WFTW Body: 

देव पुष्कळ मार्गांनी आपल्यासोबत बोलतो. विशेषतः तो त्याच्या वचनांनी आपल्यासोबत बोलतो. जर एखादी गोष्ट देवाच्या वचनात स्पष्टपणे लिहिली आहे तर त्याविषयीची इच्छा जाणून घेण्याकरिता आपण देवाला प्रार्थना करण्याची गरज नाही की देवाने त्याची इच्छा प्रकट करावी.

देव अनेक वेळा परिस्थितींद्वारे आपल्यासोबत बोलतो. आपल्या प्रभुकडे प्रत्येक दाराची किल्ली आहे (प्रकटीकरण 1:18). तो जेव्हा दार उघडतो तेव्हा ते दार कोणीही बंद करू शकत नाही. जेव्हा देव दार बंद करतो तेव्हा ते कोणीही उघडू शकत नाही (प्रकटीकरण 3:7). म्हणून परिस्थितीदेखील आपल्याला देवाची इच्छा प्रकट करते की आपण कोणत्या वाटेने जावे. जे दार देवाने बंद केले आहे त्याच्यापुढे वाट बघत बसण्यात अर्थ नाही. दार बंद असता आपण प्रार्थना करावी. परंतु, पुष्कळ प्रार्थना केल्यावर देखील दार उघडले नाही तर आपण समजून घ्यावे की आपण त्या दाराने जावे अशी देवाची इच्छा नाही. आपण देवाला विनंती करू शकतो की दार उघडण्याची आपण वाट बघावी किंवा नाही (लूक 11:5-9).

परिपक्व अशा देवभिरू बांधवांद्वारे देखील देव आपल्यासोबत बोलतो. हे लोक मोठ्या अनुभवातून गेलेले असतात व आपल्याला ते सावध करू शकतात. आपण डोळे बंद करून त्यांना अनुसरू नये; परंतु, त्यांचा चांगला सल्ला आपल्या उपयोगी ठरू शकतो.

पुष्कळ वेळा जेव्हा आपण इतर विश्वासणार्यांच्या संगतीत असतो किंवा सहभागितेत असतो तेव्हा देखील देव आपल्यासोबत बोलतो. ख्रिस्ताच्या शरीरातील इतर सदस्यांवर आपण विसंबून असावे अशी शिकवण देखील तो आपल्याला देतो. देवाच्या वचनाच्या प्रकटीकरणाकरिता आपण इतर विश्वासणार्यांवर विसंबून राहू शकतो.

जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात असतो व आजारी असतो तेव्हा काही वेळा देव आपल्याला महत्वाची गोष्ट सांगू इच्छित असतो

इतरांच्या अपयश व चुकांद्वारे देखील देव आपल्याला ताकीद देतो. उदा. प्रभुच्या अशा दासांविषयी आपण ऐकतो ज्यांचे पतन झाले. त्या दासाच्या उदाहरणातून आपल्याला चांगला बोध मिळू शकतो व ताकीद मिळू शकते. त्यातून आपल्याला पुन्हा जाणीव होते की आपण सर्वच दुर्बल आहोत व आपण स्वतःला सांभाळावे.

एखाद्या ठिकाणी वाईट गोष्टी घडण्याची वा अपघातांची बातमी आपण ऐकतो तेव्हा त्यातून देव आपल्यासोबत बोलतो. त्या काळच्या लोकांना येशूने पश्चात्ताप करण्यास सांगितला. जेव्हा पिलात काही यहूदी लोकांना त्रास देत होता व जेव्हा बुरूजाखाली अनेक लोक दबून मेले तेव्हा येशूने पश्चात्ताप करण्यास सांगितला. कारण अशा गोष्टी आपल्यासोबत देखील घडू शकतात (लूक 13:1-4).

मी एक ताकीद देऊ इच्छितो. बायबल उघडून डोळ्यासमोरचे वचन वाचून देवाची इच्छा जाणून घेता येत नाही.

जर एखाद्या मुलीसोबत लग्न करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही डोळे बंद करून बायबल उघडाल व पुढे आलेल्या वचनातून देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. जर तुम्हाला त्यात देवाची इच्छा कळली नाही तर इच्छेप्रमाणे वचन पुढे येऊस्तर तुम्ही ही गोष्ट करीत राहाल. अशाप्रकारे तुम्ही स्वतःला फसविता.

मी एका माणसाची गोष्ट ऐकली जो अशाप्रकारे देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने डोळे बंद करून बायबल उघडले व पुढील वचन वाचले, ''जाऊन गळफांस घेतला'' (मत्तय 27:5). त्याने पुन्हा डोळे बंद करून बायबल उघडले व पुढील वचन वाचले, ''जा आणि तूंहि तसेंच कर'' (लूक 10:37). तिसर्यांदा त्याने डोळे बंद करून बायबल उघडले व वाचले, ''तुला जें करावयाचें आहे तें लवकर करून टाक'' (योहान 13:27). अशाप्रकारे देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करणे धोक्याचे आहे हा धडा त्याला नेहमीकरिता मिळाला.

असे अनेक प्रसंग येतील जेव्हा आपण दबावात असू व डोळे बंद करून बायबल उघडल्यावर देवाचे वचन आपल्याला धीर देईल. जर तुम्ही धीराकरिता अशाप्रकारे देवाचे वचन उघडाल तर त्यात काही वाईट नाही; परंतु, मार्गदर्शनाकरिता ही पद्धत बरोबर नाही.

प्रिय बंधूंनो, मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो की तुम्ही देवाची वाणी ऐकण्याची सवय लावून घ्यावी. ही सर्वात महत्वाची सवय आहे जी तुम्हाला असावी.