लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

अब्राहामाने "विश्वासाने सबळ होऊन देवाचा गौरव केला; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती." (रोम.४:२०,२१).

जेव्हा अशक्य परिस्थितीत आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपणही देवाचा मोठा गौरव करतो.आपल्याला माहीत आहे की देव हाताळू शकत नाही अशी कोणतीही समस्या नाही . सैतानाने निर्माण केलेल्या प्रत्येक समस्येचे तो निराकरण करू शकतो - कोठेही. अगदी राष्ट्रपतीचे हृदयही त्याच्या हातात आहे आणि ते तो आपल्या बाजूने फिरवू शकतो (नीतिसूत्रे २१:१).

त्यामुळे आपण देवावर नेहमीच विश्वास ठेवायला हवा, काहीही झाले तरी देव सैतानाला आपल्या पायाखाली तुडवेल, अशी आपल्या विश्वासाची कबूली दिली पाहिजे. मग तो काहीही करत असला तरी आपण सैतानावर विजय मिळवू. मी माझ्या स्वत: च्या आयुष्यात हे वारंवार घडताना पाहिले आहे.

देवाला आपल्याला पृथ्वीवर आध्यात्मिक शिक्षण द्यायचे असल्याने जसजसा काळ पुढे जाईल तसतसे आपल्या समस्या अधिकाधिक कठीण होतील, असे आपण गृहीत धरले पाहिजे, ज्याप्रमाणे शाळेतही जसे आपण वरच्या वर्गात जात होतो तसे आपल्या गणिताच्या समस्या कठीण आणि अधिक कठीण होत गेल्या. पण गणिताच्या कठीण समस्येचे आव्हान टाळण्यासाठी आम्हाला कधीही खालच्या वर्गात परत जायची इच्छा कधीच झाली नसती! म्हणून जसे आपण अनुग्रहात वाढत जातो आणि देव आपल्याला कठोर परिस्थितीचा सामना करण्यास परवानगी देतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटायला नको. अशा प्रकारे आपण एक अधिक सबळ, धाडसी आणि देवावर भरवसा असलेले ख्रिस्ती बनू.

आपला विवेक आपल्याला कशाबद्दलही दोष देणार नाही याची नेहमी काळजी घ्या. तरच आपण देवासमोर धैर्याने येऊन आपल्या समस्या सोडविण्यास सांगू शकतो (१ योहान ३:२१, २२). देवाला परिक्षेत शहाणपणाची मागणी करणे म्हणजे आपल्याला भेडसावत असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय विचारणे होय (याकोब १:१-७ पहा) . देवाकडे प्रत्येक समस्येवर उपाय असल्यामुळे याकोब म्हणतो की, जेव्हा आपण विविध प्रकारच्या परिक्षांचा सामना करतो तेव्हा आपण त्याला आनंद म्हणून गणले पाहिजे - कारण जेव्हा तो आपल्यासाठी समस्या सोडवतो त्याद्वारे आपल्याला देवाचा एक नवीन अनुभव येऊ शकतो.

आपण असे फक्त दोनवेळा वाचतो की "येशूला आश्चर्य वाटले" (केजेव्ही अनुवाद) - एकदा जेव्हा त्याला विश्वास दिसला तेव्हा आणि दुसरा जेव्हा त्याला अविश्वास दिसला. जेव्हा रोमी शताधिपती म्हणाला की येशू एक शब्द बोलू शकतो आणि त्याचा सेवक (जो अनेक मैल दूर होता) बरा होईल, तेव्हा येशूने त्याच्या विश्वासावर आश्चर्य व्यक्त केले (मत्तय ८:१०). मग येशू जेव्हा आपल्याच गावी आला आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तेव्हा त्यांच्या अविश्वासामुळे तो आश्चर्यचकित झाला (मार्क ६:६). शताधिपती इतका नम्र होता की त्याने प्रभूला सांगितले की तो स्वतःला, येशूने त्याच्या घरात प्रवेशही करावा यालायक समजत नाही.

एक कनानी स्त्री, जिने एकदा प्रभूला आपल्या मुलीला बरे करण्यास सांगितले होते (जी अनेक मैल दूर होती), ही आणखी एक व्यक्ती होती जिची येशूने तिच्या विश्वासाबद्दल खूप प्रशंसा केली (मत्तय १५:२८). जेव्हा येशूने कुत्र्यांना मुलांची भाकरी दिली जात नाही हे उदाहरण वापरले तेव्हा तिने लगेच आपले मेजाच्या पायथ्याशी असलेल्या कुत्र्याप्रमाणे असणारे स्थान नम्रतेने स्वीकारले. ती नाराज झाली नाही. या दोन्ही घटनांमध्ये आपल्याला एक गोष्ट समान दिसते: नम्रता आणि विश्वास यांच्यात खूप जवळचा संबंध आहे. आपण जितके नम्र असू, आपला स्वतःवर तितकाच कमी विश्वास असेल आणि आपल्या स्वत:च्या कलागुणांचा आणि कर्तृत्वाचा विचार आपण जितका कमी करू शकू , तितकाच आपला विश्वास वाढेल. आपण जितके गर्विष्ठ , तितका आपला विश्वास कमी होईल. आपण परमेश्वरापुढे उभे राहण्यास लायक नाही याची आपल्याला नेहमी जाणीव असली पाहिजे. देवाची प्रचंड कृपा आहे की तो आपल्याला तसे करण्याची परवानगी देतो. आपण ते कधीही गृहीत धरू नये. म्हणून मनापासून नम्रतेचा पाठपुरावा करा.