पर्गम येथील मंडळीमध्ये बलामची शिकवण भरभराटीला आली कारण तेथील वडीलजन माणसांचे गुलाम बनले होते.
देवाच्या सेवकाने नेहमीच स्वतंत्र राहिले पाहिजे. "तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; माणसांचे गुलाम होऊ नका." (१ करिंथकर ७:२३).
बलामच्या शिकवणीचे दोन भाग आहेत. पेत्राने २ पेत्र २:१४, १५ मध्ये या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे - लोभ आणि व्यभिचार.
येशूने म्हटले की जो पैशावर प्रेम करतो तो देवाचा द्वेष करतो आणि जो पैशाला धरून राहतो तो देवाचा तिरस्कार करतो (लूक १६:१३ काळजीपूर्वक वाचा).
जर आपण ते स्पष्टपणे शिकवले नाही, तर बलामची शिकवण आपल्या मंडळीमध्ये भरभराटीला येईल आणि मंडळीतील भाऊ आणि बहिणी पैशावर प्रेम करतील.
परंतु जर आपल्याला येशूने शिकवलेल्या गोष्टी शिकवायच्या असतील तर आपण प्रथम स्वतः पैशाच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे. पैशाच्या बंधनातून मुक्त होण्यापेक्षा राग आणि डोळ्यांच्या वासनेपासून मुक्त होणे सोपे आहे. सततच्या लढाईतूनच आपण या वाईटावर मात करू शकतो.
आपण पैश्याचा लोभ या कडे "सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ" म्हणून पाहिले आहे का (१ तीमथ्य ६:१०)? क्रोध आणि डोळ्यांची वासना यांना वाईट म्हणून ओळखले जाते, परंतु पैशावरील प्रेमाला नाही. आणि म्हणूनच बरेच जण पैशाचे गुलाम आहेत, त्यांना हे फारसे कळत नाही की त्यामुळे ते देवाचा द्वेष करतात आणि त्याचा तिरस्कार करतात.
बहुसंख्य तथाकथित "पूर्ण-वेळ कामगार" बलामसारखे पैशावरील प्रेमाचे गुलाम आहेत. ते श्रीमंत विश्वासणाऱ्यांच्या घरी जातात कारण त्यांना माहित असते की त्यांना त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आणि अशा प्रकारे जेव्हा या श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना त्यांच्या पापांसाठी फटकारले गेले पाहिजे ,तेव्हा त्यांचे तोंड बंद होते. ते अश्या मंडळीमध्ये प्रचार करण्यासाठी प्रवास करतात जिथे त्यांना माहित असते की त्यांना सुंदर भेटवस्तू मिळतील. असे उपदेशक देवाची सेवा कशी करू शकतात? ते अशक्य आहे. ते पैशाची सेवा करत आहेत. येशूने म्हटले आहे की कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही.
नवीन करारानुसार, देवाचा सेवक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी तीन आवश्यक पात्रता आहेत:
त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात पापापासून मुक्त असले पाहिजे (रोमकर ६:२२).
त्याने लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नये (गलतीकर १:१०).
त्याने पैशाचा द्वेष आणि तिरस्कार केला पाहिजे (लूक १६:१३).
आपण नवीन कराराचे सेवक होण्यास पात्र आहोत की नाही हे पाहण्यासाठी या तीन क्षेत्रांमध्ये आपण आपले जीवन सतत तपासले पाहिजे.
जर आपण देवासाठी प्रभावी असू तर पैसा आणि भौतिक गोष्टींचा आपल्या जीवनावर कोणताही प्रभाव नसावा.
आपण भेटवस्तू घेण्याचा देखील द्वेष केला पाहिजे, कारण येशूने म्हटले आहे की "घेण्यापेक्षा जास्त आशीर्वाद देण्यात आहे" (प्रेषितांची कृत्ये २०:३५).
जर आपण आपल्या जीवनात पैशाच्या बंधनातून मुक्त झालो नाही, तर जसे आपण देवावर प्रेम केले पाहिजे किवा त्याची सेवा केली पाहिजे तसे देवावर प्रेम करू शकणार नाही किंवा त्याची सेवा करू शकणार नाही. आणि आपण इतरांना देवावर प्रेम करण्याकडे घेऊन जाऊ शकणार नाही. आपण त्यांना बलामच्या शिकवणीपासून सोडवू शकणार नाही.
बलामच्या शिकवणीचा दुसरा पैलू म्हणजे अनैतिकता. ही शिकवण भाऊ आणि बहिणींना कोणत्याही बंधनाशिवाय एकमेकांशी मुक्तपणे मिसळण्यास प्रोत्साहित करते. आपण प्रकटीकरण २:१४ मध्ये वाचतो की बलामनेच मोआबी मुलींना इस्राएली तरुणांसोबत मुक्तपणे मिसळण्यास प्रोत्साहित केले. यामुळे इस्राएली लोकांमध्ये अशी अनैतिकता निर्माण झाली की देवाने एकाच दिवसात २४,००० लोकांना मारले (गणना २५:१-९).
जेव्हा फीनहासने भाला उचलला आणि त्याने ते थांबवल तेव्हाच इस्राएलवरील देवाचा क्रोध दूर झाला. जेव्हा देवाने फीनहासची कृती पाहिली तेव्हा तो इतका प्रसन्न झाला की त्याने त्याला चिरंतर याजकपद दिले (गणना २५:११-१३). मंडळीमधील भाऊ आणि बहिणींच्या गैरवर्तनाच्या बाबतीत अत्यंत कठोर असलेल्यांचा देव नेहमीच सन्मान करतो.
येथे पुन्हा, वडील म्हणून, आपण आपल्या वैयक्तिक वर्तनाद्वारे एक उदाहरण असले पाहिजे. बहिणींशी आपले वर्तन गंभीर असले पाहिजे आणि त्यांच्याशी सर्व प्रकारचे असभ्य आणि अनावश्यक संभाषण टाळले पाहिजे. ज्या बहिणी नेहमी आपल्याशी बोलू इच्छितात त्यांच्यापासून आपण विशेषतः सावध असले पाहिजे.
जर आपल्याला बहिणींशी बोलायला आवडते, तर आपण देवाच्या मंडळीचे नेतृत्व करण्यास अयोग्य आहात. आपण कधीही बंद खोलीत एकट्या महिलेशी बोलू नये. बहिणींना मार्गदर्शन करतांना ते एखाद्या भावाच्या पत्नीसमोर किंवा दुसऱ्या भावाला सोबत घेऊन करणे नेहमीच चांगले.
जेव्हा शिष्यांनी येशूला शोमरोनातील विहिरीजवळ एका स्त्रीशी बोलताना पाहिले तेव्हा असे लिहिले आहे की "तो एका स्त्रीशी बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले" (योहान ४:२७) - कारण येशू सहसा कधीही एखाद्या स्त्रीशी ती एकटी असताना बोलत नसत. ज्याचे केवळ स्वरूपही वाईट आहे अश्या गोष्टी त्याच्याकडून होऊ नये याची तो काळजी घेत असे. आपल्या सर्वांसाठी येथे एक उदाहरण आहे.