"जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा ढोंग्यासारखे असू नका..." (मत्तय ६:५). आपल्याला प्रार्थना कशी करावी हे शिकवण्यापूर्वी, येशूने प्रार्थनेबद्दल अनेक गोष्टी चेतावणी म्हणून सांगितल्या आहेत.
सर्वप्रथम, ढोंगी लोकांना ते प्रार्थना करताना इतरांनी त्यांना पाहावे हे आवडते. "ते सभास्थानांमध्ये आणि रस्त्यांच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करतात, जेणेकरून लोकांनी त्यांना पाहावे. त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे." येथील तत्त्व हे आहे की, जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करत असाल आणि तुमचा उद्देश असा असेल की लोकांनी तुमच्या प्रार्थनेचे कौतुक करावे, तर ते मनुष्यांकडून सन्मान मिळवण्यासारखे आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करायला सुरुवात करणारा जवळजवळ प्रत्येकजण हे मान्य करेल की प्रार्थना करताना तो सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो.
स्वतःला विचारा, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी त्याच प्रकारे प्रार्थना करता का, जसे तुम्ही एकांतात करता? जेव्हा तुम्ही तुमच्या पलंगाजवळ एकटे गुडघे टेकून प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही कशी प्रार्थना करता? तुम्ही देवाला काय सांगता? सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करताना तुम्ही तेच बोलता का? की तुम्ही तुमची भाषा अधिक अलंकारिक करता, आवाजात थोडा कंप आणता आणि एखाद्या अभिनेत्यासारखे वागता, जसे अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करताना करतात, जेणेकरून लोकांना वाटावे की ते खूप प्रामाणिक किंवा खूप भावूक आहेत?
हे सर्व ढोंग आहे. देवाला याचा तिरस्कार आहे. माझी इच्छा आहे की आपण हे ओळखावे की अशा प्रकारची सार्वजनिक प्रार्थना देवाच्या दृष्टीने घृणास्पद आहे. देवाला त्याचा तिरस्कार आहे आणि तो अशी प्रार्थना ऐकनारही नाही. मंडळीमधील बहुतेक सार्वजनिक प्रार्थना याच श्रेणीत येतात, जिथे लोक इतरांसमोर आपण किती चांगली प्रार्थना करू शकतो हे दाखवण्यासाठी प्रार्थना करतात. हे येशूच्या शिकवणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, आणि लोक असे करतात कारण येशूने आज्ञा केलेल्या सर्व गोष्टी त्यांना शिकवलेल्या नाहीत.
यापासून आपण स्वतःला कसे शुद्ध करु शकतो ? प्रत्येक वेळी प्रार्थना करताना आपण स्वतःचा न्याय केला पाहिजे. मला आठवतं, जेव्हा मी ख्रिस्ती म्हणून पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना केली. मला हे कबूल करावे लागेल की, प्रार्थना करताना मी लोकांकडून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा मी घरी जाऊन स्वतःचा न्याय केला, तेव्हा मी म्हणालो, "प्रभू, मी अशा प्रकारे प्रार्थना करणे बरोबर नाही." पुढच्या वेळी जेव्हा मी उठून सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना केली, तेव्हाही मी सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणून मी घरी जाऊन पुन्हा स्वतःचा न्याय केला. सार्वजनिक प्रार्थनेत मनुष्यांकडून सन्मान मिळवण्याच्या या इच्छेपासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी मला अनेक वर्षे लागली, पण अखेरीस, अनेक वर्षांनंतर, मी केवळ सर्वशक्तिमान देवाला, माझ्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करायला शिकलो. तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहात का? नसल्यास, मी तुम्हाला मनुष्यांकडून सन्मान मिळवण्याच्या इच्छेतून तुमचे तारण साधण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो.
मग येशू म्हणाला, “तू जेव्हा प्रार्थना करतोस , तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा; आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर.” आपण हे सार्वजनिक ठिकाणी कसे करू शकतो? जर आपल्या मनात एक असा दरवाजा असेल जो आपण बंद करू शकतो, तर आपण ते सार्वजनिक ठिकाणीही करू शकतो. जरी मी १०० लोकांच्या गर्दीत उभा असलो, तरी माझ्या मनात एक दरवाजा असतो. मी तो बंद करतो, आणि मग म्हणतो, “मी आता सर्वशक्तिमान देवासमोर, माझ्या पित्यासमोर, एकटा उभा आहे.” माझ्याभोवती लोक असतील, पण मी त्यांचा विचार करणार नाही. हेच एक कारण आहे की आपण प्रार्थना करताना आपले डोळे बंद करतो. असा कोणताही नियम नाही की प्रार्थना करताना डोळे बंद केलेच पाहिजेत. तुम्ही उघड्या डोळ्यांनीही प्रार्थना करू शकता, कारण येशूनेही कधीकधी तसे केले होते.
आपण आपले डोळे बंद करतो, जेणेकरून आपल्या सभोवतालच्या गोष्टींमुळे आपले लक्ष विचलित होऊ नये, जेणेकरून आपण आपल्या सभोवतालच्या लोकांकडून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करू नये. एका अर्थाने, जेव्हा आपण डोळे मिटतो, तेव्हा आपण लोकांना दूर करत असतो. आपण आपले मन देखील बंद केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “हे पित्या, मी आता दरवाजे बंद केले आहेत आणि मी तुला प्रार्थना करत आहे.” प्रार्थना करण्याची हीच योग्य पद्धत आहे आणि आपण हे सार्वजनिक ठिकाणीही करू शकतो. आपण आपल्या पित्याला गुप्तपणे प्रार्थना करतो आणि जो पिता गुप्तपणे पाहतो, तो आपल्याला प्रतिफळ देईल. तुम्ही याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगू शकता की, जर तुम्ही तुमचा पिता असलेल्या देवाला प्रार्थना करत असाल आणि मनुष्यांकडून सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत नसाल, तर तो निश्चितपणे तुम्हाला प्रतिफळ देईल आणि त्या प्रार्थनेचे उत्तर देईल.
मत्तय ६:७ मध्ये येशू आपल्याला प्रार्थना कशी करू नये याबद्दल अधिक सल्ला देतो, “परराष्ट्रीयांप्रमाणे व्यर्थ बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते .” परराष्ट्रीय ज्या चुका करतात त्या चुकांपैकी एक म्हणजे व्यर्थ बडबड करणे. काही धर्मांमध्ये काहीतरी जप करण्याची सवय असते. ते काही धार्मिक वाक्ये पुन्हा पुन्हा म्हणतात आणि ती एक निरर्थक गोष्ट बनते.
काही आध्यात्मिक भाषा घेऊन त्यांची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. आपण “हालेलुया, हालेलुया, हालेलुया” असे म्हणू शकतो आणि काही काळानंतर ते पूर्णपणे निरर्थक बनते. तो एक विधी बनतो. “प्रभूची स्तुती असो , प्रभूची स्तुती असो , प्रभूची स्तुती असो ” यांसारख्या वाक्यांच्या बाबतीतही हे खरे आहे. येशू म्हणाला, “व्यर्थ बडबड करू नका.” जर तुम्ही नवीन करार वाचला, तर तुमच्या लक्षात येईल की 'हालेलुया' हा शब्द फक्त प्रकटीकरण १९ मध्ये येतो आणि त्यात म्हटले आहे, “यामुळे हालेलुया,” आणि मग पुढे पुन्हा म्हटले आहे, “यामुळे हालेलुया.” आपण प्रभूची स्तुती करण्यामागे काहीतरी कारण असले पाहिजे, म्हणून आपण केवळ निरर्थकपणे “हालेलुया” म्हणू नये. आपण प्रत्येक गोष्टीत धन्यवाद दिले पाहिजेत, परंतु जर ती निरर्थक पुनरावृत्ती असेल, तर ती खूप मूर्खपणाची ठरू शकते आणि देवाच्या दृष्टीने त्याचे काहीही मोल नसते. हे देवाचे नाव व्यर्थ घेण्यासारखे देखील असू शकते, कारण हालेलुयाचा शेवटचा भाग, 'याह', हा यहोवाचे संक्षिप्त रूप आहे आणि यहुदी लोक ते नाव उच्चारण्यासही खूप घाबरत असत, कारण त्यांना भीती वाटत असे की ते देवाचे नाव व्यर्थ घेतील. मला विश्वास आहे की, जेव्हा अनेक ख्रिस्ती लोक निरर्थकपणे “हालेलुया” म्हणतात, तेव्हा ते देवाचे नाव व्यर्थ घेत असतात. मी परमेश्वराची स्तुती करताना हे वाक्य अनेकदा म्हणतो, पण प्रत्येक वेळी ते अर्थपूर्णपणे म्हणण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या शब्दाचा वापर करण्याच्या मी विरोधात नाही, आणि देवही नाही, पण तो अर्थपूर्ण असला पाहिजे, केवळ अर्थहीन पुनरावृत्ती नसावी.
ख्रिस्ती लोकांनी ह्या अशा एका साध्या आज्ञेला देखील गांभीर्याने घेतले नाही, हे तुमच्या लक्षात येते का ? येशू म्हणाला की, ख्रिस्ती नसलेले लोकच मंत्रासारखी एखादी गोष्ट अर्थहीनपणे पुन्हा पुन्हा म्हणतात, आपल्या जीवनात तसे होता कामा नये. आपण देवाचा आदर केला पाहिजे आणि जे म्हणतो ते मनापासून म्हटले पाहिजे. तुम्ही एखाद्या राजासमोर, किंवा राष्ट्रपतीसमोर, किंवा भारताच्या पंतप्रधानांसमोर जाऊन, तुम्ही काय म्हणत आहात हे न समजता, काहीतरी व्यर्थ बडबड करू शकत नाही. आपण देवाचा त्याहूनही अधिक आदर केला पाहिजे. व्यर्थ बडबड टाळा.
येशू असेही म्हणतो, "तुम्ही पुष्कळ बोलले म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे समजू नका." प्रार्थनेच्या बाबतीत अनेक लोक ही दुसरी चूक करतात. त्यांना वाटते की जर त्यांनी बराच वेळ प्रार्थना केली, तर देव त्यांचे नक्कीच ऐकेल. "मी ३ तास प्रार्थना केली, म्हणून देव माझे नक्कीच ऐकेल." हा निव्वळ मूर्खपणा आहे, आणि ख्रिस्ती नसलेले लोक असाच विचार करतात - की जर त्यांनी बराच वेळ प्रार्थना केली, तर देव त्यांचे नक्कीच ऐकेल. हे खरे नाही.
कर्मेल पर्वतावर, बालच्या संदेष्ट्यांनी अनेक तास प्रार्थना केली - कदाचित सहा तास किंवा त्याहून अधिक - पण काहीही झाले नाही. एलिया उठला आणि त्याने अर्धा मिनिट प्रार्थना केली आणि अग्नी खाली आला. प्रार्थनेच्या लांबीमुळे देव ऐकत नाही. हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
अनेक लोकांना वाटते की रात्रभर प्रार्थना केल्याने त्यांचे ऐकले जाईल. "मी रात्रभर प्रार्थना केली, म्हणून देव माझ्या प्रार्थनेचे उत्तर देईलच." असे कोणी सांगितले ? विश्वास आणि पापांपासून मुक्त असलेले हृदय हे प्रार्थनेच उत्तर मिळवून देतात. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्तोत्र ६६:१८ म्हणते, "जर माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असेल, तर परमेश्वर माझे ऐकणार नाही."
तुम्ही रात्रभर प्रार्थना केली तरी काही फरक पडत नाही, आणि तुमची प्रार्थना ऐकायला कितीही अद्भुत वाटत असली तरी काही फरक पडत नाही. जर असे एखादे पाप जे अजूनही तुमच्या जीवनात आहे, तुमच्या हृदयात कबूल न केलेले पाप असेल, तुमच्या आणि तुमच्या भावामध्ये नातेसंबंधात काही गैरसमज असेल, तुम्ही कोणाला दुखावले असेल आणि तरीही तुम्ही येऊन देवाला प्रार्थना करत असाल, तर देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. जा आणि तुमच्या भावासोबत तो विषय मिटवा. जर तुमच्या आणि देवामध्ये किंवा तुमच्या आणि तुमच्या भावामध्ये असे एखादे पाप असेल जे कबूल करून मिटवले गेले नाही, तर तुम्ही खात्री बाळगा की, तुम्ही १ मिनिट प्रार्थना करा किंवा १० तास करा, तुम्ही प्रार्थना करून तुमचा वेळ वाया घालवत आहात.