WFTW Body: 

निर्गम 1:22 मध्ये आपण पाहतो की फारोने आदेश दिला की सर्व इस्राएली तान्ह्या मुलांना जिवे मारण्यात यावे. तेव्हा मोशेच्या आईने मोशेला लव्हाळ्याच्या एका पेटार्यात ठेवले व प्रार्थना करून नदीत सोडले. फारोने हा दुष्ट आदेश दिला नसता तर मोशेच्या आईने त्याला नदीत सोडले नसते. मोशेच्या आईने तसे केल्यामुळे फारोच्या मुलीने मोशेला उचलले व दत्तक घेतले आणि फारोच्या दरबारात वाढविले. देवाची अशी इच्छा होती की मोशेने चाळीस वर्षे महालात प्रशिक्षण घ्यावे. फारोने दुष्ट फर्मान सोडले नसते तर तसे घडले नसते. मग मोशे मोठा होऊन गुलाम राहिला असता. सैतान करीत असलेल्या घडामोडींमधून देखील देव आपले उद्देश पूर्ण करीत असतो हे तुम्हाला याठिकाणी दिसेल.

आपल्या सर्वांकरिता याठिकाणी एक धडा आहे. ही गोष्ट आपल्याला मंडळीच्या इतिहासात देखील पहायला मिळते. देवाच्या लोकांसाठी देव काही करू इच्छितो तेव्हा तो एका पुरुषापासून सुरुवात करितो. इस्राएली लोकांना दास्यातून सोडविण्याकरिता त्याला एक योग्य पुरुष शोधावा लागला. या पुरुषाला 80 वर्षे प्रशिक्षीत करावे लागले. मिसरातील उत्तम प्रशिक्षण केंद्रात त्याचे प्रशिक्षण झाले. परंतु तरी देखील तो देवाच्या कार्याकरिता सिद्ध झालेला नव्हता. प्रेषितांची कृत्ये 7 मध्ये स्तेफन म्हणतो की मोशे बोलण्यात व कार्यात कतृत्ववान होता. वयाच्या 40 व्या वर्षी तो शरीराने बळकट व एक चांगला वक्ता होता. तो सैन्याचा मोठा पुढारी होता, श्रीमंत होता आणि जगातील सर्वात आधुनिक देशामध्ये त्याला उत्तम प्रशिक्षण मिळाले होते. त्या काळात मिसर देश सर्वात शक्तीशाली देश होता. परंतु त्या देशात प्रशिक्षण झाल्यावर देखील तो देवाच्या सेवेकरिता पात्र व सिद्ध झालेला नव्हता. स्तेफन म्हणतो की मोशेने विचार केला की इस्राएली लोकांना कळेल की त्याला मुक्त करण्याकरिता देवाने त्याला उभे केले आहे. परंतु इस्राएली लोकांनी त्याला पुढारी समजले नाही. जगातील प्रसिद्धी व कलाकौशल्यांद्वारे व प्रशिक्षणांद्वारे तो देवाच्या कार्याकरिता सुसज्जीत झाला नव्हता.

आज अनेक ख्रिस्ती लोकांना वाटते की त्यांना बायबलचे ज्ञान आहे, संगीताची कला अवगत आहे व त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून ते देवाची सेवा करू शकतात. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. मोशेच्या जीवनातून त्यांनी बोध घ्यावा. आयुष्याची चाळीस वर्षे त्याने जगातील उत्तम प्रशिक्षण घेतले तरी तो देवाच्या सेवेकरिता तयार झाला नाही.

पुढील चाळीस वर्षे देवाने त्याला अरण्यात नेले आणि येथील वातावरण राजदरबाराच्या वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. मोशेला सुसज्जीत करण्याकरिता देवाने मोशेला अरण्यात नेले. देव त्याला त्याठिकाणी भग्न करू इच्छित होता. देवाने त्याला मेंढपाळाचे काम दिले. त्याठिकाणी मोशेने आपल्या सासर्याची 40 वर्षे सेवाचाकरी केली. एक वर्ष सासर्याची सेवाचाकरी करणे अपमानास्पद आहे. मला माहीत आहे की भारतातील अनेक विवाहित स्त्रिया आजीवन सासरी राहतात. परंतु पुरुषाने सासरी राहणे वेगळे आहे. पुरुषाने सासरी राहून सेवाचाकरी करणे तर फारच कठीण आहे. पुरुषाकरिता हा अपमानास्पद अनुभव म्हणावे. परंतु अशा परिस्थितीमध्येच देवाने मोशेला भग्न केले. देवाने याकोबाला देखील अशाच परिस्थितीत भग्न केले. याकोब देखील 20 वर्षे आपल्या सासर्याच्या घरी राहिला. आपल्या लेकरांना भग्न करण्याकरिता देव त्यांच्या सासुसासर्यांचा उपयोग करून घेतो.

मिसरातील उत्तम प्रशिक्षण केंद्रात मोशे जे शिकू शकला नाही ते तो अरण्यात मेंढरे चारीत असताना व सासर्याची सेवाचाकरी करीत असताना शिकला. पूर्वी स्वतःला सिद्ध समजणारा व इस्राएली लोकांना मुक्त करण्याचा आत्मविश्वास असलेला मोशे आता या 40 वर्षांच्या शेवटी इतका भग्न झाला की तो प्रभुला पुढीलप्रमाणे म्हणाला, '्य्रभु, मी लायक नाही. मी जड ओठाचा आहे. निट बोलू शकत नाही. तुझ्या लोकांचे नेतृत्व करण्याकरिता कोणा दुसर्याला पाठीव.'' देव त्याला म्हणाला, ''आता तू तयार झाला आहेस. आता मी तुला फारोकडे पाठवीन'' (निर्गम 4:10-17).

मोशे व याकोबाच्या जीवनातून आपण कोणता धडा शिकलो. आपण हा धडा शिकलो की आपण सिद्ध आहोत असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपण सिद्ध व सुसज्जीत नसतो. जेव्हा आपल्याला वाटते की आपण लायक आहोत, बळकट आहोत, आपल्याला पुष्कळ ज्ञान आहे, आपण बोलू शकतो, गाऊ शकतो, वाद्य वाजवू शकतो व देवाकरिता अद्भुत गोष्टी करू शकतो तेव्हा देव आपल्याला म्हणतो, ''तू माझ्या कार्याकरिता योग्य नाहीस. तू भग्न होऊस्तर मला वाट बघावी लागेल.'' भग्न होण्याकरिता याकोबाला 20 वर्षे लागली, मोशेला 40 वर्षे लागली, पेत्राला तीन वर्षे लागली आणि पौलाला देखील जवळ जवळ तीन वर्षे लागली. भग्न होण्याकरिता आपल्याला किती वर्षे लागणार? देवाच्या हातात आपण स्वतःला किती लवकर समर्पित करतो यावर ते निर्भर आहे.

पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत शिक्षण घेण्याकरिता किती वर्षे लागतात? 12 वर्षे? होय, जर तुम्ही प्रत्येक वर्षी पास झाला तर. परंतु, अशी काही लेकरे मी बघितली ज्यांना बाराव्या वर्गापर्यंत पोहंचण्याकरिता 16 वर्षे लागलीत. मेडीकल कॉलेजचा एक विद्यार्थी मी बघितला ज्याला पाच वर्षाचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता पंधरा वर्षे लागलीत. आपण किती लवकर धडा शिकतो यावर आपल्या शिक्षणाचा कालावधी विसंबून आहे. ख्रिस्ती जीवनात देखील असेच घडते.

निर्गम 12:40 मध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे, 'इस्राएल लोकांना मिसर देशात राहून चारशेतीस वर्षे लोटली होती.' देवाने अब्राहामाला म्हटले होते की त्याची संतती परराष्ट्रात चारशे वर्षे राहील (उत्पत्ती 15:13). परंतु याठिकाणी आपण वाचतो की इस्राएली लोक 430 वर्षे परप्रांतात राहिले. देवाने चूक केली का? नाही. देवाचे वेळापत्रक अचूक असते. देव कधीही चूक करीत नाही. देवाने अब्राहामाला सांगितले तेव्हा देवाची इच्छा होती की इस्राएली लोकांनी चारशे वर्षे मिसरात राहावे. मग अधिकची तीस वर्षे ते परप्रांतात का राहिले?

ह्याचे उत्तर प्राप्त करण्याकरिता आणखी एक उदाहरण पाहा. देवाने इस्राएली लोकांना मिसराच्या बाहेर काढले तेव्हा देवाची इच्छा होती की त्यांनी केवळ दोन वर्षे अरण्यात प्रवास करावा. परंतु, त्यांना किती वर्षे अरण्यात भटकावे लागले? चाळीस वर्षे (पाहा अनुवाद 2:14). तुमच्याकरिता देवाची योजना दोन वर्षांची असेल परंतु, तुम्हाला चाळीस वर्षे देखील लागू शकतात. तुमचे परिवर्तन झाल्यावर केवळ दोन वर्षात तुम्हाला सुसज्जीत करून तुमच्याद्वारे मोठे कार्य करण्याची देवाची योजना असेल. परंतु, सुसज्जीत होण्याकरिता तुम्ही चाळीस वर्षांचा वेळ वापरू शकता. तुम्ही किती लवकर भग्न होता यावर ते अवलंबून आहे. इस्राएली लोकांकरिता देवाची योजना होती की त्यांनी 400 वर्षे मिसरात राहावे. परंतु, ते 430 वर्षे मिसरात राहिले.

माझ्या मते, मोशे त्यांचा पुढारी लवकर भग्न व सुसज्जीत झाला नाही म्हणून त्यांना अधिकची तीस वर्षे मिसरात राहावे लागले. वयाच्या 40 व्या वर्षी मोशे मिसर सोडून अरण्यात गेला तेव्हा देवाची योजना असावी की दहा वर्षांमध्ये तो अरण्यात मेंढरे राखून व सासर्याची सेवाचाकरी करून सुसज्जीत होईल. म्हणजेच वयाच्या 50 व्या वर्षी मोशेने भग्न होऊन इस्राएलाचे पुढारीपण करावे अशी देवाची योजना होती. परंतु, दहा वर्षांमध्ये मोशे सुसज्जीत होऊ शकला नाही. मोशेला भग्न करण्याकरिता देवाने त्याला अधिकची तीस वर्षे त्याच्या सासर्याच्या हाताखाली ठेवले. दहा वर्षांचा अभ्यासक्रम मोशेने चाळीस वर्षात पूर्ण केला. म्हणूनच इस्राएली लोकांना आणखी तीस वर्षे वाट बघावी लागली. पृथ्वीवरील कार्य पूर्ण करण्याकरिता देव भग्न लोकांवर विसंबून आहे. हा आपल्याकरिता संदेश व ताकीद आहे. देवाची तुमच्या जीवनाकरिता योजना आहे. परंतु जोवर तुम्ही भग्न होणार नाही तोवर ती पूर्ण होणार नाही. देवाची 10 वर्षांची योजना पूर्ण होण्याकरिता तुम्ही 40 वर्षांचा कालावधी खर्च करू शकता. म्हणून देवाच्या सामर्थी हातामध्ये आपण लवकरात लवकर नम्र व्हावे. देव आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवतो त्या परिस्थितीत आपण लवकरात लवकर भग्न व नम्र व्हावे.

विलापगीत 3:27 मध्ये पुढीलप्रमाणे म्हटले आहे, 'ट्टनुष्याने आपल्या तारुण्यात जूं वाहावे हे त्याला बरे आहे.'' म्हणजेच आपण तारुण्यात नम्र व भग्न व्हावे. तुम्ही तरुण असता देवाने तुम्हाला भग्न करावे असा त्याला प्रतिसाद द्या. तुमच्या जीवनात देवाने जी परिस्थिती आणली आहे तिच्याविरुद्ध भांडू नका कारण त्यामुळे देवाची योजना पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो. बायबलचे ज्ञान, संगीत कौशल्ये किंवा पैसा तुम्हाला देवाच्या सेवेकरिता सुसज्जीत करीत नाही. भग्नता अत्यंत महत्वाची आहे. भग्न झाल्यावरच याकोब इस्राएल बनू शकला. भग्न झाल्यावरच मोशे पुढारी व संदेष्टा होऊ शकला.