WFTW Body: 

डोंगरावरील प्रवचनात येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, तो तिच्याशी व्यभिचार करतो. तो पुढे म्हणाला की, अशा माणसाने दोन्ही डोळ्यांनी नरकात जाण्यापेक्षा आपला एक डोळा उपटून टाकणे चांगले आहे(मत्तय ५:२७-२९). त्याद्वारे त्याने शिकवले की आपल्या डोळ्यांनी सतत स्त्रियांप्रती लैंगिक इच्छा बाळगणे एखाद्या पुरुषाला शेवटी नरकात पाठविण्यासाठी पुरेसे आहे.

आज पुरुषांच्या हृदयात वासनेची असलेली आग हा तोच नरकाग्नी आहे, जो प्रत्येक पुरुषाच्या हृदयात, आदामाच्या काळापासून जळत आला आहे. केवळ पवित्र आत्म्याचा अग्नीच त्याचा नाश करू शकतो. एकतर तुमचे हृदय पाप करण्याच्या वासनेने जळेल किंवा येशूबद्दलच्या प्रीतीने प्रज्वलित असेल. आपली निवड या दोघांपैकी एक असणे आवश्यक आहे: एकतर आता शुद्ध करणारा अग्नी किंवा भविष्यात नरकाग्नी. तिसरा पर्याय नाही.

ज्या यहूदी लोकांशी परमेश्वर बोलला होता, त्यांना नियमशास्त्राच्या माध्यमातून आधीच एक उच्च नैतिक स्तर प्राप्त झाला होता. ते एका कडक नैतिक संहितेनुसार जगत होते, जिथे विवाहबाह्य लैंगिक संबंधांना नेहमीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे. त्या काळात लोकांना अनैतिकतेकडे आकर्षित करण्यासाठी कोणतीही अश्लील पुस्तके, मासिके किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम नव्हते. त्या समाजातील प्रत्येक स्त्री सभ्यपणे कपडे घातलेली होती आणि स्त्री-पुरुष एकमेकांशी क्वचितच बोलत असत. तरीही, अशा समाजात, त्याच्या सर्व निर्बंधांसह, प्रभूला हे माहित होते की पुरुष स्त्रियांची वासना धरतात आणि त्याला त्याच्या शिष्यांना त्यापासून सावध करावे लागले. इतक्या कडक समाजात असे होते तर आज आपण ज्या विषयासक्त समाजात वावरत आहोत, त्या समाजातल्या तरुणांना याबद्दल त्याने आणखी किती सावध केले असते .

आजचा समाज आपल्या लैंगिक वासनांचे पोषण करण्यासाठी, प्रत्येक शक्य माध्यमांतून आपल्या मनात इंधन घालत असतो. म्हणूनच आपल्या सर्वांना या दिवसात अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. वासनेची ही आग विझविण्याबद्दल तुम्ही गंभीर असाल तर इंधनाचा पुरवठा बंद करण्याबाबतही तुम्ही गंभीर असाल. आणि त्या इंधनाचा स्रोत तुम्ही कसलीही दया न दाखवता उग्रपणे आणि मुळापासून कापून टाकला पाहिजे. डोळा उपटणे आणि हात तोडणे याचा अर्थ हाच आहे. येशू आपल्याला अशी आज्ञा देत होता की, ज्या गोष्टीमुळे आपण पाप करू शकतो त्या कारणाचा नाश करा. पापाचा धोका आणि नरकाग्नीच्या वास्तवाची इतर कोणाहीपेक्षा येशूला अधिक जाणीव होती - आणि म्हणूनच त्याने पापापासून बचाव करण्यासाठी अशा पूर्णपणे उपटून टाकणाऱ्या आध्यात्मिक शस्त्रक्रियेचा आग्रह धरला.

परमेश्वराने आज आपल्याला दिलेल्या आज्ञेचे पालन असे आहे की, "जर तुमचा दूरचित्रवाणी संच तुम्हाला तुमच्या मनात पाप करण्यास प्रवृत्त करतो, तर ताबडतोब त्यापासून मुक्त व्हा." आपण पडद्यावर पाहिलेल्या दूरचित्रवाणीवरील ताऱ्यांबरोबर नरकामध्ये जाण्यापेक्षा, दूरचित्रवाणी न पाहून स्वर्गात जाणे चांगले. किंवा एखादे मासिक किंवा एखादे विशिष्ट प्रकारचे संगीत असेल जे तुम्हाला उत्तेजन देते आणि तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करते, तर तीच गोष्ट त्या मासिकांच्या आणि चित्रफिती आणि संकेतस्थळाच्या बाबतीतही करा. निश्चितच पृथ्वीवर असे काहीही असू शकत नाही जे तुमच्यासाठी इतके मौल्यवान आहे, की तुम्ही ते धरून ठेवले पाहिजे, जर त्याचा परिणाम म्हणून, शेवटी तुम्ही स्वर्ग चुकवता आणि नरकात जाता.

हे वाचतानाही सैतान लगेच तुम्हाला कुजबुजेल, "इतक्या लहान गोष्टीसाठी तुम्ही मरणार नाही (नरकात जाणार ) नाही." आणि तो तुम्हाला हुशारीने सांगेल की, एखाद्या मासिकातील चित्राच्या किंवा तुम्ही टीव्हीवर पाहिलेल्या एखाद्याच्या मागे लागणे म्हणजे खरोखर व्यभिचार नव्हे. त्याचे ऐकू नका - कारण येशूने आपल्याला ताकीद दिली आहे की सैतान पहिल्यापासून खोटारडा आहे.

या पापाबद्दल असे फक्त म्हणू नका की, "मी भविष्यात हे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेन", किंवा "मी ते सोडण्याचा प्रयत्न करेन". पवित्र शास्त्र आपल्याला दुष्टाईच्या दर्शनापासूनही दूर राहण्याचा इशारा देते. या पापाचा ताबडतोब व कायमचा त्याग करण्यासाठी देव तुम्हाला सर्वतोपरी मदत करील, असा विश्वास ठेवा. आजपासून लढाईस सज्ज व्हा, आणि जिवंत देवाच्या सैन्यात शिपाई असलेल्या तुम्हांला तुच्छ लेखणाऱ्या या गल्याथाचे शीर कापून टाकेपर्यंत हार मानू नका.

१ करिंथ ७:१ मध्ये आपल्याला मुलींना स्पर्श करण्याचे टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. पवित्र आत्मा जेव्हा असे म्हणतो की एखादी गोष्ट "चांगली नाही" (जसे तो तेथे म्हणतो त्याप्रमाणे), तेव्हा कोणत्याही शिष्याला ती पूर्णपणे टाळण्यास पुरेसे असले पाहिजे. नियमशास्त्राधीन लोक नियमशास्त्रानुसार जगतात, तर शिष्य आज्ञापालनाच्या आत्म्याने जगतात. उदाहरणार्थ: येशूला हे माहीत होते की, एखाद्याच्या अंतःकरणातील असलेली स्त्रीबद्दलची कामेच्छा हा व्यभिचार आहे, कारण त्याने सातव्या आज्ञेचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही एकनिष्ठ असाल, तर देवाच्या सर्व आज्ञांच्या मुळाशी काय आहे हे तुम्हाला दिसून येईल. पौल तीमथ्याला काय सांगतो ते पाहा: "ज्या गोष्टी तरुणांना नेहमी मोहात पाडतात अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर पळा " (२ तीमथ्य २:२२—लिविंग बायबल). मोहाच्या अशा सर्व शक्यतांपासून तुम्ही पळून जायला हवे.

परमेश्वर पुन्हा एकदा आपल्या मंदिराची स्वच्छता करीत आहे. त्याचे मंदिर आता तुमचे दैहिक शरीर आहे. त्याला त्यात एकाच वेळी सखोल काम करण्याची परवानगी द्या.