WFTW Body: 

१ करिंथ २:१४, १५ मध्ये आपण "स्वाभाविक (जैविक) मनुष्य" आणि "आध्यात्मिक मनुष्य " यांविषयी वाचतो. एक जैविक ख्रिस्ती आणि आध्यात्मिक ख्रिस्ती यांच्यात खूप फरक आहे. मानवी बुद्धीला हे समजू शकत नाही, जसे की त्यात म्हटले आहे: "स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही."

मन आणि आत्मा हे डोळे आणि कान यांच्याइतकेच वेगळे असतात. आणि जसे एखादा चांगले ऐकू शकत असेल आणि तरीही आंधळा असणे शक्य आहे , तसेच एखाद्याकडे प्रखर बुद्धी असणे आणि 'मृत' आत्मा असणे शक्य आहे - किंवा अगदी त्याउलटही असणे शक्य आहे. या जगात आपल्या कार्यासाठी आपल्याला चांगल्या मनाची गरज असते. पण जेव्हा देवाच्या गोष्टींचा विचार केला जातो, तेव्हा आपल्या आत्म्याची अवस्था महत्त्वाची असते. देवाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याकडून प्रकटीकरणाची गरज आहे, आणि ते केवळ नम्रजनांना (नम्रतेची भावना असलेल्या "बालकांना" दिले जाते - मत्तय ११:२५), आणि ज्ञानी लोकांना नाही (जोपर्यंत तेही नम्र होत नाहीत).

जरी अशक्य नसले तरी हुशार माणसाला नम्र असणे कठीण आहे. हे असे आहे की, एखाद्या स्वनीतिमान परुश्याला अशक्य नसले तरीसुद्धा आपण पापी आहोत हे कबूल करणे कठीण जाते. वेश्या आणि चोरांना आपण पापी आहोत हे मान्य करणे सोपे जाते. त्याचप्रमाणे ईश्वरी प्रकटीकरणाच्या बाबतीतही: अशिक्षित मनुष्याला आपण हुशार नाही हे कबूल करणे सोपे जाते - आणि म्हणून त्याला देवाचे प्रकटीकरण लवकर प्राप्त होऊ शकते. म्हणूनच येशूने आपला बराचसा वेळ पेत्र, याकोब व योहान या तीन अशिक्षित मच्छिमारांबरोबर घालवला कारण त्याला ते आध्यात्मिक गोष्टींना सर्वात जास्त प्रतिसाद देणारे वाटले. आणि म्हणूनच परूश्यांना ख्रिस्ताचा स्वीकार करणे इतके कठीण गेले - कारण त्यांच्या बुद्धीबद्दलच्या त्यांच्या गर्विष्ठपणामुळे ते आध्यात्मिकरीत्या मूर्ख आहेत हे कबूल करणे त्यांच्यासाठी अडथळा ठरला. बौद्धिक आणि हुशार असलेल्या लोकांमध्ये सतत मिसळताना ही गोष्ट नेहमीच लक्षात घ्यायला हवी.

मानवी हुशारीला देवासमोर काहीच किंमत नाही. देवाला हे आपल्या त्वचेच्या रंगाइतकेच महत्त्वाचे नाही - कारण या दोन्ही गोष्टी घेऊन लोक जन्माला येतात आणि जे काही लोक घेऊन जन्माला येतात, त्याचा देवासमोर त्यांना कोणताही फायदा नाही. हुशारी ही, मानवी नीतिमत्तेप्रमाणे, देवाच्या दृष्टीने घाणेरड्या वस्त्रासारखी आहे (यशया ६४:६). ख्रिस्त केवळ आपले नीतिमत्त्वच नव्हे, तर आपले ज्ञानही बनला आहे (पाहा १ करिंथ १:३०).

परंतु, पौलासारखा मनुष्य, जो एक नीतिमान परुशी आणि एक हुशार बुद्धिजीवी (दोन्ही बाजूनी अपंग) होता, त्याचे केवळ तारणच झाले असे नाही, तर तो ख्रिस्ताचा महान प्रेषितही बनू शकला, यावरून आपल्याला उत्तेजन मिळते. पण त्याचे कारण हे होते की, त्याने स्वत:ला सतत नम्र केले होते. करिंथकरांशी बोलताना तो म्हणतो की, आपल्या बौद्धिक क्षमतेवर तो विसंबेल , अशी त्याला भीती वाटत होती आणि म्हणूनच तो "त्यांच्यामध्ये भयभीत आणि अतिकंपित " होता (१ करिंथ २:३). देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने नव्हे तर आपल्या मनाच्या (जीवाच्या) सामर्थ्याने आपण त्यांना उपदेश करतो की काय अशी त्याला भीती वाटत होती (१ करिंथ २:४). जेव्हा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण सर्वांनी ती भीती बाळगली पाहिजे. म्हणूनच आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी सतत प्रार्थना केली पाहिजे - कारण आपल्याला याची सतत गरज आहे.

आणि म्हणून, पवित्र शास्त्रामधील सत्याचे हुशारीने केलेले बौद्धिक सादरीकरण आध्यात्मिक सत्य आहे असे आपण समजू नये. तसेच आपण एखादा अतिशय भावनिक संदेश हा आध्यात्मिक संदेश आहे अशी चूक करू नये. बुद्धी आणि भावना या दोन्ही गोष्टी आपल्या जीवाचे भाग आहेत. हे दोन्ही चांगले नोकर आहेत पण वाईट मालक आहेत. केवळ पवित्र आत्मा हाच आपल्या जीवनात प्रभू असला पाहिजे. शेवटी, आध्यात्मिक बनण्याचा मार्ग ख्रिस्ती जीवनाच्या तीन रहस्यांमध्ये आहे ज्याचा मी नेहमी उल्लेख केला आहे: नम्रता, नम्रता आणि नम्रता! जर तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही ठीक असाल.