लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इब्री लोकांस पत्र १०:५ मध्ये आपण असे वाचतो, की "देवाला आमच्या अर्पणांची गरज नाही." मी अशा लोकांसाठी या वचनाचा उल्लेख करतो जे अशा प्रचारकांच्या नेतृत्वाखाली पीडित आहेत ज्यांनी त्यांना सतत सांगितले आहे की देवाला त्यांची अर्पणे हवी आहेत. देव आपल्याकडून काय इच्छितो असे इथे म्हटले आहे? आपली शरीरे. जुन्या करारानुसार, "लेव्यांना आपले दशमांश द्या" यावर भर देण्यात आला होता. तर नव्या करारात "तुमची शरीरे देवाला समर्पित करा" यावर भर देण्यात आला आहे (रोमकरांस पत्र १२:१). आपल्या लोकांना सतत दशमांश द्यायला सांगणारी मंडळी ही एक जुन्या कराराची मंडळी आहे. एका नव्या कराराच्या मंडळीमध्ये आपली शरीरे - आपले डोळे, आपले हात, आपली जीभ इत्यादी - जिवंत यज्ञ म्हणून सादर करण्यावर भर दिला जाईल. आज देव भौतिक अर्पण नाही, तर आपले शरीर इच्छितो. आपले शरीर देवाला देणे हा नवा करार, जुन्या कराराच्या दशमांशाच्या समतुल्य आहे - ज्याप्रमाणे ख्रिस्ताचे क्रूसावर मरणे वल्हांडणाच्या दिवशी बलिदान दिलेल्या जुन्या कराराच्या कोकऱ्याच्या समतुल्य आहे. याचा अर्थ पृथ्वीवरील देवाच्या कार्यासाठी आपल्याला आता काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत का? तुम्ही जरूर देऊ शकता, पण तुम्ही जे संतोषाने देता तेच देवाला हवे आहे (२ करिंथकरांस पत्र ९:७). काहीही असो, त्याला सर्वप्रथम तुमचे शरीर हवे आहे . जे त्याला आपले शरीर देतात ते सहसा त्याला इतर सर्व काही देतात. पण सर्व काही संतोषाने आणि आनंदाने दिले पाहिजे.

येशू जगात आला तेव्हा तो आपल्या पित्याला दशमांश व भौतिक अर्पण द्यायला आला नव्हता (इब्री लोकांस पत्र १०:५). तो त्याचे शरीर बलिदान म्हणून द्यायला आला होता. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ आहे आणि त्याने आपल्याला शिकवले की देवाला आपल्याकडून जे हवे आहे प्रामुख्याने ते आपले शरीर आहे.

स्वर्गात असताना येशूकडे शरीर कधीच नव्हते. तो या जगात आला तेव्हा पित्याने त्याला शरीर दिले. त्या शरीराचे त्याला काय करायचे होते ? आफ्रिकेसारख्या अवघड ठिकाणी धर्मप्रचारक या नात्याने जाऊन तो आपल्या पित्यावरील आपली प्रीती दाखवणार होता का? की तो दररोज ४ तास प्रार्थना करणार होता आणि आठवड्यातून दोनदा उपवास करणार होता? यांपैकी काहीही नाही. तो म्हणतो, "तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी (पृथ्वीवर )आलो आहे - अर्पणे देण्यासाठी नाही" (इब्री लोकांस पत्र १०:७). येशूने यासाठी त्याच्या शरीराचा उपयोग केला आणि त्यासाठीच आपणही आपल्या शरीराचा उपयोग करायला हवा. आपले शरीर देवाला अर्पण करणे म्हणजे त्यानंतर आपले डोळे, हात, जीभ, उत्कट भावना, इच्छा इत्यादींनी त्याची इच्छा पूर्ण करणे. त्यानंतरच्या जीवनातील एकमेव उत्कट भावना म्हणजे दररोज देवाची इच्छा पूर्ण करणे.

आपल्यासाठी देवाची सर्वप्रथम इच्छा काय आहे? "देवाची इच्छा ही आहे की - तुमचे पवित्रीकरण व्हावे." (१ थेस्सलनीकाकरांस पत्र ४:३). आपल्यापैकी प्रत्येकासाठी असलेल्या देवाच्या इच्छेचा हा पहिला भाग आहे. आणि आपल्या सेवाकार्याच्या बाबतीत आपण इथेतिथे धावपळ करत देवासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपल्या सेवाकार्यातही देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवले, "जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." स्वर्गातील देवदूत इकडे तिकडे धावपळ करून कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवासाठी व्यस्त राहण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. येशू सुद्धा आपल्या पित्यासाठी इकडे तिकडे धावपळ करत काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करत नव्हता. त्याने पित्याची इच्छा जाणून घेतली आणि तेच केले. जेव्हा पित्याने त्याला १८ ते ३० या वयात सुतार म्हणून काम करण्यास सांगितले तेव्हा त्याने तसे केले. एवढी वर्षे तो त्याच्या पृथ्वीवरील कार्यात विश्वासू राहिल्यानंतर पित्याने त्याला बाहेर जाऊन साडेतीन वर्षे उपदेश करण्यास सांगितले. येशू १२ वर्षे स्टूल व टेबल बनवत असताना पित्याला तितकाच संतुष्ट करत होता जितका शुभवर्तमानाचा प्रचार करताना आणि आजाऱ्यांना बरे करताना करत होता.

येशू धर्मप्रचारक होण्यासाठी किंवा पूर्णवेळ कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आला नव्हता. तो फक्त त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करायला आला, मग ती काहीही असो. जेव्हा पित्याची इच्छा त्याने सुतारकाम करावे अशी होती तेव्हा त्याने तसे केले. जेव्हा पित्याची इच्छा होती की त्याने पूर्णवेळ काम करावे तेव्हा त्याने तसे केले. आपणही हे किंवा ते काम नव्हे तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे. देव तुम्हाला धर्मप्रचारक नव्हे तर सुतार होण्यासाठी बोलावू शकतो. तुम्ही तयार आहात का?

येशूने म्हटले, “हे देवा, पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरा करार स्थापण्यासाठी त्याने पहिला नाहीसा केला. ( इब्री लोकांस पत्र १०:८, ९). पहिल्या करारात भरपूर धार्मिक कार्ये होती - खासकरून निवासमंडपात आणि मंदिरात. पण येशूने त्याच्या पृथ्वीवरील ९० टक्के जीवनात कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. त्याने घरी आपल्या आईला मदत केली आणि कुटुंबाला सुतार म्हणून आधार दिला - ३० वर्षे. त्यानंतर त्याने पुढील साडेतीन वर्षे उपदेश केला. अशा प्रकारे त्याने आपल्या पित्याने त्याला दिलेले काम पूर्ण केले आणि त्याचा गौरव केला (योहान १७:४ पाहा). आपण तेथे शिकतो की घरी तुमच्या आईला मदत करणे हे आजाऱ्यांना बरे करण्याइतकेच देवाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. नव्या करारात, एका विशिष्ट वेळी तुम्ही जे काही केले पाहिजे असे देवाला वाटते तीच देवाची इच्छा आहे - आणि त्या विशिष्ट वेळी सर्वांत पवित्र अशी जी गोष्ट तुम्ही करू शकाल ती हीच आहे.