लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

एखाद्या वर्षाच्या अखेरीस आपल्या जीवनाचे परीक्षण करणे आणि ते कसे गेले हे पाहणे आपल्यासाठी चांगले आहे. हाग्गय संदेष्ट्याने आपल्या काळात लोकांना "त्यांच्या मार्गांचा विचार करा" असा बोध केला होता. हाग्गय १:५‭-‬६ मध्ये असे लिहिले आहे : आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, :"तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो". वरील परिच्छेद आपण स्वतःला अशा प्रकारे लागू करू शकतो: प्रभू आपल्याला असे म्हणत आव्हान देतो की, "तुमच्या जीवनात गोष्टी कशा चालल्या आहेत याकडे लक्ष द्या"

आध्यात्मिक फलदायिता आली आहे का? तुम्ही भरपूर लागवड केली, पण फारशी कापणी केली नाही. तुम्ही अनेक सभांना गेला आहात, अनेक ख्रिस्ती पुस्तके वाचली आहेत आणि अनेक ख्रिस्ती ध्वनिमुद्रिका ऐकल्या आहेत, पण आज तुमचे घर देवाचे घर व शांतीचे घर आहे का? तुम्ही तुमच्या पत्नीवर/ नव-यावर ओरडण्यासारख्या साध्या गोष्टीवर मात केली आहे का? तसे नसेल तर तुम्ही भरपूर पेरणी केली आहे तरी तुम्ही फारशी कापणी केलेली नाही. तुम्ही कपडे घालता, पण तुम्हांला अजूनही उब मिळत नाही. तुम्ही पुष्कळ पैसे कमवता, पण तुमच्या पाकिटाला छिद्रे आहेत आणि त्यामुळे त्यातला बराचसा भाग वाया जातो.

देवासाठी काहीही अशक्य नाही - आपण दुर्दैवाने आणि वारंवार अपयशी ठरल्यानंतर आपल्याला त्याच्या परिपूर्ण इच्छेत आणणेदेखील त्याला अशक्य नाही. आपल्या अविश्वासामुळेच फक्त त्याला अडथळा येऊ शकतो. जर तुम्ही म्हणाल, "पण मी इतक्या वेळा गोष्टींमध्ये गोंधळ घातला आहे. आता देवाला मला त्याच्या परिपूर्ण योजनेत आणणे अशक्य आहे", मग देवाला ते अशक्य आहे, कारण तो तुमच्यासाठी काय करू शकतो यावर तुमचा विश्वास नाही. पण येशूने म्हटले की देवाला आपल्यासाठी कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही- जर आमचा विश्वास असेल तर.

“तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो”, देवाचा हा नियम सर्व बाबतीत आहे (मत्तय ९:२९). आपल्याला ते मिळेल ज्याबद्दल आपल्याला विश्वास आहे. देवाला आपल्यासाठी एखादी गोष्ट करणे अशक्य आहे असे जर आपल्याला वाटत असेल तर ते आपल्या जीवनात पूर्ण होणार नाही. दुसरीकडे पाहता, ख्रिस्ताच्या न्यायासनाजवळ तुम्हांला कळेल की, तुमच्यापेक्षा आपल्या जीवनात अधिक गोंधळ करणाऱ्या दुसऱ्या एका विश्वासणाऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनासाठी असलेली देवाची परिपूर्ण योजना पूर्ण केली- कारण देव आपल्या जीवनाचे तुटलेले तुकडे उचलून त्यातून काहीतरी "अतिशय चांगले" बनवू शकेल असा त्याचा विश्वास होता. तुमच्या जीवनात तुम्हांला किती पस्तावा होईल, ज्यादिवशी तुम्हांला कळेल की तुमचे अपयश (कितीही असले तरी) नव्हे तर तुमच्या जीवनातील देवाच्या योजनेला ज्याने विफल केले होते, तो होता तुमचा अविश्वास!

"सैतानाची कृत्ये पूर्ववत(नाहीशी) करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला." (१ योहान ३:८ अँप्लिफाईड बायबल). या वचनाचा खरा अर्थ असा होतो की सैतानाने आपल्या जीवनात बांधलेल्या सर्व गाठी सोडवायला येशू आला. अशी कल्पना करा:आपण असे म्हणू शकतो की आमचा जन्म झाला तेव्हा देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला दोरीचे एक व्यवस्थित गुंडाळलेले रिळ दिले . आम्ही दररोज जगू लागलो तेव्हा आम्ही दोरीचे ते रिळ उलगडायला सुरुवात केली आणि आम्ही त्यात गाठी (पाप)बांधायला सुरुवात केली. आज दोरी उलगडण्याच्या अनेक वर्षांनंतर आपण निराश होतो कारण, त्यात आपल्याला दिसणाऱ्या हजारो गाठी आपण पाहतो. पण येशू "सैतानाने बांधलेल्या गाठी" उलगडायला आला आहे. त्यामुळे सर्वाधिक गाठी असलेल्यांसाठीदेखील आशा आहे.

प्रभू प्रत्येक गाठ उकलू शकतो आणि तुम्हांला पुन्हा एकदा हातात दोरीचे एक व्यवस्थित गुंडाळलेले रिळ देऊ शकतो. हा शुभवर्तमानाचा संदेश आहे: तुम्ही नवी सुरुवात करू शकता. तुम्ही म्हणता, "हे अशक्य आहे!" तर मग ते तुमच्या विश्वासानुसार केले जाईल. तुमच्या बाबतीत ते अशक्य असेल. पण मी दुसऱ्या कोणाला, ज्याचे आयुष्य तुमच्यापेक्षाही वाईट आहे,असे म्हणताना ऐकतो आहे, "होय, देव माझ्यात तसे करेल असा माझा विश्वास आहे." त्याच्या बाबतीतही त्याच्या विश्वासानुसार घडेल. त्याच्या जीवनात देवाची परिपूर्ण योजना पूर्ण होईल.

तुमच्या सर्व अपयशांसाठी तुमच्या जीवनात दैवी दुःख असेल तर तुमची पापे किरमिजी किंवा लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील असे अभिवचन जुन्या करारानुसार (यशया १:१८)आहेच, पण देव नव्या कराराअंतर्गत असेही अभिवचन देतो, "तुमची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”(इब्री लोकांस पत्र ८:१२)." तुमच्या चुका किंवा अपयश काहीही असले तरी तुम्ही देवासोबत नवी सुरुवात करू शकता. आणि जरी तुम्ही भूतकाळात एक हजार वेळा नवी सुरुवात केली असेल आणि अपयशी ठरला असाल, तरी आजही तुम्ही एक हजार एकाव्या वेळी नवी सुरुवात करू शकता. देव अजूनही तुमच्या आयुष्यातून काहीतरी वैभवशाली घडवू शकतो. जीवन आहे तोवर आशा आहे. त्यामुळे देवावर भरवसा ठेवण्यात कमी पडू नका. तो त्याच्या अनेक मुलांसाठी अनेक शक्तिशाली कामे करू शकत नाही, कारण ते भूतकाळात अपयशी ठरले आहेत म्हणून नव्हे, तर आता ते त्याच्यावर भरवसा ठेवणार नाहीत म्हणून. मग आपण "विश्वासाने सबळ होऊन देवाचे गौरव करूया" (रोमकरांस पत्र ४:२०). आणि आतापर्यंत अशक्य समजल्या जाणाऱ्या गोष्टींसाठी येणाऱ्या दिवसांत त्याच्यावर भरवसा ठेवूया. सर्व लोक - तरुण आणि वृद्ध - आशा धरू शकतात, जरी ते भूतकाळात कितीही अपयशी ठरले तरी, जर ते आपल्या अपयशाची कबुली देतील,नम्र होतील आणि देवावर भरवसा ठेवतील.