आपला विश्वास अढळ राहण्यासाठी, तो देवाविषयीच्या तीन तथ्यांवर सुरक्षितपणे आधारित असला पाहिजे - त्याचे परिपूर्ण प्रेम, त्याची संपूर्ण शक्ती आणि त्याचे परिपूर्ण ज्ञान. जर आपल्याला त्याच्या प्रेमाबद्दल खात्री असेल, तर त्याच्या सार्वभौम शक्तीबद्दलही तितकीच खात्री असली पाहिजे.
म्हणूनच येशूने आपल्याला प्रार्थना करताना देवाला "हे आमच्या स्वर्गातील पित्या" असे संबोधून सुरुवात करायला शिकवले.
"आमच्या पित्या" हे आपल्याला त्याच्या परिपूर्ण प्रेमाची आठवण करून देते; आणि "स्वर्गातील" हे आपल्याला आठवण करून देते की तो सर्वशक्तिमान देव आहे, जो पृथ्वीवर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण सार्वभौमत्वाने राज्य करतो. देव असल्यामुळे, तो परिपूर्ण ज्ञानी देखील आहे, आणि म्हणून त्याच्या ज्ञानानुसार तो आपल्या मार्गांची परिपूर्णपणे योजना करतो.
"देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग निर्विवाद आहे (त्याचे ज्ञान परिपूर्ण आहे)... आणि तो माझा मार्ग निर्वेध करतो. (तो माझ्या परिस्थितींची परिपूर्णपणे योजना करतो)" (स्तोत्र १८:३०-३२).
जर देव प्रेम, शक्ती आणि ज्ञानात परिपूर्ण नसता तर, आपल्या विश्वासाला आधार घेण्यासाठी पुरेसा पाया मिळाला नसता. पण तो या तिन्ही बाबतीत परिपूर्ण असल्यामुळे, आपल्याला कधीही डगमगण्याची गरज नाही.
विश्वास म्हणजे, मनुष्याने पूर्ण विश्वासाने देवाच्या परिपूर्ण प्रेमावर, त्याच्या निरपेक्ष शक्तीवर आणि त्याच्या परिपूर्ण ज्ञानावर अवलंबून राहणे.
आपण सर्वजण हे सहज मान्य करू की देवाचे ज्ञान परिपूर्ण आहे. आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे त्याचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा उंच आहेत.
"कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. जसे आकाश पृथ्वीहून उंच आहे, तसेच माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत" (यशया ५५:८-९).
म्हणूनच, तो ज्या प्रकारे कार्य करतो किंवा तो ज्या प्रकारे आपल्या कामांची योजना करतो, ते आपल्याला अनेकदा समजत नाही. जर एखादे मूल आपल्या वडिलांचे सर्व मार्ग समजू शकत नसेल, तर आपणही देवाचे सर्व मार्ग समजू शकत नाही यात काही आश्चर्य नाही. तथापि, जसजसे आपण आध्यात्मिकरित्या वाढू आणि दैवी स्वभावात अधिकाधिक सहभागी होऊ, तसतसे आपल्याला देवाचे मार्ग अधिकाधिक समजू लागतील.
‘सर्व लोक आणि परिस्थितींवर देवाचे पूर्ण सार्वभौमत्व’ हा एक असा विषय आहे, ज्याबद्दल अनेक विश्वासणाऱ्यांच्या मनात शंका राहते. ते तोंडी हे मान्य करतील, पण दैनंदिन जीवनातील परिस्थितीत ते 'कार्य करते' यावर त्यांचा विश्वास नसतो. तरीही, पवित्र शास्त्रामध्ये देवाने आपल्या लोकांच्या वतीने सार्वभौमपणे- आणि अनेकदा अगदी अनपेक्षित मार्गांनी, कसे कार्य केले याची अनेक उदाहरणे आहेत.
आपल्यापैकी अनेकांना देवाने आपल्या लोकांच्या वतीने केलेल्या चमत्कारिक कार्यांची माहिती आहे - जसे की इस्राएल लोकांना मिसरमधून सोडवणे इत्यादी. परंतु, जेव्हा सैतान देवाच्या लोकांवर हल्ला करतो आणि देव पूर्णपणे ती परिस्थिती पालटून टाकतो, या देवाने केलेल्या मोठ्या चमत्कारांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो .
योसेफाचे उदाहरण हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. याकोबाच्या त्या अकराव्या मुलाला तो तीस वर्षांचा होईपर्यंत मिसरचा दुसरा शासक बनवायचे ही देवाची एक योजना होती.
योसेफ एक देवभक्त तरुण होता आणि म्हणूनच सैतान त्याचा द्वेष करत असे . आणि म्हणून सैतानाने त्याच्या मोठ्या भावांना त्याला मारून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. पण देवाने हे सुनिश्चित केले की ते योसेफाचा जीव घेणार नाही. तथापि, त्यांनी त्याला काही इश्माएल व्यापाऱ्याना विकून टाकले. पण तुम्हाला काय वाटते, त्या व्यापाऱ्यांनी योसेफाला कुठे नेले? अर्थातच, मिसरमध्ये! ही देवाच्या योजनेतील पहिल्या टप्प्याची पूर्तता होती!
मिसरमध्ये, योसेफाला पोटीफरने विकत घेतले. ही व्यवस्था देखील देवानेच केली होती. पोटीफरची पत्नी एक दुष्ट स्त्री होती. योसेफावर मोहित होऊन, तिने त्याला वारंवार मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी, जेव्हा तिला दिसले की ती यशस्वी होऊ शकत नाही, तेव्हा तिने योसेफावर खोटा आरोप केला आणि त्याला तुरुंगात टाकले . पण तुम्हाला काय वाटते, योसेफाला तुरुंगात कोण भेटले? फारोचा प्यालेबदार ! देवाने फारोच्या प्यालेबरदारालाही त्याच वेळी तुरुंगात टाकण्याची व्यवस्था केली होती, जेणेकरून योसेफ त्याला भेटू शकेल. ही देवाच्या योजनेतील दुसरी पायरी होती.
देवाची तिसरी पायरी म्हणजे फारोच्या प्यालेबरदाराला दोन वर्षे योसेफाची आठवण न होऊ देणे." तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेविले नाही, तर तो त्याला विसरून गेला, दोन वर्ष लोटल्यावर फारोला एक स्वप्न पडले.... तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला..." (उत्पत्ति ४०:२३; उत्पत्ति ४१:१-९).
देवाने ठरवलेल्या वेळेनुसार, योसेफाला तुरुंगातून सोडवण्याची तीच वेळ होती.
स्तोत्र १०५:१९-२० म्हणते, " त्याच्या सांगण्या प्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला परखिले." मग राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले.
योसेफ आता ३० वर्षांचा झाला होता. देवाची वेळ आली होती. आणि म्हणून देवाने फारोला एक स्वप्न दाखवले. आणि देवाने प्यालेबरदारालाही त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा म्हणून योसेफची आठवण करून दिली. अशा प्रकारे योसेफ फारोसमोर आला आणि मिसर देशाचा दुसरा शासक बनला. योसेफाच्या जीवनातील घटनांसाठी देवाने निवडलेली वेळ यापेक्षा अधिक परिपूर्ण असूच शकत नव्हती!
देवाने ज्या प्रकारे गोष्टींची मांडणी केली, तसा विचार आपण कधीच केला नसता. जर योसेफाच्या जीवनाची योजना आखण्याची शक्ती आपल्याकडे असती, तर आपण कदाचित लोकांना त्याला कोणताही त्रास देण्यापासून रोखले असते. पण देवाने ज्या प्रकारे ते केले तो मार्ग अधिक चांगला होता.
जेव्हा लोकांनी आपल्याशी केलेले वाईट कृत्य देवाच्या आपल्यासाठी असलेल्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी वापरले जाते, तेव्हा तो एक खूप मोठा चमत्कार असतो! सैतानावर मात करण्यात देवाला खूप आनंद होतो, जेणेकरून सर्व गोष्टी त्याच्या निवडलेल्या लोकांच्या भल्यासाठी एकत्र येऊन कार्य करतील .
चला, या घटना आपल्या परिस्थितींना लागू करूया.
वाईट लोकांबद्दल, आपल्यावर मत्सर करणाऱ्या भावांबद्दल, आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्या स्त्रियांबद्दल, मदत करण्याचे वचन देऊन विसरणाऱ्या मित्रांबद्दल किंवा अन्यायकारकपणे तुरुंगात टाकले जाण्याबद्दल आपली वृत्ती कशी असली पाहिजे ?
आपल्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी, या सर्व लोकांचा आणि ते करत असलेल्या त्यांच्या प्रत्येक कृतीचा - मग ती जाणीवपूर्वक केलेली असो वा अपघाताने – एकत्र उपयोग करण्यास देव पुरेसा सामर्थ्यवान आहे यावर आपला विश्वास आहे का? जर त्याने योसेफासाठी असे केले, तर तो आपल्यासाठीही करणार नाही का? तो निश्चितपणे करू शकतो आणि तो करेल ही .
पण मी तुम्हाला सांगतो की, योसेफाच्या जीवनासाठी असलेली देवाची योजना कोण बिघडवू शकल असत. फक्त एकच व्यक्ती - आणि तो स्वतः योसेफ. जर त्याने पोटीफरच्या पत्नीच्या मोहांना बळी पडून शरणागती पत्करली असती, तर देवाने त्याला निश्चितपणे बाजूला सारले असते.
या विश्वात अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी तुमच्या जीवनासाठी असलेली देवाची योजना बिघडवू शकते आणि अयशस्वी करू शकते - आणि ती व्यक्ती तुम्ही स्वतःच आहात. दुसरे कोणीही हे करू शकत नाही. तुमचे मित्रही नाहीत आणि तुमचे शत्रूही नाहीत. देवदूतही नाहीत आणि सैतानही नाही. फक्त तुम्हीच. एकदा आपल्याला हे समजले की, ते आपल्याला आपल्या अनेक भीतींपासून आणि आपले नुकसान करणाऱ्यांबद्दल असलेल्या आपल्या चुकीच्या वृत्तींपासून आपल्याला मुक्त करेल.