लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

आशा

"आशा" हा एक नवीन करारातील शब्द आहे, जसे "कृपा", "सौम्यता", "आत्म्याने दीन "आणि "जय मिळवणारे" इत्यादी. फार कमी विश्वासणाऱ्यांनी आशेबद्दल विचार केला आहे. परंतु शब्दसंदर्भसूचीमध्ये अभ्यास करण्यासाठी हा एक चांगला शब्द आहे.

रोम ५:२-४ आपल्याला सांगते की आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान बाळगतो. आपण संकटांमध्ये आनंद करतो कारण जर आपण त्या संकटांमध्ये धीर धरला तर आपल्याला शील मिळेल. शीलातून आशा निर्माण होते. याचा अर्थ देवाने आपल्याला कसे बदलले हे आपण आपल्या मागील जीवनातून पाहिले असल्याने येत्या काळात देव हे काम आपल्यात पूर्ण करेल अशी आपण आशा करतो.

देवाला आपल्याला भविष्याच्या आशेने भरायचे आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे आपणही घाबरून आणि खिन्नतेने भविष्याचा सामना करू नये. आम्ही पूर्ण खात्रीने, प्रचंड आशेने वाट पाहतो की ज्याने आमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते पूर्ण करेल आणि सिद्धीस नेईल.(फिलिप्पै १:६). आशा हे निरुत्साहासाठी आणि लहरीपणासाठी औषध आहे.

आपण आपल्या आशेला घट्ट धरून राहिले पाहिजे (इब्री १०:२३). दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपण मुखाने कबूल करण्याचे धैर्य दाखवले पाहिजे , जरी आपण आत्ता पराभूत झालो तरी देव आपल्याला विजय देईल आणि त्याने आपल्यात जे करण्याचे आश्वासन दिले आहे ते करेल. आपण आशेत आनंद केला पाहिजे. देवाने विश्वासणाऱ्यांसाठी जे काही केले त्याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानणे साहजिक आहे. पण देव आपल्यासाठी जे करणार आहे त्या आशेतही आपण आनंद केला पाहिजे.

"तो जे काही हाती घेतो ते सिद्धीस जाते" हे स्तोत्र १:३ मधील वचन आहे. ही आपल्या जीवनासाठी असलेली देवाची इच्छा आहे आणि ख्रिस्तातील आपला जन्मसिद्ध हक्क म्हणून आपण त्याचा दावा केला पाहिजे.

आनंद

ओसंडून वाहणारा आनंद हा एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण देवाच्या उपस्थितीत जगत आहोत हे आपल्याला कळू शकते - कारण "तुझ्या उपस्थितीत विपुल हर्ष आहे." (स्तोत्र १६:११). अशा प्रकारे आपल्याला हेही माहीत आहे की देवाचे राज्य खरोखरच आपल्या हृदयात आले आहे - कारण "देवाचे राज्य नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यांत आहे." (रोम १४:१७). हा आनंद आपला केवळ तेव्हाच असू शकतो जेव्हा आपल्याला अनीतीचा द्वेष आणि नीतिमत्त्व प्रिय असेल -कारण हर्षरूपी तेलाचा अभिषेक त्यांनाच केला जातो ज्यांना "अनीतीचा द्वेष आणि नीतिमत्त्व प्रिय"(इब्री १:९) असते. परमेश्वराचा आनंद हा नेहमी तुमचे सामर्थ्य असू द्या (नहेम्या ८:१०). आनंदामुळे परिक्षांविरुद्धची तुमची लढाई अधिक सोपी होईल.

याकोब म्हणतो की, दोन कारणांमुळे परिक्षांमध्येही आपण आनंद केला पाहिजे (याकोब १:१-४):
(१) आपला विश्वास खरा आहे की नाही हे आपल्याला समजते (हे आपल्याकडे असलेले सोने खरे आहे की नाही हे शोधण्यासारखे आहे - जेणेकरून आपण गरीब असताना आपण श्रीमंत आहोत असे स्वतःला फसवत नाही).
(२) आपला धीर परिपूर्णतेने वाढतो - आणि मग आपण प्रौढ आणि परिपूर्ण आणि कशाचीही कमतरता नसलेले होतो.

आपल्या परिक्षांमधून होणारे परिणाम अद्भुत आहेत - जर आपण त्यात आनंद केला तर. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये फार क्लेश वाया गेलेले आहेत. त्यांना त्यांच्या दुःखातून कोणतीही संपत्ती मिळत नाही, कारण ते आनंद करण्याऐवजी तक्रार आणि कुरकुर करतात.