नाव, देवाचे राज्य आणि देवाच्या गौरवाचा शोध घेतल्यानंतर येतात. येशू आपल्या प्राधान्यक्रमात बदल करत आहे.

प्रार्थना करण्याची योग्य पद्धत म्हणजे आपल्या विचारात देवाचे राज्य, त्याचे नाव आणि त्याची इच्छा यांना प्राधान्य देऊन प्रार्थना करणे. दुसऱ्या शब्दांत, मी माझ्या संपूर्ण जीवनशैलीत बदल केला पाहिजे, जेणेकरून आता मी देवाचे नाव, देवाचे राज्य आणि देवाच्या गौरवाच्या दृष्टीने विचार करेन. तोच खरा आत्मिक ख्रिस्ती आहे. कोणीही ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणू शकतो - अगदी पोपटही म्हणू शकतो. पण केवळ आत्मिक लोकच ही प्रार्थना मनापासून करू शकतात, कारण केवळ आत्मिक लोकच प्रामाणिकपणे म्हणू शकतात की, त्यांच्या जीवनातील मुख्य चिंता ही आहे की, देशात, मंडळीत, आणि स्वतःमध्ये व त्यांच्या परिवारात देवाचे नाव पवित्र मानले जावे.

“देवाचे राज्य लवकर यावे, देवाचे राज्य मंडळीत स्थापित व्हावे, आणि माझ्या जीवनात, माझ्या परिवारात, सर्वत्र देवाची इच्छा पूर्ण व्हावी.” हेच एका आत्मिक माणसाचे लक्षण आहे. जोपर्यंत तुमच्या हृदयातील सर्वोच्च इच्छा या तीन गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत स्वतःला आत्मिक समजू नका. जर तुमच्या जीवनाचे केंद्र अजूनही तुम्ही स्वतःच असाल, तर बाकी सर्व काही निरर्थक आहे. जेव्हा अनेक लोक धर्मांतर करतात, तेव्हा त्यांचे जीवन नेहमीच स्व-केंद्रित असल्यामुळे, त्यांनी येशूला फक्त आपल्या कक्षेत सामील करून घेतलेले असते, जेणेकरून तो त्यांची सेवा करेल – त्यांच्या पापांची क्षमा करेल, त्यांच्या प्रार्थनांची उत्तरे देईल, त्यांना आशीर्वाद देईल, त्यांना समृद्ध करेल आणि त्यांचे आजार बरे करेल. हि ख्रिस्ती शिकवण नाही. हे एक स्व-केंद्रित जीवन आहे, ज्यामध्ये धर्माची भर घातली आहे. जेव्हा ख्रिस्त खरोखर आपल्या जीवनात येतो, तेव्हा आपण आपल्या स्व-केंद्रित जीवनापासून मागे फिरतो (पश्चात्ताप करतो), आणि देव आपल्या जीवनाचे केंद्र बनतो.

प्रभूच्या प्रार्थनेच्या शेवटी आपल्यासंबंधीच्या तीन विनंत्यांमध्ये, येशू भौतिक गोष्टींचा उल्लेख करतो (आजची आमची रोजची भाकर आज आम्हास दे), परंतु तो त्यांना “जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण होवो” याच्याशी जोडतो. मी म्हणतो, “माझ्या पित्या, जशी देवदूत स्वर्गात तुझी इच्छा पूर्ण करतात तशीच मला पृथ्वीवर माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण करायची आहे, म्हणजे त्वरित आज्ञापालन; आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, मला आरोग्याची गरज आहे, म्हणून मला माझी रोजची भाकर दे.” तुम्ही देवाच्या इच्छेनुसार वागण्यासाठी रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करत आहात, की स्वतःच्या इच्छेनुसार वागण्यासाठी? ती पाप करण्यासाठी आहे, की देवाला प्रसन्न करण्यासाठी आहे ? आपली प्रार्थना अशी असावी, “मला आजची माझी रोजची भाकर दे, जेणेकरून मला देवासाठी जगण्यासाठी आरोग्य आणि सामर्थ्य मिळेल.”

दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या संपूर्ण प्रार्थनेत 'मी' आणि 'माझे' हे शब्द आढळत नाहीत. ही गोष्ट लक्ष वेधून घेणारी नाही का, की आपल्या स्वतःच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला 'मी' आणि 'माझे' हे शब्द वारंवार आढळतात, पण प्रभूने आपल्याला शिकवलेल्या प्रार्थनेत हे शब्द कुठेही आढळत नाहीत. तो म्हणतो, "आम्हांला दे" - "हे प्रभू, केवळ माझ्यासाठीच नाही, मी माझ्या भावाचाही विचार करतो, त्यालाही त्याच्या रोजच्या अन्नाची गरज आहे." "आम्हांला क्षमा कर" - "केवळ मलाच नाही, माझ्या भावालाही क्षमा कर." "आम्हांला सोडव..." खरा आत्मिक माणूस तो असतो ज्याचे जीवन देवावर केंद्रित असते, आणि जेव्हा स्वतःचा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा तो केवळ स्वतःचाच नाही, तर आपल्या सभोवतालच्या लोकांचाही विचार करतो - जे देवाच्या कुटुंबाचा भाग आहेत. कारण देव एका मोठ्या कुटुंबाचा पिता आहे, म्हणून तो इतरांचाही विचार करतो.

योग्य क्रम असा आहे की, आधी ख्रिस्त, आणि मग मी आणि इतर एकत्र; फक्त मी एकटा नाही. एक आत्मिक व्यक्ती अशा प्रकारे प्रार्थना करतो: केवळ स्वतःच्या गरजांसाठी नाही. नैसर्गिक रित्या त्याला आपल्या मुलांची काळजी असतेच, पण त्याला दुसऱ्यांच्या मुलांचीही काळजी असते. तो त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत नाही. आपल्या स्वतःच्या मुलांइतकीच दुसऱ्यांच्या मुलांची काळजी असणे हे मानवी दृष्ट्या शक्य नाही. आपल्यात खरेपणा असला पाहिजे, पण त्यांच्याबद्दल आपल्या मनात काहीतरी कळकळ असली पाहिजे. आजची आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.

“जशी आम्ही इतरांना त्यांच्या अपराधांची क्षमा करतो, तशीच तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर.” ही एक महत्त्वाची विनंती आहे. हीच एक विनंती आहे जी येशू शेवटी पुन्हा सांगतो. मत्तय ६:१४ मध्ये तो म्हणतो, “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर, तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल”. ही अट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण येशूने स्वतःच ती घातली आहे: जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तर तुमचा पिता तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. हे खरे आहे की नाही?

जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमच्याविरुद्ध केलेल्या कृत्याबद्दल क्षमा करत नाही, तेव्हा देव क्षमा नाकारतो का? निश्चितच. जर तुम्ही इतर लोकांना क्षमा केली नाही, तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही. कृपया हे लक्षात ठेवा. देवाच्या मनुष्यांशी असलेल्या व्यवहारात हे एक मूलभूत तत्त्व आहे की, आपण इतरांशी जसे वागतो, तसेच तो आपल्याशी वागतो. जर आपण इतरांबरोबर दयाळू असू, तर देव आपल्याबरोबर दयाळू असतों . जर तुम्ही इतरांना क्षमा केली, तर देव तुम्हाला क्षमा करतो. आपण ते मत्तय ५:७ मध्ये पाहिले, “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल”. येथे आपण असे म्हणू शकतो की, जे इतरांना क्षमा करतात ते धन्य, कारण त्यांना क्षमा केली जाईल; आणि जे इतरांना क्षमा करत नाहीत, त्यांना क्षमा केली जाणार नाही.

येशूने एकदा मत्तय १८:२१-३५ मध्ये हे स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट सांगितली. हा एक खूप महत्त्वाचा दाखला आहे जो आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. एक राजा होता, ज्याचे अनेक दास होते आणि त्या सर्वांवर त्याचे खूप कर्ज होते. एका माणसावर त्याचे त्या काळचे १०,००० रुपये ( talents) एवढे कर्ज होते, जे आज सुमारे एक अब्ज रुपयांइतके आहे - एक प्रचंड कर्ज जे तुम्ही कधीही फेडू शकत नाही. राजा दयाळू होता आणि त्याने त्याला क्षमा केली. या क्षमा मिळालेल्या माणसाला बाहेर गेल्यावर एक दुसरा दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘जर तू मला पैसे दिले नाहीस, तर मी तुला न्यायालयात घेऊन जाईन आणि तुरुंगात टाकीन,’ आणि त्याने तसेच केले. जेव्हा इतर दासांनी हे पाहिले, तेव्हा त्यांनी जाऊन राजाला ही बातमी दिली. राजाने त्या दासाला बोलावले आणि म्हटले, ‘अरे दुष्ट दासा, तू फक्त माझ्याकडे तुझे कर्ज माफ करण्याची विनंती केली आणि मी तुला माफ केले. जशी मी तुझ्यावर दया केली, तशी तूही तुझ्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस का?’ आणि त्याला खूप राग आला. राजाने त्या दासाला, जोपर्यंत तो आपले सर्व कर्ज फेडत नाही छळ करणाऱ्यांच्या स्वाधीन केले.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते माफ केलेले कर्ज पुन्हा त्याच्या डोक्यावर लादले गेले. तुम्ही याचे स्पष्टीकरण कसे द्याल? जो देव आपल्याला क्षमा करतो, तो आपली क्षमा मागे घेतो का? त्याने आधीच माफ केलेली पापे तो पुन्हा आपल्या माथी मारतो का? या वचनानुसार, होय. पवित्र शास्त्रात असे कधीही म्हटले नाही की देव आपली पापे विसरला आहे. तो म्हणतो, “मी तुमची पापे यापुढे आठवणार नाही,” याचा अर्थ, “मी तुमची पापे तुमच्या विरोधात वापरणार नाही.”

असे कोणतेही वचन नाही जे म्हणते की देव पूर्णपणे विसरतो. मी स्वतः मी केलेली पापे विसरू शकत नाही, मग देव ती कशी विसरेल? नाही, त्याला अजूनही माहीत आहेत, पण तो ती आपल्या विरोधात वापरत नाही. हा दाखला आपल्याला शिकवतो की, जर तुम्ही इतरांना क्षमा केली, तर देव तुम्हाला क्षमा करतो, आणि जर तुम्ही इतरांना क्षमा केली नाही, तर देव तुम्हाला क्षमा करणार नाही.

आणि मग शेवटची विनंती आहे, “आम्हास परीक्षेत आणू नको.” याचा अर्थ काय? परमेश्वर तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही (करिंथकरांस पहिले पत्र १०:१३), परंतु ही प्रार्थना करणे आपल्यासाठी चांगले आहे, कारण काही मोह आपल्या शक्तीच्या पलीकडचे असतात हे ओळखणे आपल्यासाठी चांगले आहे. आपल्याला माहित आहे की देव आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त परीक्षांमध्ये पडू देणार नाही, परंतु आपल्यासाठी खूप मजबूत असलेल्या मोहात पडू नये म्हणून आपण प्रार्थना करणे आवश्यक आहे. “तर मला वाईटापासून सोडीव .” मी एक नम्रपणे हे सांगत आहे की , “मला या मोहावर मात कशी करावी हे माहित नाही. या मोहावर मात करण्याची क्षमता माझ्यात नाही. म्हणून हे प्रभू, माझ्या पित्या, कृपया मला माझ्यासाठी खूप कठीण असलेल्या गोष्टीत पडू देऊ नकोस.” जेव्हा मी अशा प्रकारे प्रार्थना करतो, तेव्हा मी माझी असमर्थता आणि असहाय्यता व्यक्त करत असतो. मोहाच्या बाबतीत ठेवण्यासाठी ही एक चांगली वृत्ती आहे.

आपण असा विचार करू नये की आपण मोहावर मात करण्यासाठी खूप सामर्थ्यवान आहोत. याच कारणामुळे अनेकांना पापावर विजय मिळत नाही. बहुतेक ख्रिस्ती लोक पापाने पराभूत होण्याचे कारण हेच आहे की त्यांच्यामध्ये खूप जास्त आत्मविश्वास असतो. त्यांना वाटते की त्यांच्यात क्षमता आहे -- त्यांना वाटते की आणखी काही चांगले संकल्प केल्याने आणि दात ओठ आवळल्याने त्यांना त्यावर मात करण्यास मदत होईल. नाही, तसे होणार नाही. आपण हे मान्य केले पाहिजे, "प्रभु, मला माझ्यासाठी खूप तीव्र असलेल्या मोहात पाडू नकोस, आणि जेव्हा मी कोणत्याही मोहाचा सामना करेन, तेव्हा मला वाईटापासून वाचव, कारण मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने वाईटावर मात करू शकत नाही." जर आपण हे ओळखले की दुष्टता आपल्यासाठी खूपच सामर्थ्यवान आहे, अगदी इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीतही, तर आपण येशूने येथे शिकवल्याप्रमाणे प्रार्थना करू. जर तुम्हाला कोणाला क्षमा करणे कठीण वाटत असेल -- जर एखाद्याने तुमचे किंवा तुमच्या कुटुंबाचे भयंकर नुकसान केले असेल, आणि त्या व्यक्तीने केलेल्या वाईट कृत्याबद्दल त्याला क्षमा करणे तुम्हाला खूप कठीण वाटत असेल, -- तर तुम्ही देवाकडे कृपेसाठी प्रार्थना करू शकता. म्हणा, "प्रभु, कृपया मला मदत कर, क्षमा न करण्याच्या या वाईट आत्म्यापासून माझी सुटका कर. या व्यक्तीला क्षमा करण्याची क्षमता माझ्यात नाही, पण मी तुला विनंती करतो की त्याला क्षमा करण्यास मला मदत कर."

प्रार्थना ही आपली कमजोरी आणि देवावरील आपले असहाय्य परावलंबन याची अभिव्यक्ती आहे, आणि विश्वास म्हणजे हा आत्मविश्वास की देव मला मदत करेल कारण तो माझा स्वर्गातील पिता आहे, ज्याने मला माझ्या सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी आपल्या पुत्राला मरणासाठी पाठवले. रोमकरांस पत्र ८:३२ म्हणते, "ज्याने आपल्या पुत्रास तुमच्या सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी समर्पण केले , तर तो त्याच्यासोबत तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी कितीतरी अधिक देईल!"

ही प्रार्थना मत्तय ६:१३ मध्ये या शब्दांनी संपते, "कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्वकाळ तुझेच आहे, आमेन." आपण आपली प्रार्थना असे म्हणून पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे, “प्रभू, या सर्वांच्या शेवटी, जेव्हा तू माझ्या प्रार्थनेचे उत्तर देशील आणि मी तुला मागितलेली प्रत्येक गोष्ट करशील, तेव्हा मला हे मान्य करायचे आहे की राज्य तुझे आहे आणि सामर्थ्यही तुझेच आहे. हे जीवन जगण्याची शक्ती माझ्यात नाही; पापावर विजय मिळवण्याची शक्ती माझ्यात नाही. सामर्थ्य तुझेच आहे. आणि जेव्हा मी पापावर विजय मिळवीन, तेव्हा गौरवही तुझाच असो.”

नंतर प्रार्थना 'आमेन' या शब्दाने संपते, ज्याचा अर्थ आहे, “तसेच होवो”.