लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

आपण मंडळीच्या इतिहासामध्ये एक उत्कृष्ट धडा पाहतो. जेव्हा जेव्हा देव आपल्या लोकांसाठी काहीतरी करू इच्छितो तेव्हा तेव्हा तो नेहमीच एखाद्या मनुष्यापासून सुरूवात करतो. इस्राएली लोकांना सोडवण्याआधी त्याला योग्य मनुष्य शोधावा लागला. त्या माणसाच्या प्रशिक्षणाला ८० वर्षे लागली - आणि ते फक्त शैक्षणिक प्रशिक्षण नव्हते. मोशेला मिसराच्या सर्वोत्कृष्ट अकादमींमध्ये प्रशिक्षण दिले गेले होते परंतु त्यामुळे तो देवाच्या कार्यासाठी पात्र ठरला नाही. प्रेषितांची कृत्ये ७:२२ मध्ये स्तेफन म्हणतो की मोशे भाषण आणि कृती या दोन्ही गोष्टींमध्ये सामर्थ्यवान होता. वयाच्या ४० व्या वर्षी तो एक सामर्थ्यवान आणि अस्खलित वक्ता होता. तो एक महान लष्करी नेता, खूप श्रीमंत व्यक्ती होता, आणि जगातील सर्वात प्रगत देश देऊ शकणारे उत्तम शिक्षण त्याने घेतले होते - कारण मिसर त्या काळी जगातील एकमेव महासत्ता होती. इतके सर्व असूनही तो देवाची सेवा करण्यास अपात्र होता. स्तेफन म्हणाला की मोशेला वाटले की इस्राएली लोकांनी ओळखावे की देवाने त्याला त्यांच्या सुटकेसाठी उभे केले आहे. परंतु त्यांनी त्यांचा नेता म्हणून त्याला ओळखले नाही. त्याची सर्व जगिक प्रसिद्धी आणि क्षमता देवाने त्याच्यासाठी तयार केलेल्या कार्यासाठी त्याला पात्र ठरवू शकली नाही.

आज अनेक ख्रिस्ती लोक अशी कल्पना करतात की त्यांच्यांकडे पवित्र शास्त्राचे-ज्ञान, सांगीतिक क्षमता आणि पुष्कळ पैसा असल्यामुळेच ते देवाची सेवा करू शकतात. पण ते चूक करत आहेत. त्यांना मोशेच्या जीवनातून धडा शिकण्याची आवश्यकता आहे: ४० वर्षे हे जग त्याला जे उत्तम देऊ शकले, ते त्याला देवाच्या सेवेसाठी तयार करू शकले नाही.

मोशे सिद्ध व्हावा यासाठी देवाला त्याला आणखी ४० वर्षे त्याच्या राजवाड्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वाळवंटात, न्यावे लागले. त्याचे मानवी सामर्थ्य मोडणे गरजेचे होते. आणि देवाने त्याला मेंढीपालन करून आणि त्याच्या सासर्‍याबरोबर राहण्याची आणि त्याच्यासाठी काम करण्याची परवानगी देऊन हे केले - ४० प्रदीर्घ वर्षे. एक वर्षदेखील सासर्‍याच्या घरी राहणे एखाद्या पुरुषासाठी अपमानजनक ठरू शकते! मला माहित आहे की भारतात बर्‍याच विवाहित स्त्रिया आयुष्यभर सासरच्या घरी राहतात. जेव्हा पुरुषाला आपल्या पत्नीच्या वडिलांसोबत राहावे लागते आणि त्याच्यासाठी कामही करावे लागते तेव्हा ही वेगळी गोष्ट आहे. पुरुषासाठी हा एक खरोखरच नम्र करणारा अनुभव असू शकतो. परंतु अशाप्रकारे देवाने मोशेला मोडले. अशाप्रकारे देवाने याकोबालाही मोडले. त्यालाही २० वर्ष सासर्‍याच्या घरी राहावे लागले. देव आपल्या मुलांना मोडण्यासाठी सासूसासर्‍यांचा उपयोग करतो. मिसरच्या सर्व विद्यापीठांना मोशेला जे शिकवता आले नाही, ते वाळवंटात, मेंढरांची देखभाल करून आणि आपल्या सासऱ्याची सेवा करून तो शिकला. त्या ४० वर्षांच्या शेवटी, मोशे इतका मोडला होता की जो एकेकाळचा अस्खलित वक्ता होता व ज्याला वाटले की तो इस्राएलला वाचवू शकेल, आता तो म्हणतो, “तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी पात्र नाही मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.” तेव्हा देव म्हणाला, “सरतेशेवटी तू तयार आहेस. मी तुला आता फारोकडे पाठवीन ” (निर्गम ४:१०-१७).

याकोब व मोशे यांच्याकडून आपण कोणता धडा घेतला? फक्त हेः जेव्हा आपल्याला वाटते की आपण तयार आहात, तेव्हा आपण नसता. जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही सक्षम आहात, तुम्ही सामर्थ्यवान आहात, तुम्हाला ज्ञान आहे, तुम्ही बोलू शकता आणि गायन करू शकता, तुम्ही वाद्य वाजवू शकता आणि देवासाठी आश्चर्यकारक गोष्टी करू शकता, तेव्हा देव म्हणतो, “तुम्ही अपात्र आहात. तू मोडेपर्यंत मला थांबावे लागेल. याकोबाला या प्रक्रियेस २० वर्षे, मोशेला ४० वर्षे, पेत्राला ३ वर्षे आणि पौलाला किमान ३ वर्षे लागली. आमच्यासाठी ही प्रक्रिया व्हायला किती काळ लागेल? हे आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली किती लवकर अधीन होण्यास शिकतो यावर अवलंबून आहे. आमच्यासाठी इथे एक संदेश आणि चेतावणी आहे. देवाकडे तुमच्या आयुष्यासाठी योजना असू शकेल. परंतु आपण मोडल्याशिवाय हे कधीही पूर्ण होणार नाही.त्याने तुमच्यामध्ये १० वर्षांत जे करण्याचे ठरविले आहे त्याला ४० वर्षे लागू शकतात. म्हणूनच, देवाच्या सामर्थ्याखाली स्वत:ला लवकर नम्र करणे नेहमीच चांगले आहे - जे त्याने आपल्या मार्गावर पाठविलेल्या परिस्थितीशी संबंधित आहे.

विलापगीत ३:२७ म्हणते, “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे (स्वतःला नम्र करणे आणि मोडू देणे ) हे त्याला बरे आहे.” आपण तरुण असताना देवाला आपल्याला मोडू देण्याची परवानगी द्या. आपल्या जीवनात देव ज्या परिस्थितीस परवानगी देतो त्याविरूद्ध लढू नका, कारण यामुळे केवळ देवाच्या योजनेस विलंब होईल. तुमचे पवित्र शास्त्राचे सर्व ज्ञान, सांगीतिक क्षमता आणि पैसा तुम्हांला देवाच्या सेवेसाठी सुसज्ज करू शकत नाहीत. मोडले जाणे आवश्यक आहे. जर तुम्हाला यरूशलेम, खरी मंडळी उभारायची असेल तर तुम्हाला भग्न व्हावे लागेल. तुम्हाला देवाकडून परिस्थितीद्वारे आणि लोकांद्वारे नम्र व्हावे लागेल. जर तुम्ही अशा परिस्थितीत बंडखोरी केली नाही तर देव तुमच्यामध्ये त्वरित कार्य करू शकतो.

आम्ही निर्गम १७:६ मध्ये वाचतो की जेव्हा खडकाला मारले तेव्हाच पाणी वाहू लागले. जर खडकाला मारून तो फोडला गेला नाही तर पाणी वाहणार नाही. जेव्हा अलाबास्त्र कुपीमध्ये अत्तर आणणार्‍या स्त्रीने येशूच्या पायाजवळ ती फोडली, तेव्हाच घर सुगंधाने भरले. कुपी फोडल्याशिवाय कोणालाही सुगंध येऊ शकला नाही. जेव्हा येशूने भाकर घेतली आणि उपकारस्तुति केली तेव्हा काही झाले नाही. परंतु जेव्हा त्याने ती मोडली, तेव्हा पाच हजार लोक जेवू शकले. या सर्व उदाहरणांमधील संदेश काय आहे ? मोडले जाणे हा आशीर्वादाचा मार्ग आहे. जेव्हा अणू विभाजित होतो तेव्हा किती शक्ती मुक्त होते! ती एका संपूर्ण शहराला वीज देऊ शकते! एक लहान अणू- इतका लहान जो आपण एका सूक्ष्मदर्शीच्या खाली देखील पाहू शकत नाही तो -जर खंडित केला तर मुक्त होणार्‍या शक्तीची कल्पना करा . निसर्ग तसेच पवित्र शास्त्रामधील संदेश हाच आहे: परमेश्वराचे सामर्थ्य मोडले जाण्यातून मुक्त होते. तो संदेश तुमच्या आयुष्याची पकड घेवो.