WFTW Body: 

आपल्या सर्वांचा अनुभव आहे की काही लोकांच्या घरी गेल्यावर घरासारखे वाटत नाही. परंतु, काही घरांमध्ये आपण प्रवेश केल्यापासून आपल्याला घरासारखे वाटते कारण घरातील लोक आपल्यासोबत आपुलकीने वागतात. ही भावना व्यक्त करणे कठीण आहे; परंतु आपण ही गोष्ट अनुभवलेली आहे.

ख्रिस्ती घर असे असावे ज्याठिकाणी येशूला घरात राहिल्यासारखे वाटेल. घरातील सर्व गोष्टी बघून येशूला आनंद वाटावा. आपण जी पुस्तके वाचतो, जो वार्तालाप करतो, टी.व्ही.वर जे कार्यक्रम पाहतो त्या सर्वांना बघून येशूला आनंद वाटावा. अनेक ख्रिस्ती घरांमध्ये भिंतीवर बायबलमधील वचने टांगलेली असतात. परंतु, त्यापैकी अनेक घरांमध्ये येशूला घरपण वाटत नाही.

तुम्ही कल्पना करा की देवाने आदाम व हव्वेला एकत्र ठेवले तेव्हा त्याचा किती अद्भुत उद्देश असेल. पिता या नात्याने त्याची योजना अद्भुत असेल. देवाने विचार केला असेल की आदाम व हव्वेच्या सुंदर कुटुंबात देवाला प्रथम स्थान दिल्या जाईल. परंतु, फार लवकरच त्यांनी देवाला निराश केले. देवाला त्यांचा राग आला आला नाही; परंतु देवाला वाईट वाटले. आज ख्रिस्ती कुटुंबांची दुर्दशा पाहून देवाला फार वाईट वाटत असेल. अनेक कुटुंबांमध्ये शांती नाही. अनेक कुटुंबांमध्ये भांडणे आहेत. कुटूंब समस्येत असते तेव्हाच ते देवाकडे धाव घेते. जगातील लोक समस्येत सापडल्यावर देवाचा धावा करतात. परंतु ख्रिस्ती या नात्याने आपण तसे नसावे. देव आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक असलेला सेवक नाही की आपण केवळ समस्येतच त्याच्याशी संपर्क साधावा. नाही. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला देव केंद्रस्थानी असावा.

देवाच्या वचनातून आपल्याला सूचना व दिशानिर्देश दिले आहेत जशा एखाद्या उत्पादित वस्तुंवर छापलेल्या असतात. एखादी वस्तू विकत घेताना आपण त्याचे माहिती पुस्तक मागतोच. जर आपण घेतलेली वस्तु नीट कार्य करीत नाही तर आपण दुकानदाराकडे जातो तेव्हा पहिला प्रश्न तो आपल्याला विचारतो, ''तुम्ही माहिती पुस्तक वाचले का व नेमके त्याप्रमाणे केले का?'' वस्तुच्या हमीपत्रावर देखील स्पष्टपणे लिहिलेले असते की छापलेल्या सुचनेप्रमाणे वा निर्देशाप्रमाणे न केल्यास वस्तु बदलून मिळणार नाही किंवा गॅरंटीची अट लागू होणार नाही.

देवाविषयी एक अद्भुत गोष्ट अशी की जेव्हा आपण आपले विस्कळलेले जीवन त्याच्याकडे घेऊन जातो तेव्हा तो आपले ऐकतो व सर्वकाही सुरळीत करितो. त्याची गॅरंटी केवळ एका वर्षाची नसते. तो आजीवन हमी घेतो. जर तुम्ही आपले तुटलेले जीवन त्याच्याकडे घेऊन जाल तर तो ते सरळ करील. ही देवाविषयीची अद्भुत गोष्ट आहे. तो आपला प्रेमळ पिता आहे. एक गोष्ट जाणून घेणे महत्वाचे आहे की जो आपल्याला आपल्या घरामध्ये निवासाकरिता जागा मागत आहे, तो आपला प्रेमळ पिता आहे, तो आपल्या जीवनात येऊ इच्छितो. येशूच्या पुन्हा येण्याच्या दिवसापर्यंत आपण आनंदित असावे अशी त्याची इच्छा आहे.

मी एक अद्भुत गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जीवनात येशू केंद्रस्थानी असल्यास आपल्याला अद्भुत जीवन प्राप्त होईल. आपल्या कुटुंबातील प्रत्येक घडामोडी बघून येशूला आनंद वाटेल. आपला वेळ उपयोगात आणणे, पैशाचा उपयोग व आपले सर्व कार्य बघून येशूला आनंद वाटेल. जर आपण असे चांगले जीवन जगलो तर आपल्या जीवनाच्या शेवटी वा ख्रिस्त येण्याच्या दिवशी जेव्हा आपण त्याच्यापुढे उभे राहू तेव्हा तो म्हणेल, ''शाब्बास''. इतरांनी आपल्याविषयी काय विचार केला हे दुय्यम आहे.

मानवाचा एक गुण असा की तो बाह्य देखावा बघून न्याय करतो. अनेक वर्षे मी असे केले. मी नियम व कानूनला प्रथम स्थान देत होतो तेव्हा असे करीत असे. परंतु, मला स्पष्टपणे कळले आहे की देव अंतःकरण बघतो. आपले अंतःकरण शुद्ध असणे फार महत्वाचे आहे. आपले घर महालासारखे वा झोपडीसारखे असो, बाह्य देखावा महत्वाचा नाही. देव आपले अंतःकरण बघतो. म्हणून आपण खात्री करून घेऊया की आपले अंतःकरण देवाच्या निवासाकरिता पवित्र स्थान असावे.