लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

पहिले शमुवेल अध्याय ३० मध्ये, आम्ही काही चित्तवेधक गोष्टी पाहतो. दावीद एका कठीण परिस्थितीत सापडला होता. जेव्हा तो व त्याचे लोक लढाईवर गेले होते तेव्हा अमालेकी लोकांनी येऊन जिथे त्याच्या लोकांची कुटुंबे राहत होती त्या नगराचा नाश केला व त्यांच्या कुटुंबियांना बंदिवान केले. परिस्थिती इतकी बिकट होती की सर्व लोक रडू लागले व त्यांच्या समस्यांबद्दल दावीदालाही दोष देऊ लागले. त्याला दगडमार करून जिवे मारावे अशी त्यांची इच्छा होती (१ शमुवेल ३०: ६). आणि मग आम्ही हे सुंदर शब्द वाचतो: "परंतु दाविदाने प्रभूमध्ये स्वतःला प्रोत्साहित केले (आणि स्वतःला खंबीर केले)" (१ शमुवेल ३०: ६). जेव्हा आमचे मित्र देखील आपल्याविरूद्ध वागतात तेव्हा आपल्यासाठी हे उदाहरण किती छान आहे.

दाविदाने परमेश्वराचा शोध घेतला आणि परमेश्वराने त्याला अमालेकी लोकांचा पाठलाग करण्यास सांगितले आणि सर्व काही परत मिळवून देण्याची हमी दिली (1 शमुवेल 30: 8). पण या अमालेकी लोकांना शोधण्यासाठी कोणत्या दिशेने जायचे हे दाविदाला ठाऊक नव्हते. देवाने त्याला त्यांच्याकडे कसे नेले हे पाहणे अद्भुत आहे. एका मरणपंथाला लागलेल्या अनोळखी व्यक्तीशी दयाळूपणे वागण्याद्वारे हे घडले. दावीद आणि त्याच्या माणसांनी पाहिले की एक मरणासन्न मिसरी वाळवंटात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्यांनी त्याची काळजी घेतली आणि त्याला काही खायला प्यायला दिले. जेव्हा तो ताजातवाना झाला तेव्हा त्यांना समजले की तो आजारी असल्याने अमालेकी लोकांनी त्याला वाळवंटात सोडले होते. (१ शमुवेल ३०: ११-१३). हा तोच होता ज्याने दावीदाला अमालेकी लोकांकडे नेले. हे आपल्याला शिकवते की जेव्हा आपण परक्यांशी दयाळूपणे वागतो तेव्हा देव आपल्याला कशा प्रकारे पारितोषिक देतो. अशा प्रकारे दावीदाने अमालेक्यांचा शोध लावला आणि त्यांचा पराभव केला. मग असे तीनदा लिहिले आहे की, अमालेकी लोकांनी चोरी केलेले “सर्व दावीदाने परत आणले” (१ शमुवेल ३०: १८-२०) - सैतानाने आमच्याकडून चोरलेले सर्व येशूने परत मिळवल्याचे सुंदर चित्र!

लढाई संपल्यावर दावीद छावणीत परतला तेव्हा तेथे २०० माणसे होती जी दावीदासोबत लढाईला जाण्यासाठी फारच दमलेली होती आणि ती दावीदाच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी मागेच राहिली होती. तेव्हा दावीदाच्या काही अधम लोकांनी असे सांगितले की लढाईतील लूट न लढणाऱ्या माणसांशी वाटून घेऊ नये. पण तेथे आपण दावीदाच्या मनाचा मोठेपणा पाहतो. तो म्हणाला की जे लोक सामानाच्या देखरेखीसाठी घरी थांबले होते त्यांना युद्धातील लुटलेल्या वस्तूंचा लढायला गेलेल्या लोकांइतकाच समान वाटा मिळाला पाहिजे. तेव्हापासून इस्राएलात हा कायदा झाला.

या सर्व अडचणी व परिक्षांचा दावीदाने (सुमारे १३ वर्षांच्या कालावधीत) सामना केला आणि तो शेवटी देवाचा माणूस आणि यशस्वी राजा बनला. बऱ्याच वर्षांनंतर, त्याने हे शब्द लिहिले: "कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस. तू आम्हांला जाळ्यांत गुंतवले; तू आमच्या कंबरेला भारी ओझे बांधले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यांवरून स्वारी करायला लावले; आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो, तरी तू आम्हांला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस. मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन; (स्तोत्रसंहिता ६६:१०-१३)