WFTW Body: 

इफिसकरांस पत्र १:३ म्हणते, "आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे." येथे लक्षात घ्या की हे सर्व आशीर्वाद आध्यात्मिक आहेत, भौतिक नाहीत. जुन्या करारांतर्गत इस्राएल लोकांना पृथ्वीवरील आशीर्वाद देण्याचे वचन देण्यात आले होते. आपण ते अनुवाद २८ मध्ये वाचू शकतो. ख्रिस्ताने आणलेली जी कृपा आणि मोशेने आणलेले नियमशास्त्र यांमध्ये हेच वेगळेपण आहे. जर जुन्या करारांतर्गत असे वचन असते तर अशा प्रकारे वाचले गेले असते: "सर्वसमर्थ देव धन्यवादित असो (आपला पिता नव्हे) ज्याने आम्हाला पृथ्वीवरील सर्व ऐहिक आशीर्वाद देऊन आपल्याला मोशेमध्ये आशीर्वादित केले आहे." म्हणून जे विश्वासणारे लोक प्रामुख्याने शारीरिक उपचार आणि भौतिक आशीर्वादाचा शोध घेत आहेत ते खरोखर जुन्या कराराकडे परत जात आहेत. असे "विश्वासणारे " खरे तर इस्राएली लोक आहेत, ख्रिस्ती नाहीत. ते मोशेचे अनुयायी आहेत, ख्रिस्ताचे नाहीत.

याचा अर्थ असा आहे का की देव आज विश्वासणाऱ्या लोकांना भौतिकदृष्ट्या आशीर्वाद देत नाही? तो देतो - पण वेगळ्या पद्धतीने. ते प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटत असताना त्यांच्या पृथ्वीवरील सर्व गरजा त्यांच्यासाठी पुरवल्या जातात. जुन्या करारांतर्गत लोकांनी फक्त पृथ्वीवरील या गोष्टींचा शोध घेतला आणि त्यांना त्या भरपूर मिळाल्या - अनेक मुले, बरीच मालमत्ता, भरपूर पैसा, शत्रूंवर विजय, पृथ्वीवरील सन्मान आणि पद इ. परंतु नवीन करारानुसार आपण आध्यात्मिक आशीर्वाद शोधतो - आध्यात्मिक मुले, आध्यात्मिक संपत्ती, आध्यात्मिक सन्मान, आध्यात्मिक विजय (सैतानावर आणि देहावर, पलिष्टी किंवा मानवांवर नव्हे). देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले आरोग्य आणि पैसा या आपल्या पृथ्वीवरील गरजाही आपल्यासाठी पुरवल्या जातात. देव आपल्याला तेवढेच पैसे देईल जेवढे की त्याला माहीत आहे की ते आपला नाश करणार नाही.

इफिसकरांस पत्र १:३ मधील "आध्यात्मिक आशीर्वाद" या शब्दांचे अनुवाद "पवित्र आत्म्याचा आशीर्वाद" असे केले जाऊ शकते. देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद दिला आहे. आपल्याला फक्त येशूच्या नावावर त्यांचा दावा करावा लागेल. रस्त्याच्या कडेला भीक मागत बसलेल्या एका भिकारी मुलीची कल्पना करा . एक श्रीमंत राजकुमार येतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि लाखो रुपये पेढीच्या खात्यात ठेवतो - एक खाते ज्यातून ती तिला हवे तेव्हा मुक्तपणे पैसे काढू शकते. ती किती भाग्यवान मुलगी आहे! एकदा तिच्याकडे फक्त भीक मागण्याचे पात्र आणि त्यात काही नाणी यांशिवाय काहीही नव्हते. पण आता ती उत्कृष्ट कपड्यांसह उच्च राहाणीमानात जगते. ती पेढीतून कितीही पैसे काढू शकते, कारण तिच्याकडे राजकुमाराने स्वाक्षरी केलेले बरेच कोरे धनादेश आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या हे आपले चित्र आहे.

आता आपण स्वर्गाच्या पेढीकडे जाऊन पवित्र आत्म्याच्या प्रत्येक आशीर्वादाचा दावा करू शकतो कारण ते सर्व ख्रिस्ताच्या नावात आपले आहेत. ख्रिस्तात स्वर्गाचे सर्व काही आपले आहे जर आपण त्याच्याशी वधूच्या नात्याने राहिलो, आणि जर आपण म्हणू शकलो, "प्रभू, मला तुझी वधू म्हणून पृथ्वीवरील माझे सर्व दिवस तुझ्याशी प्रामाणिक राहायचे आहे." मग पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद आपला आहे. आपण देवाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही की आपण त्या आशीर्वादांपैकी कशालाही पात्र आहोत - कारण आम्ही त्यांपैकी कशालाही पात्र नाही. आपण कल्पना करू शकता का की ती भिकारी मुलगी कल्पना करते की तिला फुकट मिळालेल्या सर्व संपत्तीस ती पात्र आहे? अजिबात नाही. आपल्याला जे काही मिळते ते देवाची दया आणि कृपेनेच आहे. आपण स्वर्गाचे सर्व काही घेऊ शकतो कारण ते सर्व ख्रिस्तात आपल्याला मुक्तपणे दिले गेले आहे. आम्ही आमच्या उपवासाने किंवा आमच्या प्रार्थनेने ते कमवू शकत नाही. अनेकांना पवित्र आत्म्याचे आशीर्वाद मिळत नाहीत कारण ते अशा प्रकारांनी ते मिळवण्याचा प्रयत्न करतात! आपण ते आशीर्वाद यांप्रकारे प्राप्त करू शकत नाही. आपण केवळ ख्रिस्ताच्या योग्यतेद्वारे त्या सर्वांचा स्वीकार केला पाहिजे.

मला आठवते की, एकदा मी पृथ्वीवरील गरजांसाठी प्रार्थना करत असताना प्रभूने मला हा धडा कसा शिकवला. मी म्हणालो, "देवा, मी इतकी वर्षे तुझी सेवा केली आहे. तर कृपया हे माझ्यासाठी कर." प्रभू म्हणाला, "नाही, मी हे करणार नाही, जर तू तुझ्या नावाने आलास तर." त्या दिवशी येशूच्या नावाने प्रार्थना करणे म्हणजे काय हे मला समजले. त्या दिवशी मला समजले की, ज्या नवीन विश्वासणाऱ्या व्यक्तीचे नुकतेच परिवर्तन झाले आहे आणि १९५९ मध्ये माझे परिवर्तन झाले होते, त्या दोघांनाही केवळ - येशू ख्रिस्ताच्या योग्यतेमुळे, अगदी त्याच आधारावर देवाकडे यावे लागते . येशू ख्रिस्ताने स्वाक्षरी केलेला धनादेश घेऊन त्याला स्वर्गात यावे लागते. मीसुद्धा येशू ख्रिस्ताने स्वाक्षरी केलेला धनादेश घेऊनच तेथे येऊ शकतो. मी इतकी वर्षे त्याच्याशी विश्वासू आहे असे म्हणत मी देवाकडे आलो, तर मी माझी स्वाक्षरी केलेला धनादेश घेऊन स्वर्गाच्या पेढीत येत आहे. आणि स्वर्गाची पेढी तो नाकारेल. हेच कारण आहे की आमच्या बर्‍याच प्रार्थनांचे उत्तर दिले जात नाही. आपण येशूच्या नावात जात नाही. आम्ही आमच्या नावाने जात आहोत. आपण देवासाठी इतका त्याग केला म्हणून त्याने आपल्याला उत्तर दिले पाहिजे, असे आपल्याला वाटते. जरी आपण ७० वर्षे विश्वासूपणे जगलो असलो, तरी जेव्हा आपण प्रभूसमोर येतो, तेव्हा आपण नवीन परिवर्तन झालेला विश्वासणारा ज्या आधारावर येईल त्याच आधारावर - येशूच्या नावातच येऊ शकतो. त्या प्रकटीकरणाबद्दल मी देवाचे आभार मानतो, कारण त्यानंतर मी माझ्या नावाची स्वाक्षरी केलेला धनादेश कधीही देवाकडे नेला नाही!! जेव्हा मला ते करण्याचा मोह होतो तेव्हा मी म्हणतो, "तो धनादेश कधीही वटवला जाणार नाही. मला येशूच्या नावात आणि त्याच्या योग्यतेमुळेच जावे लागेल." तरच स्वर्गीय ठिकाणी ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद आपला आहे.