लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देवाच्या घराचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा न्यायनिवाडा (१ पेत्र.४:१७) - हा एक स्वतःचा न्यायनिवाडा आहे जो देवासमोर जगण्याचा परिणाम आहे. यशया, ईयोब आणि योहान या सर्वांनी जेव्हा देवाला पाहिले तेव्हा त्यांनी स्वत:चे उणेपण आणि स्वतःचे पाप पाहिले (पाहा यशया ६:५ ईयोब ४२:५,६; प्रकटीकरण १:१७).

जेव्हा आदाम आणि हव्वेने देवाच्या पवित्रतेचे उल्लंघन केले तेव्हा त्यांना एदेनमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर देवाने जीवनाच्या झाडासमोर त्याचे रक्षण करण्यासाठी करुबांना ज्वालारूप तलवार देऊन तैनात केले. जीवनाचे झाड हे सार्वकालिक जीवनाचे (दैवी स्वभावाचे) प्रतीक आहे जे येशू आपल्याला देण्यासाठी आला. ही तलवार ,दैवी स्वभावात भाग घेण्याआधी आपल्या स्व-जीवनाला ठार मारणाऱ्या क्रूसाचे प्रतीक आहे. हे खरे आहे की ही तलवार पहिल्यांदा येशूवर पडली. पण आम्हीही त्याच्याबरोबर क्रूसावर खिळले गेलो होतो. (गलती २:२०). आणि "जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे." (गलती ५:२४).

करुबांप्रमाणे मंडळीमधील वडिलांनीही ही तलवार चालवली पाहिजे आणि दैवी जीवनाचा एकमेव मार्ग म्हणजे देहस्वभावाचे मरण होय असे जाहीर केले पाहिजे. देवाच्या सहभागितेत परतण्याचा मार्ग त्या तलवारीद्वारे जातो. ही तलवार चालवली जात नसल्यामुळे आज बहुतेक मंडळ्या तडजोड करणाऱ्यांनी भरलेल्या आहेत आणि त्या ख्रिस्ताच्या शरीराचे अभिव्यक्ती होणे बंद झाल्या आहेत.

गणना २५:१ मध्ये, आपण अशा एका काळाबद्दल वाचतो जेव्हा इस्राएल लोक "मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले." इतकेच नव्हे तर एका इस्राएली पुरुषाने तर एका मिद्यानी स्त्रीला त्याच्या तंबूत आणले (गणना २५:६). पण एका याजकाने इस्राएलला त्या दिवशी राष्ट्र म्हणून नष्ट होण्यापासून वाचवले - फिनहास. देवाच्या सन्मानासाठी तो इतका आवेशी होता की त्याने ताबडतोब भाला घेतला, त्या तंबूत जाऊन त्या पुरुषाला आणि स्त्रीला ठार मारले. (गणना २५:७,८) मग देवाने मरी थांबवली. पण तोपर्यंत २४,००० लोक मारले गेले होते. (गणना २५:८,९) मरी इतक्या वेगाने पसरत होती की त्या दिवशी “तलवार चालवणारा करुब” नसता तर मरीने इस्राएलच्या संपूर्ण छावणीचा बळी घेतला असता.

प्रत्येक मंडळीमध्ये “तलवार चालवणारा करुब” असणे किती मौल्यवान आहे हे तुम्हाला दिसते का?

आज ख्रिस्ती धर्मजगतात मरी झपाट्याने पसरत आहे कारण तलवार कशी वापरायची हे माहीत असलेले पुरेसे फिनहास नाहीत. पुष्कळ वडील आणि प्रचारक, माणसांना खुश करणारे आहेत जे आपल्याला सतत “मिद्यानी लोकांवर प्रेम करण्याचा” आग्रह करतात. आपण मंडळीमध्ये तलवार का वापरू नये याबद्दल सैतान आपल्याला शंभर युक्तिवाद देईल. आपल्या युक्तिवादांना पाठिंबा देण्यासाठी तो शास्त्रवचनांचाही उल्लेख करेल- जसे त्याने येशूपुढे शास्त्रवचनांचा उल्लेख केला.

तलवार वापरून फिनहासला वैयक्तिकरित्या काय मिळवायचे होते? काही नाही. दुसरीकडे पाहता, त्याला बरेच काही गमावण्यासारखे होते - खासकरून दयाळू आणि सौम्य असण्याची ख्याती!! त्याने ठार मारलेल्या माणसाच्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून त्याला खूप निंदानालस्ती आणि रागाला तोंड द्यावे लागले असेल. पण देवाच्या नावाचे वैभव आणि सन्मान यामुळेच फिनहास प्रेरित झाला. आणि देवाने फिनहासच्या सेवाकार्यावर शिक्कामोर्तब केले आणि म्हटले, "माझ्या ईर्ष्येने तो ईर्ष्यावान झाला " (गणना २५:११). अंतिम छाननीत, देवाच्या मान्यतेची मोहोर असणे ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे. देव फिनहासबद्दल पुढे म्हणाला , "म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो; कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान झाला." (गणना २५:१२,१३). आज अनेक मंडळ्यांमध्ये शांती नाही कारण त्यांनी मानवी पद्धतीने शांती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे - देवाच्या तलवारीचा वापर न करता. याचा परिणाम म्हणजे संघर्ष आणि वाद. ख्रिस्ताची शांती तलवारीने विकत घेतली जाते (जी स्व-जीवनाला ठार करते) - घरात आणि मंडळी या दोन्हींही ठिकाणी.

मंडळीमध्ये नेतृत्व करणाऱ्यांना मंडळीच्या शुद्धतेचे जतन करायचे असेल तर त्यांनी देवाच्या नावाच्या सन्मानासाठी ईर्ष्येने पेटले पाहिजे. दयाळू व सौम्य असल्याचा नावलौकिक मिळवणे हे त्यांनी विसरले पाहिजे आणि त्यांना केवळ देवाच्या नावाच्या वैभवाबद्दल कळकळ असली पाहिजे.

देवाच्या नावाच्या सन्मानाच्या या आवेशामुळेच येशूने चलन बदलणाऱ्यांना व कबुतरविक्रेत्यांना मंदिरातून बाहेर काढले . देवाच्या घराच्या आवेशाने त्याला ग्रासले (योहान २:१७). ख्रिस्तासारखे असणे म्हणजे काय याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ख्रिस्तासारखे असण्यात कोणाला स्वारस्य आहे जर ते त्याला अलोकप्रिय आणि लोक ज्याच्याबद्दल गैरसमजूत करून घेतील असा बनवत असेल?