“तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहातोस ? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील ? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे? अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातील मुसळ काढून टाक; म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल” (मत्तय ७:१-५).
दुर्दैवाने, ख्रिस्ती लोकांमध्ये, लोकांचा न्याय करणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांचा तिरस्कार करणे ही एक अत्यंत, अत्यंत सामान्य रीत बनली आहे. ख्रिस्ती लोकांना, स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे ही एक सामान्य सवय आहे; विशेषतः अशा वेळी, जेव्हा तुम्हाला त्या लोकांबद्दलची सर्व माहितीही नसते. इब्री लोकांस पत्र ९:२७ मध्ये असे म्हटले आहे: “मनुष्याला एकदाच मरणे आणि त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे.” मग सर्वसमर्थ देव या सृष्टीचा निर्माण कर्ता न्याय कधी करतो? या वचनानुसार: “एकदा मरण आणि त्यानंतर न्याय होतो.” याचा अर्थ, देव लोकांचा न्याय केवळ त्यांच्या मृत्यूनंतरच करतो.
तुम्ही लोकांचा न्याय कधी करता? तुम्ही लोकांचा न्याय त्यांच्या मृत्यूपूर्वीच खूप आधी करून टाकता. देव एखाद्या व्यक्तीचा न्याय करण्यापूर्वी, त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत वाट का पाहतो? ती व्यक्ती कदाचित दुष्ट व्यक्ती असू शकेल; तरीही देव म्हणतो: “मला त्याच्याबद्दल आशा आहे. कदाचित तो बदलेल,” आणि म्हणूनच देव वाट पाहतो. कल्पना करा, जर देवाने वधस्तंभावर खिळलेल्या त्या चोराचा जो मृत्यूपूर्वीच स्वर्गात गेला त्याचा न्याय आधीच केला असता तर काय झाले असते? विचार करा, जर देवाने त्याच्या मृत्यूपूर्वी काही मिनिटे किंवा काही तास आधीच त्याचा न्याय केला असता, तर काय झाले असते. ते किती भयानक ठरले असते! शेवटी स्वर्गात जाण्यास तो पात्र ठरला होता; परंतु जर आधीच न्याय झाला असता, तर त्याला दोषी ठरवून नरकाची शिक्षा सुनावण्यात आली असती. देवाने त्याच्या मृत्यूपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर त्याला स्वर्गात नेले. यावरून हे सिद्ध होते की, देव एखाद्या व्यक्तीचा न्याय करण्यापूर्वी, त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत वाट पाहतो. मनुष्य मात्र अधीर असतो आणि लोकांच्या मृत्यूपूर्वीच खूप आधी त्यांचा न्याय करून टाकतो. हाच तर मनुष्याचा मूर्खपणा आहे. कारण त्याला सर्व वस्तुस्थितीची पूर्ण माहिती नसते. त्या व्यक्तीच्या खाजगी आणि आंतरिक जीवनाबद्दल त्याला ९९% काहीच माहिती नसते. त्या व्यक्तीने किती संघर्ष केला आहे किंवा किती प्रार्थना केल्या आहेत, हे त्याला ठाऊक नसते; तरीही तो त्या व्यक्तीचा न्याय करतो. कोणताही प्रामाणिक, निष्पक्ष असा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश इतक्या थोड्या पुराव्यांवरून कधीही निकाल देणार नाही. जर एखाद्या न्यायाधीशाला खटल्याबद्दल केवळ १% माहिती असेल, तर तो म्हणेल: "ऐका, निकाल देण्यापूर्वी मला आणखी पुराव्यांची गरज आहे. तोपर्यंत, मी माझा निर्णय राखून ठेवीन." प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने अगदी असेच म्हटले पाहिजे.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा न्याय करतो, तेव्हा खरे तर आपण आपल्या स्वतःच्या हृदयाची स्थितीच प्रकट करत असतो. नीतीसूत्रे २७:१९ मध्ये म्हटल्याप्रमाणे: "जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते, तशी मनुष्याची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत ." किंवा आरशात पाहिल्यावर माणसाला जसा स्वतःचाच चेहरा दिसतो, तसेच हे आहे. याचा अर्थ असा की, त्या व्यक्तीच्या हृदयात एखादा 'वाईट हेतू' दडलेला आहे अशी जी कल्पना तुम्ही करता, ती केवळ तुमच्या स्वतःच्या हृदयात असलेल्या चुकीच्या दृष्टिकोनाचेच लक्षण असते. तुम्ही अशी कल्पना करता की, ती व्यक्ती नक्कीच एखाद्या चांगल्या हेतूने तसे वागत नसावी. तुम्ही विचार करता: "यामागे नक्कीच एखादा वाईट हेतू असला पाहिजे; कारण मी स्वतः जर असे काही केले असते, तर त्यामागे माझाही हेतू वाईटच असता." अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वतःचेच हृदय उघडे पाडत असता. इतर लोकांचा न्याय करणे हे अत्यंत मूर्खपणाचे लक्षण आहे.
'उधळ्या पुत्राची ' गोष्ट आठवा . त्या कथेत आपण त्या 'थोरल्या पुत्राबद्दल वाचतो. जेव्हा त्याने आपल्या वडिलांना त्या उधळ्या पुत्राच्या परतल्यामुळे आनंद साजरा करताना पाहिले, तेव्हा त्याला खूप राग आला. जेव्हा वडील बाहेर आले आणि त्यांनी त्या थोरल्या पुत्राला विचारले की, "तू आत का आला नाहीस?", तेव्हा लूक १५:३० मध्ये त्याने काय उत्तर दिले ते पहा: "तुझा हा मुलगा..." त्याने त्याला "माझा हा भाऊ" असेही संबोधले नाही. बोलण्याची ही किती तिरस्कारयुक्त पद्धत होती! "त्याने वेश्यांसोबत राहून तुझी सर्व संपत्ती फस्त केली आहे." त्याला हे कसे समजले? आपला धाकटा भाऊ वेश्यांसोबत हिंडत असावा, अशी कल्पना त्याने कशी केली? कोणी येऊन त्याला ते सांगितले होते का? मुळीच नाही. त्याने केवळ असा तर्क केला की, हा माणूस म्हणजेच त्याचा धाकटा भाऊ नक्कीच वेश्यांवर पैसे उधळत असावा. कदाचित हे पूर्णपणे सत्य नसेल . कदाचित तो मद्यपान करत असेल किंवा मूर्खपणाने पैसे उधळत असेल; पण कदाचित त्याने ते पैसे वेश्यांवर खर्च केले नसतील. परंतु, जेव्हा तुमचा दृष्टिकोन, जसा त्या थोरल्या पुत्राचा आपल्या धाकट्या भावाविषयी होता तसा चुकीचा असतो, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीबद्दल नेहमीच सर्वात वाईट गोष्टींची कल्पना करत असता. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल वाईट कल्पना करता, तेव्हा तुम्ही हे ओळखू शकता की समस्या त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे. ती दुसरी व्यक्ती कदाचित आपल्या पित्यासोबत जेवणाच्या टेबलावर बसून पुष्ट वासराचा आस्वाद घेईल, आणि तुम्ही घराबाहेर राहाल .
उधळ्या पुत्राची गोष्ट ही अशी गोष्ट आहे, जिच्या सुरुवातीला धाकटा मुलगा घराबाहेर असतो आणि मोठा मुलगा घरात असतो. गोष्टीच्या शेवटी, धाकटा मुलगा घरात असतो आणि मोठा मुलगा घराबाहेर असतो, कारण तो लोकांचा न्याय करत असतो. अपुऱ्या माहितीच्या आधारे लोकांचा न्याय केल्यामुळे तुम्ही पित्याच्या घराबाहेर राहाणार नाही याची खात्री करा. सर्वात सुरक्षित गोष्ट म्हणजे न्याय न करणे.
न्याय करू नका. येशू म्हणतो, जर तुम्ही न्याय करत असाल, तर तुम्ही काय करत आहात, तुमच्या स्वतःच्या डोळ्यात मुसळ असताना, तुम्ही तुमच्या भावाच्या डोळ्यातील लहानशा कुसळाचा न्याय करत आहात का? त्याने हेच म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात असलेले हे मुसळ काय आहे ? तुमच्या डोळ्यात खरोखरचे मुसळ असू शकत नाही. पण येशू अतिशयोक्ती करत आहे, हे दाखवण्यासाठी की त्या भावाच्या पापाच्या तुलनेत तुमचे पाप किती गंभीर आहे. मान्य आहे, कदाचित त्याने खरोखरच फार मोठी चूक केली असेल. परंतु त्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या प्रेमशून्य वृत्तीमुळे, त्या व्यक्तीचे पाप जे केवळ एका कुसळासारखे आहे, त्याच्या पापाच्या तुलनेत तुमचे पाप एका मुसळासारखे आहे .
कदाचित तो वेश्यांकडे गेला असेल. ठीक आहे, ते पाप आहे. पण तरीही, त्याच्याबद्दलच्या तुमच्या प्रेमशून्य वृत्तीच्या तुलनेत ते पाप सुद्धा एका कुसळासारखे आहे. तुमचे पाप एका मुसळासारखे आहे. प्रभू म्हणतो की इतरांबद्दलची तुमची प्रेमशून्य वृत्ती काढून टाका. प्रभू म्हणतो की त्या व्यक्तीबद्दलची प्रेमशून्य वृत्ती तुम्हाला सतत त्या व्यक्तीमध्ये दोष शोधायला लावते. ती व्यक्ती जे काही करते, तुम्ही त्यामागे चुकीचा हेतू लावता. ती व्यक्ती काहीही चांगले करू शकत नाही. ती व्यक्ती तुमच्या नजरेत दुष्ट आहे, पण त्या व्यक्तीबद्दल इतकी प्रेमशून्य वृत्ती बाळगून तुम्ही स्वतः किती दुष्ट आहात हे तुम्हाला दिसत नाही. म्हणून परमेश्वर काय म्हणतो ? कल्पना करा की एखाद्या माणसाची दृष्टी खूप कमी आहे. तुमच्या डोळ्यात असलेले कुसळ काढण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीकडे जाल का? मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्यांमुळे जवळजवळ अंध असलेल्या नेत्रतज्ज्ञाकडे तुम्ही जाल का? तो तुमच्या डोळ्यात पाहून त्यातील एक लहानसा कुसळ कसा काढू शकेल? अश्या व्यक्तीच्या जवळपासही जाण्याची मी कधी इच्छा करणार नाही.
परमेश्वर हेच म्हणत आहे. तुमच्या डोळ्यात एक मोठे मुसळ असताना, ज्यामुळे तुम्हाला नीट दिसत नाही, अशा स्थितीत तुम्ही तुमच्या भावाला, “मला तुझ्या डोळ्यातील कुसळ काढू दे,” असे कसे म्हणू शकता? असे करूण तुम्ही त्याच्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकता. परंतु प्रभू म्हणतो, “अरे ढोंगी! तुझा हा प्रेमशून्य दृष्टिकोन पाहा.” मत्तय ७:५ नुसार, प्रत्येक व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेमशून्य दृष्टिकोन ठेवते आणि त्या व्यक्तीचा न्याय करते, ती ढोंगी आहे. सर्वप्रथम, हा प्रेमशून्य दृष्टिकोन काढून टाका, म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. मग तो भाऊ स्वतःहून तुमच्याकडे येऊन म्हणेल, “ भावा, कृपया माझ्या डोळ्यातील कुसळ तू काढू शकशील का?” जेव्हा तुम्ही अशा स्थितीत येता, तेव्हा ते किती अद्भुत असते, नाही का?