WFTW Body: 

'गीतरत्न’ हे सर्व ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्त्वाचे पुस्तक आहे. परमेश्वराचे मी मनापासून आभार मानतो की, जेव्हा मी माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात केली, तेव्हा त्याने मला सर्वप्रथम या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले. ख्रिस्ताशी असलेले वैयक्तिक, प्रेमळ आणि समर्पित नाते हाच तो उगम आहे, ज्यातून प्रभूची खरी सेवा प्रवाहित होते - मग ती सुवार्ता प्रसार असो, मंडळीची उभारणी असो, पवित्र शास्त्राचे शिक्षण असो, समाजकार्य असो किंवा अन्य काहीही. आपण सर्वप्रथम "वर आणि वधूचे गीत" शिकले पाहिजे - ते गीत जे आपला प्रभू आपल्यासाठी गातो आणि ते आपण त्याच्यासाठी परत गातो.

'गीतरत्न' १:१ मध्ये आपल्याला सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात येते की, हे गीत शलमोनचे आहे - म्हणजेच वराचे गीत आहे - आणि ते प्रामुख्याने वराचे आहे, वधूचे नाही. याचा अर्थ असा की, हे गीत प्रथम प्रभूने आपल्यासाठी गायलेले आहे, आपण त्याच्यासाठी हे गीत गायलेले नाही. "आपण त्याच्यावर प्रीती करतो, कारण त्याने आपल्यावर प्रथम प्रीती केली" (१ योहान ४:१९). आपण त्याच्यावर प्रथम प्रीती केली नाही; त्यानेच आपल्यावर प्रथम प्रीती केली. केवळ त्यानेच आपल्यासाठी हे गीत सर्वप्रथम गायले, म्हणूनच आता आपण त्याच्यासाठी गीत गाऊ शकतो.

'गीतरत्न' ४:८ मध्ये आपण वर वधूला असे म्हणताना ऐकतो: “लबानोनावरून मजबरोबर ये. अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन यांच्या माथ्यावरून आणि सिंहांच्या गुहांतून तू नजर फेक " (गीतरत्न ४:८). हे स्वर्गीय स्थानात वास्तव्य करण्याचे एक आमंत्रण आहे. प्रभू म्हणतो: " गोष्टींकडे खालच्या, जगिक दृष्टिकोनातून पाहू नकोस. माझ्याबरोबर स्वर्गीय क्षेत्रात ये आणि सर्व गोष्टींकडे त्या उच्च दृष्टिकोनातून पहा. जेव्हा तू तिथून पृथ्वीवरील गोष्टींकडे पाहशील, तेव्हा त्या तुला लहान, अस्पष्ट आणि निरर्थक वाटतील." प्रभूला आपल्याला एका उच्च पातळीवर घेऊन जायचे आहे. हे खरे आहे की, तिथे सिंह आहेत – तेथे दुरात्मे आहेत, दुष्ट अधिपती आणि सत्ता आहेत. परंतु तिथे आपण प्रभूच्या सान्निध्यात असू आणि त्याच्या सोबतीने आपण त्या सर्व दुष्ट शक्तींवर विजय मिळवू.

'गीतरत्न' ४:१२ मध्ये वर वधूला "बंद असलेली बाग" असे संबोधतो - ही एक अशी विशेष बाग आहे, जी केवळ आणि केवळ वरासाठीच राखून ठेवलेली आहे. ती इतर कोणाचीही नाही; ती केवळ आणि केवळ तिच्या प्रभूचीच आहे. प्रभूशी तुमचेही नाते असेच आहे का ? प्रभु तुम्हाला असे म्हणू शकतो का, "तू माझी खाजगी बाग आहेस, पूर्णपणे माझीच" आहेस ? या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आकर्षित करू शकतात; जसे की आपल्याला गरजेपेक्षा जास्त पैसा कमावण्याच्या संधी, ऐहिक सत्ता आणि प्रसिद्धी मिळवणे, स्वतःचे नाव कमावणे इत्यादी. अशा मोहांची तुलना अशा परपुरुषांशी केली जाऊ शकते जे एखाद्या वधूला भुलवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु येथे वधू मात्र अशा गोष्टींकडे आकर्षित होत नाही. ती केवळ , पूर्णपणे आपल्या प्रियकरामध्येच मग्न असते. ती पूर्णपणे आपल्या वराचीच असते. ख्रिस्ताशी अशा प्रकारचे नाते जपणारे विश्वासणारे फारच थोडे आहेत; आणि म्हणूनच ते त्याला सखोलपणे ओळखतात आणि त्याचे वचनही त्यांना समजते, जे ख्रिस्ताशी असे नाते जपत नाही ते त्याला सखोलपणे ओळखत नाही आणि त्यांना त्याचे वचनही समजत नाही. पवित्र शास्त्र समजून घेण्याचे गुपित हेच आहे की, सर्वप्रथम प्रभूशी एक अत्यंत घनिष्ठ नाते असणे - कारण त्याच्या वचनाचा अर्थ काय आहे, हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती कोण असू शकतो ? पूर्वीच्या शिष्यांप्रमाणेच तुम्हीही त्याच्या सहवासात चाला आणि त्याने तुमच्याशी बोलावे, अशी तीव्र इच्छा तुमच्या मनात बाळगा. मग त्या शिष्यांप्रमाणेच तुमचेही डोळे उघडले जातील आणि त्यांची मने जशी प्रज्वलित झाली होती, तशीच तुमचीही मने प्रज्वलित होतील.

'गीतरत्न' ५:२ मध्ये, जेव्हा मध्यरात्रीच्या वेळी वर येऊन हाक मारतो, "माझ्या प्रिये, माझ्यासाठी दार उघड," तेव्हा वधूला उठून कपडे घालण्याचा आणि दार उघडण्याचा आळस येतो (गीतरत्न ५:३). तिला अशी काळजी वाटते की, (तिने नुकतेच धुतलेले) तिचे पाय पुन्हा मळीन होतील. तेव्हा त्याने स्वतःच दाराची कडी काढण्याचा प्रयत्न केला (गीतरत्न ५:४). त्यानंतर वधुने तिचे मन बदलले आणि तिने दार उघडले; परंतु तिला असे आढळून आले की, तिचा प्रियकर तिथून निघून गेला होता. तो तिथून निघून गेला होता, करण जेव्हा त्याने तिला हाक मारली, तेव्हा तिने त्वरित प्रतिसाद दिला नाही. आपल्या बाबतीतही असेच घडू शकते. प्रभू कदाचित आपल्याला असे म्हणेल, "आता तू जे काही करत आहेस, ते सर्व सोडून दे. ते पुस्तक वाचणे थांबव. ते बोलणे थांबव. माझ्यासोबत एकांतात ये आणि माझ्याशी बोल. चल, आपण एकत्र फिरायला जाऊया." आणि त्यावर आपण कदाचित असा प्रतिसाद देऊ, "प्रभू, जरा थांब. मला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते काम १५ मिनिटांत संपेल. त्यानंतर मी तुझ्याकडे येईन." आणि १५ मिनिटांनंतर, जेव्हा आपण ते 'महत्त्वाचे' (?) काम संपवतो, तेव्हा आपण म्हणतो, "प्रभू, आता मी तयार आहे." परंतु तेव्हा आपल्याला असे आढळून येते की, तो तिथून निघून गेला आहे. तो आपल्याला कुठेच सापडत नाही. तुम्हाला देवाचा एक प्रभावी सेवक बनायचे आहे का? जेव्हा प्रभू तुम्हाला हाक मारतो, तेव्हा हाती असलेले सर्व काम सोडून देण्याची आणि त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय स्वतःला लावून घ्या. तुम्हाला याचा कधीच पश्चात्ताप होणार नाही.

'गीतरत्न' ५:३ मध्ये, वर म्हणतो, “मी रात्री बाहेर होतो आणि माझे डोके दवाने थबथबले आहे”. कारण येशू हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पृथ्वीवर आला, त्याने वधस्तंभाचा मार्ग ( आत्मत्यागाचा ) स्वीकारला आणि या जगाच्या अंधाऱ्या रात्रीत हरवलेल्या मेंढरांना शोधताना दुःख सोसले. आता तो आपल्या वधूलाही त्याच मार्गावर चालण्यासाठी आमंत्रित करतो. पण तिची ती इच्छा नाही.

गीतरत्न' ६:४-१० मध्ये, वर त्याच्या वधूविषयीची प्रशंसा व्यक्त करतो. तो म्हणतो की, सर्व स्त्रियांमध्ये, माझ्या वधूसारखी - माझ्या त्या परिपूर्ण वधूसारखी—दुसरी कोणीही नाही. "मी इतर कोणाहीपेक्षा तिलाच निवडले आहे." प्रत्येक पतीने आपल्या पत्नीकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे: जगात अनेक आकर्षक स्त्रिया आहेत, पण माझ्या पत्नीसारखी दुसरी कोणीही नाही. माझ्या नजरेत तीच 'प्रथम क्रमांकावर' आहे. आपल्याविषयी प्रभूचेही हेच म्हणणे आहे. जगातील सर्व बुद्धिमान, श्रीमंत आणि महान लोकांपेक्षा तो आपली अधिक प्रशंसा करतो.

'गीतरत्न' ७:१-९ मध्ये, वर आपल्या वधूचे कौतुक करतो. आपण हे स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे की, आपल्यात सर्व उणिवा असूनही, आपला प्रभू खरोखरच आपले कौतुक करतो आणि आपली प्रशंसा करतो. अनेक विश्वासणारे सतत स्वतःलाच दोष देत जगतात; याचे एकमेव कारण म्हणजे, प्रभू आपले कौतुक करतो या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाही. आणि जेव्हा वर आपल्या वधूच्या ओठांचे कौतुक करतो, तेव्हा ती तत्परतेने उत्तर देते की, हे वर्णन तर खरे तर त्याच्या स्वतःच्याच ओठांना अधिक लागू पडते (गीतरत्न ७:९)! हे विधान त्या दोघांमधील अत्यंत गाढ जवळीक दर्शवते - आणि आपल्या प्रभूशी आपलीही अशीच जवळीक असायला हवी.

'गीतरत्न' ७:१० मध्ये, वधू म्हणते, "मी माझ्या प्रियकराची आहे आणि त्याचे मन मजवर बसले आहे." येथे वधू केवळ एवढेच म्हणत नाही की प्रभू माझा आहे, तर ती हेही सांगत आहे की, प्रभू तिच्यावर प्रसन्नही आहे. प्रभूने "मी तुझ्यावर प्रेम करतो," असे म्हणणे ही एक गोष्ट आहे; पण प्रभूने "मी तुझ्यावर प्रसन्न आहे," असे म्हणणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. एखादा पती आपल्या पत्नीवर प्रेम करत असेलही, पण ती ज्या प्रकारे गोष्टी हाताळते, त्याबद्दल तो कदाचित खुश नसेल. प्रभू कदाचित तुमच्यावर प्रेम करत असेल, पण तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल तो कदाचित खुश नसेल. परिपक्व प्रेम हे प्रभूला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न करते. आता ती वधू आपल्या वराची 'सहकारी' बनते आणि म्हणते, "ये, माझ्या प्रियकरा, चला, आपण शेतांकडे जाऊया" (गीतरत्न ७:११). वधू आता आपल्या वराची ती तळमळ स्वतःमध्ये सामावून घेते - ती तळमळ एका गरजू जगाविषयीची आहे, जिथे शेते कापणीसाठी पिकून पांढरीशुभ्र झाली आहेत. परंतु, त्या शेतांमध्ये कधीही एकटे जाऊ नका. तिथे तुमच्या प्रियकरासोबतच जा. त्याच्याशी एक घनिष्ट नाते प्रस्थापित करा आणि त्यानंतरच त्याची सेवा करा. शेतातील कोणत्या भागात जाऊन तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करू शकता, हे जाणणारा तोच एक आहे.

गेल्या चाळीसवर्षांहून अधिक वर्षांच्या काळात, मी प्रभूची सेवा करण्याचा प्रयत्न याच पद्धतीने केला आहे. मी कधीही कोठेही केवळ माझ्याच इच्छेने जावे असे मला कधीही वाटले नाही. मी असेच म्हणत असे की : "हे प्रभू, तूच मला मार्ग दाखव आणि मी तुझ्यासोबत येईन. चल, आपण एकत्र शेतांकडे जाऊया. तू कोठे जात आहेस, हे मला सांग. आणि जर तू एखाद्या ठिकाणी जात नसशील, तर मलाही तिथे जायचे नाही." जर आपण प्रभूची सेवा त्याच्या सहवासात आणि त्याच्या अधीनतेत राहून केली, तर आपल्या जीवनात कधीही बढाईखोरीला थारा असणार नाही; तसेच, आपल्या सेवेची तुलना इतर कोणाच्याही सेवेशी केली जाणार नाही.