लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

स्तोत्र २३ हे मेंढपाळाचे स्तोत्र आहे. जेव्हा प्रभू आमचा मेंढपाळ आहे, तेव्हा आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही (वचन १). तो आपल्याला विश्रांती देतो. तो आपल्याला चालवतो. तो आम्हाला ताजेतवाने करतो. तो आपल्याला मार्गदर्शन करतो. बर्‍याचदा आपण प्रभूसाठी काय करावे याचा विचार करतो. परंतु येथे प्रभू आपल्यासाठी काय करतो यावर जोर देण्यात आला आहे. जर आपण प्रथम देवाला आपल्यामध्ये कार्य करु देतो तरच आपण देवासाठी प्रभावी ठरू शकतो. आम्हाला कोणत्याही वाईट गोष्टीची भीती वाटत नाही कारण तो आमच्याबरोबर आहे. तो आपल्यासाठी जेवणाचे मेज तयार करतो आणि आपल्या डोक्यावर तेलाने अभिषेक करतो. मग आमची पात्रे भरून वाहू लागतात आणि चांगुलपणा व दया आमच्या मागे सर्वत्र येतात जोपर्यंत आम्ही आमच्या अनंतकाळच्या घरी पोहोचत नाही.

स्तोत्र ३४ मध्ये परमेश्वराचे नीतिमानांचा साहाय्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे. परमेश्वराने दाविदाला मरणापासून सोडवल्यानंतर त्याने हे स्तोत्र लिहिले जेव्हा अबीमलेखासमोर वेडा असल्याचे नाटक त्याने केले . म्हणून तो म्हणतो, “परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला .परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.”(वचन १ ,६, ८). दावीदाने ओळखले की परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. (वचन ७) त्याने हे देखील पाहिले की “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात आणि परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.” (वचन १५, १८) दावीद आपल्या अनुभवावरून पुढे म्हणतो की “नीतिमानाला फार कष्ट होतात" (वचन १९). अशी कधीही कल्पना करू नका की जर आपण नीतिमान असाल तर आपल्याला समस्या उद्भवणार नाहीत. आपल्याला अधिक समस्या असतील.“तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.” (वचन १९). मग आणखी एक मशीहाविषयीची भविष्यवाणी आहे: “त्याची सर्व हाडे तो सांभाळतो; त्यांतले एकही मोडत नाही.”(वचन २०) - जे वधस्तंभावर पूर्ण झाले.

स्तोत्र ६६ मध्ये, दावीद त्याला आशीर्वादित स्थितीत आणल्याबद्दल देवाची स्तुती करतो. परंतु हे अनेक परिक्षांमधून झाले. वचन १० ते १२ मध्ये आपण वाचतो की देवाने दाविदाला आध्यात्मिक समृद्धीच्या ठिकाणी आणण्यापूर्वी आजारपण, अग्नी, पाणी आणि मानवी जुलूम यांतून नेले. येथे अनुवादित केलेला "समृद्ध स्थळ" हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये फक्त एका ठिकाणीच वापरला गेला आहे - स्तोत्र २३:५ मध्ये - जिथे त्याचे भाषांतर "काठोकाठ भरून वाहणे" असे केले गेले आहे. म्हणूनच आशीर्वादांनी भरून वाहणारे आयुष्य जगण्याचा मार्ग परीक्षा आणि क्लेशातून जातो. वचन १८ हे आणखी एक महत्त्वाचे वचन आहे:"माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता". प्रार्थना म्हणजे देवाशी दूरध्वनीवर संभाषण करणे. पण जर आपल्या अंतःकरणात कबूल न केलेले पाप असेल तर देव आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी दूरध्वनी उचलणारही नाही.

स्तोत्र ९१ हे "परात्पराच्या गुप्त स्थली" वसणाऱ्या मनुष्याच्या आशिर्वादितपणाची आणि सुरक्षिततेची घोषणा करते. आपल्यासाठी हे गुप्त स्थळ म्हणजे येशूची जखमी कुस आहे. "सर्वसमर्थाच्या सावलीत" राहणे असे दर्शवते की देव आमच्यापुढे जात आहे आणि आम्ही त्याच्या सावलीत चालतो. (वचन १) जगातील सर्वांत सुरक्षित जागा म्हणजे देवाच्या परिपूर्ण इच्छेच्या केंद्रस्थानी राहणे. प्रभू आपल्या दोन्हीही शत्रूंपासून सुटका करण्याचे अभिवचन देतो - सैतान (सापळ्यात अडकवणारा) आणि पाप (प्राणघातक रोग) (वचन ३). तो आम्हांला उघडपणे दिसणाऱ्या पापांपासून (दिवसाचे अरिष्ट) आणि सहजपणे न दिसणाऱ्या, फसवणाऱ्या (रात्रीचे अरिष्ट) पापांपासून सोडवेल. (वचन ५, ६) जरी आपल्या आजूबाजूच्या ११,००० ख्रिस्ती लोकांनी विजयी जीवनावर विश्वास ठेवला नाही तरी तो आम्हांला पापात पडण्यापासून दूर राखील. (वचन ७).आपल्याला कदाचित अनेक संकटांतून जावे लागेल पण त्यामुळे आपली कोणतीही हानी होणार नाही (वचन १०). जोपर्यंत आपण देवाच्या इच्छेत चालत आहोत तोपर्यंत आपली काळजी घेण्यासाठी त्याने देवदूत नेमले आहेत. सैतान (सिंह आणि सर्प) आपल्या पायांखाली ठेचला जाईल. (वचन १३) देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल, आपल्याला उच्च स्थळी ठेवेल, दीर्घ आयुष्य देईल आणि आपल्याला सोपवलेले कार्य पूर्ण होण्याआधी आपण मरणार नाही. (वचन १५,१६).