लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रकटीकरण ३:१-६ म्हणते: सार्दीसमधील मंडळीच्या दूताला लिही……सार्दीसमधील दूत असा होता की ज्याने इतरांसमोर एक जबरदस्त आध्यात्मिक व्यक्ती असल्याचा लौकिक मिळवलेला होता. पण त्याच्याविषयी असलेले प्रभुचे मत सार्दीसमधील त्याच्या सोबतच्या विश्वासणाऱ्यांच्या अगदी उलट होते. हे दर्शविते की सार्दीसमधील बहुतेक विश्वासणारे किती दैहिक व चटकन फसणारे होते.

९०% पेक्षा जास्त विश्वासणारे दैहिक आणि आध्यात्मिक उपदेशक यांच्यात भेद करण्यास असमर्थ आहेत. आणि ९९% पेक्षा जास्त विश्वासणारे मानव-जीव-सामर्थ्य आणि पवित्र-आत्मा-सामर्थ्य यांत फरक करण्यास असमर्थ आहेत. आध्यात्मिक दानांचे प्रदर्शन व वापर यांद्वारे बरेच विश्वासणारे प्रभावित होतात आणि अशाप्रकारे ते एखाद्या उपदेशकाचे किंवा वडिलांचे मूल्यमापन करतात. आणि अशाच प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. देव मात्र अंतःकरणाकडे पाहतो. सार्दीस येथील दूताला कदाचित आत्म्याची दाने मिळालेली असतील. पण तो आध्यात्मिकरित्या मेलेला होता. आपल्या सर्वांसाठी ही एक चेतावणी आहे जे याकडे दुर्लक्ष करतात की : आपल्या सोबतच्या विश्वासणाऱ्यांपैकी ९९% लोकांचे आपल्याबद्दल असलेले मत १००% चुकीचे असू शकते! आपल्याबद्दलचे देवाचे मत त्यांच्या मताच्या अगदी विरुद्ध असू शकते. हेच मंडळीलाही लागू आहे. इतर लोक कदाचित मंडळीला "आध्यात्मिकरित्या जिवंत" समजत असतील. पण ती कदाचित आध्यात्मिकरित्या मेलेली आहे हे देवाला ठाऊक असेल. आणि याउलटही खरे आहे. ज्या मंडळींना देव आध्यात्मिकदृष्ट्या जिवंत मानतो त्यांना अविवेकी लोक मृत मानू शकतात.

बरेचसे विश्वासणारे सभांना येताना त्यांचे प्रेमाने होणारे स्वागत, मंडळीचा आकार, सभांमध्ये गोंगाट आणि भावनांचे प्रमाण, गाण्याची सांगीतिक गुणवत्ता, संदेशाची बौद्धिक सामग्री आणि दानार्पणाची रक्कम यांवरून एखाद्या मंडळीचे मूल्यमापन करतात!! परंतु या कोणत्याही गोष्टीमुळे देव प्रभावित होत नाही.

देव त्याच्या मंडळीचे मूल्यमापन सदस्यांच्या अंतःकरणात सापडणारी ख्रिस्तासारखी नम्रता, शुद्धता व प्रीति आणि स्वकेंद्रितपणापासून मुक्त असणे यांवरून करतो. मंडळीचे देवाने केलेले मूल्यमापन आणि मनुष्याने केलेले मूल्यमापन हे परस्परांशी पूर्णपणे भिन्न असू शकते. खरं तर, ते सहसा असतेच. सार्दीसमध्ये ईजबेल नव्हत्या आणि बलाम किंवा निकलाईतचे कोणतेही शिक्षण नव्हते. पण त्यांच्यात काहीतरी अधिक वाईट होते - ढोंगीपणा. सार्दीस येथील दूताला त्याने स्वतःसाठी उभारलेल्या प्रतिष्ठेबद्दल छुपे समाधान वाटले असेल. नाहीतर त्याचा शेवट ढोंगीपणात झाला नसता. इतरांद्वारे आध्यात्मिकदृष्ट्या जिवंत म्हणून ओळखले जाण्यात काहीही चुकीचे नाही जर त्यांच्या मतामुळे आम्हाला समाधान मिळत नसेल तर. परंतु जर आपण प्रभूसाठी जे करीत आहोत त्यात स्वत:चे नाव मोठे करू पाहत असाल तर आपला शेवट नक्कीच देवाला समोर ठेवून नव्हे तर जगाला समोर ठेवून जगण्यात होईल. मग आपल्याला हे मान्य करावे लागेल की माणसाचे मत व्यर्थ आहे हे आम्हांला कळले नाही.

ख्रिस्तीजगत अशा उपदेशकांनी भरलेले आहे जे स्वतःचे नाव व्हावे म्हणून सतत गोष्टी करत असतात आणि अहवाल लिहित असतात. या सर्वांचा शेवट सार्दीस येथील दूताप्रमाणे होईल. आणि त्यांची कामे देवासमोर परिपूर्ण नसल्यामुळे शेवटच्या दिवशी परमेश्वर त्यांचा न्याय करील. जर मनुष्यांना खुश करणे हा आमचा हेतू असेल तर आमची कामे देवासमोर परिपूर्ण होणे अशक्य आहे. सार्दीस येथील दूतसुद्धा आध्यात्मिकरित्या झोपी गेला होता.

येशूने त्याच्या शिष्यांना सावध राहण्याची व प्रार्थना करण्याची अत्यंत गरज असल्याबद्दल इशारा दिला, यासाठी की त्याच्या येण्यासाठी तयार राहावे - सांसारिक काळजी आणि धनाबद्दल प्रेम असणे हा एक उत्तम विश्वासणाऱ्यांनाही झोपायला लावण्याचा मार्ग आहे (लूक २१:३४-३६ पहा). जेव्हा माणूस झोपलेला असतो तेव्हा आपल्या सभोवतालच्या वास्तविक जगात घडणाऱ्या गोष्टींविषयी तो अजाण असतो. तो त्याच्या स्वप्नांच्या अवास्तव जगाबद्दल अधिक सजग असतो. आध्यात्मिकदृष्ट्या देखील झोपी जाणार्‍यांच्या बाबतीत असेच आहे. ते देवाच्या राज्याविषयी, त्यांच्या सभोवतालच्या हरवलेल्या जीवांविषयी आणि सार्वकालिक वास्तवाविषयी अजाण आहेत. ते भौतिक संपत्ती, आनंद, आराम, ऐहिक सन्मान आणि कीर्ती या अवास्तव, तात्पुरत्या जगासाठी जिवंत आहेत. सार्दीस येथील मंडळीच्या दूताबद्दल, असेच होते.

प्रभू त्याला जागे होण्यासाठी बोध करतो - दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर स्वप्नांचे अवास्तविक जग (भौतिकवादाचे जग) सोडून देणे आणि त्याच्या जीवनातील काही गोष्टी बळकट करणे यासाठी प्रोत्साहित करतो, ज्या गोष्टींचा अद्याप मृत्यू झाला नव्हता परंतु; ज्या त्याला आध्यात्मिक मृत्यूकडे ओढत होत्या (वचन २). निखारे अजून पूर्णपणे विझले नव्हते. पण लवकरच त्यांना “प्रज्वलित” करावे लागेल किंवा ते पूर्णपणे विझतील (२ तीमथ्य १: ६) परमेश्वर त्याला सांगतो की त्याची कामे देवाच्या दृष्टीने परिपूर्ण नव्हती (वचन २). "परिपूर्णता" या शब्दाला बरेच विश्वासणारे घाबरतात. परंतु इथे आपण पाहतो की परमेश्वराची अपेक्षा होती की या दूताची कामे देवाच्या दृष्टीने परिपूर्ण असावीत.

आध्यात्मिक परिपूर्णता हा एक व्यापक विषय आहे. परंतु इथे असा अर्थ आहे की या वडिलाची कामे मनापासून केवळ देवाची मंजुरी मिळवणे या एकाच हेतूने केली गेली नाहीत. त्याची कामे चांगली कामे होती - अशा प्रकारे तो आध्यात्मिकरित्या जिवंत आहे असा तो नावाजला गेला. परंतु ती कामे देवाच्या गौरवासाठी केली गेली नाहीत. ती मनुष्यांना प्रभावित करण्यासाठी केली गेली होती. आणि म्हणूनच ती सर्व मृत कामे होती. "त्याच्या पवित्र कार्यात दोष" होता (निर्गम २८:३८). देवाने त्याला स्विकारण्यापूर्वी त्याला आत्म्याच्या या अशुद्धतेपासून स्वत:ला शुद्ध करावे लागले (२ करिंथकरांस पत्र ७: १). मनुष्यांचा सन्मान मिळविण्यासाठी केलेली चांगली कामे म्हणजे मृत कामे. परिपूर्णतेची पहिली पायरी म्हणजे सर्वकाही देवाला समोर ठेवून करणे. जर आपण येथे प्रारंभ केला नाही तर आपण कोठेही जाऊ शकणार नाही. प्रार्थना असो वा उपवास असो किंवा इतरांना मदत करणे किंवा काहीही असो, आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला पाहिजे तो हा की: "मी आता कोणा मनुष्याचा विचार करीत आहे का जो मला हे करताना पाहिल आणि माझे कौतुक करील किंवा फक्त देवाच्या गौरवासाठी मी हे करत आहे?" चुकीचा हेतू बर्‍याच चांगल्या कामांना भ्रष्ट करतो आणि देवाच्या दृष्टीने त्यांना अपरिपूर्ण असे करतो.