WFTW Body: 

प्रकटीकरण १२:१० मध्ये आपण वाचतो की, सैतान सतत रात्रंदिवस सर्व विश्वासणाऱ्यांवर देवासमोर दोषारोप करत असतों. हे सैतानाचे पूर्णवेळ कार्य आहे ज्यात तो सदैव व्यस्त असतों. आणि या कार्यात त्याचे अनेक सहकारी आहेत — दुर्दैवाने, अनेक विश्वासणारेही त्यात आहेत. असे असंख्य विश्वासणारे आहेत जे या दोषारोप करण्याच्या कार्यात सैतानासोबत हातमिळवणी करून काम करत आहेत.

आदामाने एदेन बागेत पाप करताच, सैतानाने आपला “दोषारोप करण्याचा स्वभाव” आदामाला दिला. आणि म्हणून, जेव्हा देव आदामाकडे आला आणि त्याने त्याला विचारले की ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय ? तेव्हा आदामाने स्वतःचे पाप कबूल करण्याऐवजी, सर्वात पहिली गोष्ट केली ती म्हणजे आपल्या पत्नीवर दोषारोप करणे, आणि म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिनेच मला ते फळ खायला दिले” (उत्पत्ति ३:१२).

लहानपणापासूनच, आपण सर्वजण इतरांमध्ये दोष शोधायला आणि लोकांवर दोषारोप करायला शिकलो आहोत. जसजसे आपण मोठे होतो, तसतशी दोषारोप करण्याची ही वृत्ती अधिक मार्मिक आणि द्वेषपूर्णपणे प्रकट होते. दुःखद सत्य हे आहे की, ही दोषारोप करण्याची वृत्ती अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये — अगदी त्यांचा नवीन जन्म झाल्यानंतर अनेक वर्षांनीसुद्धा आढळते!

करिंथकरांस दुसरे पत्र ५:१७ म्हणते, “जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो एक नवीन उत्पत्ति आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवीन झाले आहे.”

जेव्हा आपला नवीन जन्म होतो, तेव्हा इतरांविषयीचा आपला दृष्टिकोन नवीन झाला पाहिजे — अगदी येशूचा जसा दृष्टिकोन होता तसा — जो आपल्याविरुद्ध पाप करणाऱ्यांवर दोषारोप करण्याऐवजी त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. तथापि, आपल्या दृष्टिकोनात असे परिवर्तन तेव्हाच होईल, जेव्हा आपण देवाला सहकार्य करू. फिलिप्पैकरांस पत्र २:१२ आपल्याला सूचित करते की, आदामाकडून वारसा म्हणून मिळालेल्या सर्व चुकीच्या वृत्तींपासून “आपले तारण साधून घ्या ”. विश्वासणारे, - “आपले तारण साधून घ्या ”- ही आज्ञा गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून ते आदामाच्या मुलांप्रमाणे इतरांवर दोषारोप करत राहतात. देवाच्या मुलांच्या या दुष्ट वर्तनामुळे, प्रभू आणि त्याची मंडळी या दोघांचीही लोकांसमोर खूप बदनामी होते.

योहान ८:४ मध्ये, आपण वाचतो की परूशींनी व्यभिचार करताना पकडलेल्या एका गरीब स्त्रीवर आरोप केला. तिला पापाच्या जीवनातून वाचवण्यात त्यांना अजिबात रस नव्हता. त्यांना फक्त स्वतःची 'नीतिमत्ता' सिद्ध करायची होती आणि ती स्त्री किती भयंकर पापी होती हे दाखवायचे होते. तिथे उभे राहून, त्यांनी त्या गरीब स्त्रीकडे आरोप करणारी बोटे दाखवली — अगदी जसे त्यांचा पूर्वज, आदामनी हव्वे बरोबर केले. आणि त्याद्वारे त्यांनी हे उघड केले की, त्यांच्या अंतःकरणात, ते दोषारोप करणाऱ्या सैतानाच्या संगतीत होते. म्हणूनच येशूने विशेषतः परूशांना सांगितले की, सैतान त्यांचा पिता आहे (योहान ८:४४).

येशू अशा स्त्रियांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी आला होता – त्यांना दोषी ठरवण्यासाठी नाही. योहान ३:१७ मध्ये, आपण वाचतो की देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले.

आरोप आणि दैवी सुधारणा यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रकटीकरण अध्याय २ आणि ३ मध्ये, प्रभूने योहानाला पाच मंडळ्यांच्या चुकणाऱ्या वडीलजनांना दैवी सुधारणा देण्याची आज्ञा दिली. त्याचप्रमाणे, पवित्र आत्म्याने पौलाला करिंथ, गलातिया आणि थेस्सलनीका येथील मंडळ्यांना ईश्वरी सुधारणा देण्याची आज्ञा दिली. अशी सुधारणा ही एक आत्मिक गोष्ट आहे – आणि देव कधीकधी आपल्या अभिषिक्त सेवकांना आपल्या लोकांना अशी सुधारणा देण्यासाठी बोलावतो. परंतु अशी सुधारणा नेहमी प्रेमानेच सांगितली जाईल.

आरोप करण्याची वृत्ती ओळखणे सोपे आहे. ती नेहमी आपल्याला न आवडणाऱ्या लोकांबद्दल नकारात्मक वृत्तीने व्यक्त केली जाते. तुम्ही तुमच्या प्रियजनांवर कधीही अशा प्रकारे आरोप करणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांवर इतर लोकांसमोर कधीही आरोप करणार नाही. म्हणून, तुम्ही पाहू शकता की लोकांबद्दलच्या प्रेमाच्या अभावामुळेच तुमच्या आतून आरोप करण्याची वृत्ती बाहेर येते.

ईश्वरी सुधारणेची सेवा प्रभूने केवळ त्याच्या विश्वासू सेवकांवर सोपवली आहे — जसे की प्रेषित योहान आणि पौल. प्रभू प्रत्येकाला अशा सेवेसाठी बोलावत नाही. म्हणून सावध रहा. जेव्हा तुम्ही ‘आरोप करण्याचे काम ’ करत असता, तेव्हा तुम्ही सुधारणेची ईश्वरी सेवा करत आहात असा स्वतःचा सहज भ्रम करून घेऊ शकता.

जर तुम्ही दोषारोप करण्याची ही वृत्ती टिकवून ठेवली, तर जसा त्याने परुश्यांचा विरोध केला, तसाच प्रभू तुमचाही विरोध करेल. दोषारोप करण्याचे कार्य सैतानाचे आहे, आणि विश्वासणारे म्हणून आपण त्यात अजिबात सहभागी होता कामा नये.

सर्वप्रथम आपण हे ओळखले पाहिजे की, सैतान आणि त्याचे दुरात्मे आपल्याला आपल्या सहविश्वासूंमध्ये आढळणाऱ्या कोणत्या ना कोणत्या चुकीबद्दल त्यांच्यावर दोषारोप करण्यास सतत प्रवृत्त करतील. आणि ते दुरात्मे तुम्हाला तुमच्या सहविश्वासूंमधील अनेक दोष दाखवतील, जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर दोषारोप करण्यास प्रवृत्त व्हाल. जर तुम्ही या मोहाला बळी पडलात, तर तुम्ही स्वतःला सैतानी शक्तींच्या प्रभावाखाली आणाल. अनेक विश्वासणारे अनेक आजारांनी ग्रस्त असण्याचे हे एक कारण असू शकते.

ज्याप्रमाणे एखादा शल्यचिकित्सक रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाची गाठ शस्त्रक्रियेने पूर्णपणे काढून टाकतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातून ही दोषारोप करण्याची वृत्ती पूर्णपणे काढून टाकण्यासाठी अत्यंत कठोर असले पाहिजे. आपण हे स्पष्टपणे पाहिले पाहिजे की 'दोषारोप करण्याची वृत्ती' ही कोणत्याही कर्करोगापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे.

जन्मापासूनच, आपल्या सर्वांना इतरांमध्ये दोष शोधण्याची ही वाईट सवय लागलेली असते. आपण अनेक वर्षे लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल टीकात्मक बोलत आणि त्यांच्यावर आरोप करण्यासाठी त्यांच्यात काही ना काही दोष शोधत घालवली आहेत.

शेवटी : येशूने परुश्यांना काय सांगितले होते ते आपण आठवूया, की जे पापी नाहीत त्यांनाच इतरांवर दगडफेक करण्याचा अधिकार आहे. म्हणून, आपल्यापैकी कोणीही कोणावरही आरोप करण्यास पात्र नाही.

प्रभू आम्हा सर्वांना या सैतानी आत्म्यापासून पूर्णपणे मुक्त करो.

आमेन.