लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

येशूने स्वतःला मानव गणिले. मानव होण्यास त्याला लाज वाटली नाही. बायबल सांगतो की आपल्याला बांधव म्हणण्यास त्याला लाज वाटली नाही. काही वेळा आपण इतरांपेक्षा स्वतःला शहाणे समजतो. आपण इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो. आपल्याला वाटते की आपण इतरांपेक्षा अधिक सुशिक्षीत आहोत व उच्च जातीचे आहोत. गर्वामुळे आपल्या अशा भावना असतात. आदामाने पाप केले तेव्हापासून आपल्यामध्ये गर्वाचा रोग आहे. येशू या जगामध्ये आला व त्याने दाखवून दिले की सर्व मानव, लोक सारखेच आहेत. आपण भिन्न समाजातील असलो, भिन्न कुटुंबातील असलो, भिन्न संस्कृतीतील असलो व वेगवेगळ्या पातळीवर शिक्षण घेतले असले तरी आपण देवाच्या दृष्टीत सारखेच आहोत. येशू आला व तो लीनांतल्या लीनासारखा झाला. इस्राएल राष्ट्राच्या समाजातील कनिष्ठासारखा तो झाला. तो सर्वांपेक्षा लीन झाला जेणेकरून त्याला सर्वांचा दास होता यावे. आपण सर्वांपेक्षा लीन झालो नाही तर आपल्याला त्यांचा दास होता येणार नाही. एखाद्याला उंचवावे अशी आपली इच्छा असेल तर आपल्याला त्याच्यापेक्षा लीन व्हावे लागेल. लीन होऊन येशू आला.

`ख्रिस्तासारखी मनोवृत्ती आपल्या ठायी उत्पन्न करावी म्हणून पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करितो. आपण देखील ख्रिस्तासारखा विचार करावा म्हणून पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करितो. तुम्ही स्वतःविषयी काय विचार करता? तुम्ही स्वतःला देखणा समजता का? तुम्ही स्वतःला बुद्धिमान, श्रीमंत किंवा सर्वगुणसंपन्न समजता का? तुम्ही ख्रिस्तासारखा विचार करता की सैतानासारखा विचार करता? जर तुम्ही स्वतःची तुलना इतरांबरोबर करता आणि स्वतःला श्रेष्ठ समजता तर तुम्ही अगदी लुसीफराप्रमाणे विचार करता. लुसीफराने तसा विचार केला आणि तो सैतान झाला. बायबल आपल्याला सांगते की आपण एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे (फिलिप्पै 2:3). त्याच शास्त्रभागात पौल आपल्याला सांगतो की ख्रिस्त आपल्यापुढे कित्ता आहे. इफिस 3:8 मध्ये पौलाने म्हटले की सर्व संतांमध्ये तो सर्वात कनिष्ठ आहे. ख्रिस्ताच्या नम्रतेमुळे पौल इतका प्रभावीत झाला की त्याने स्वतःला विश्वासणार्‍यांमध्ये सर्वात कनिष्ठ गणले.

फिलिप्पै 2:3 मध्ये बायबल आपल्याला बोध करते की आपण एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. येशू इतरांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानीत असे म्हणूनच शेवटल्या भोजनाच्या वेळी त्याने शिष्यांचे पाय धुतले. त्या काळामध्ये केवळ दास इतरांचे पाय धूत असत. श्रीमंतांच्या घरातील दास पाहुण्यांचे पाय धूत असत आणि त्यांना पगार मिळत नसे. ते त्या घरातील गुलाम असत. दास चाकरांपेक्षा खालच्या दर्जाचा असे. पाहुण्यांचे पाय धुण्याचे काम दासाचे असे. तो पाहुण्यांचे बुटांचे बंद सोडत असे, पाणी घेऊन त्यांचे पाय स्वच्छ धूत असे. ज्या ज्या वेळी मेजवानीचे आमंत्रण देण्यात येई त्या त्या वेळी दारात पाणी ठेवण्यात येत असे. येशू व त्याचे शिष्य शेवटल्या भोजनासाठी एकत्रीत आले. त्याठिकाणी एका खोलीमध्ये ते एकत्रीत आले. दारामध्ये पाण्याचे भांडे होते. आता लोकांचे पाय कोण धुणार? त्या ठिकाणी दास वा चाकर नव्हते. प्रत्येक शिष्याने विचार केला असेल, ''मी हे काम करणार नाही.'' पेत्राने विचार केला असेल, ''येशूच्या नंतर मी पुढारी होणार. मी पाय धुण्याचे काम कसे करू?'' मत्तयाने विचार केला असेल, ''मी सुशिक्षीत खजीनदार आहे. मी शिष्यांचे पाय धुणार नाही.'' प्रत्येक शिष्याने स्वतःच्या श्रेष्ठतेचा विचार केला असेल म्हणून ते दासाचे काम करू शकले नाही. मग येशूने भांड्यात पाणी घेतले आणि शिष्यांचे पाय धुण्यास सुरुवात केली. का? कारण तो म्हणाला, ''तुम्ही सर्व माझ्यापेक्षा महत्वाचे व श्रेष्ठ आहात.'' नक्कीच ते येशूपेक्षा जास्त आत्मिक नव्हते. येशूने तसा विचार देखील केला नाही; परंतु, येशूने त्यांना महत्वाचे समजले. होय खरोखर त्याने स्वतःला कनिष्ठ समजले. हा देखावा नव्हता. नम्र असण्याचा देखावा तो करीत नव्हता. अनेक लोक भासवितात की ते नम्र आहेत. नम्र दास असण्याचा ते देखावा करितात. हे ढोंग आहे. देवाला ढोंगीपणाचा वीट आहे. येशू खरा होता. स्वर्गातील पित्यापुढे त्याने स्वतःला खरोखर शून्य केले होते. ह्यालाच खरी नम्रता म्हणावी. देवापुढे स्वतःला शून्य करावे. प्रभु मी शून्य आहे. मी जसा आहे तसा तू मला बनविले आहेस. तुम्हाला कोणी बुद्धिमान केले? देवानेच केले. जगामध्ये अनेक लेकरे आहेत जी मानसिकरित्या विकलांग आहेत. अनेक लेकरे मतिमंद जन्मतात. तुमचा देखील त्याप्रमाणे जन्म होऊ शकला असता. त्रृटी असलेला मेंदू घेऊन तुम्ही जन्मला असता. जन्मताच तुमचे शरीर अपंग असू शकले असते. तसे झाले असते तर आज तुम्ही कसे असता? म्हणून आपण नम्र असणे फार गरजेचे आहे. आपण जसे आहोत तसे देवाने आपल्याला ठेवले आहे. प्रभो, तू मला सर्वकाही दिले आहे. केवळ मूर्ख मनुष्यच गर्विष्ठ असतो.

लूक 2:51 मध्ये लिहिले आहे की येशू नासरेथात आला. वयाच्या तीस वर्षांपर्यंत तो योसेफ व मरीयेच्या अधीन राहिला. योसेफ व मरीया परिपूर्ण होते का? नाही. आजच्या दाम्पत्यापेक्षा ते काही वेगळे नव्हते. आज देखील ख्रिस्ती कुटुंबात अधून मधून पती पत्नीचे भांडण होते. मरीया व योसेफाचे देखील भांडण होत असेल. ते पापरहीत व परिपूर्ण नव्हते. पापरहीत व परिपूर्ण कोणीही नाहीत. ते पापी होते. ते अपरिपूर्ण होते. त्यांना सर्वज्ञान नव्हते. त्यांच्या घरामध्ये पापरहीत, परिपूर्ण व न चुकणारा असा येशू राहत होता. तर आता कोणी कोणाच्या आधीन असावे ? कोणी म्हणेल की योसेफ व मरीयेने येशूच्या अधीन असायला हवे होते. आपण विचार करू की अपरिपूर्ण अशा योसेफ व मरीयेने परिपूर्ण अशा येशूच्या अधीन राहायला हवे होते. परंतु, तसे नव्हते. येशू आपल्या आईवडिलांच्या अधीन राहिला. जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांच्या अधीन राहणे आपल्याकरिता खरोखर अवघड आहे. तुमच्यापेक्षा कनिष्ठाच्या अधीन तुम्ही राहाल काय? परंतु तुम्ही जर खरोखर नम्र आहांत तर तुम्ही राहू शकाल. तुम्ही स्वतःला शून्य गणले तर तुम्ही कोणाच्याही अधीन राहू शकता. नम्रता हे गुपित आहे. आपण नम्र असल्यास अधीन राहण्याची समस्या आपल्यासाठी नाहीच. सुतार असण्याचा येशूला आनंद वाटत होता. सेवेसाठी तो बाहेर पडत असे तेव्हा तो स्वतःचे नाव पुढे करीत नसे. त्याने स्वतःचे नाव प्रसिद्ध केले नाही. त्याने स्वतःला रेव्हरेंड ही उपाधी दिली नाही. त्याने सामान्य लोकांपेक्षा स्वतःला उंच करण्याकरिता नावापुढे उपाधी जोडली नाही. कारण तो लोकांची सेवा करण्याकरिता आला होता. सर्व परीने तो आपल्या भावांसारखा झाला. जेव्हा लोकांनी त्याला राजा बनविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तिथून निघून गेला. त्याने मान सन्मान मिळविण्याचा प्रयत्न केला नाहीजेव्हा जेव्हा त्याने रोग्यांना बरे केले तेव्हा तेव्हा त्याने त्यांना सांगितले की त्यांनी कोणालाही सांगू नये. त्याची नम्रता पाहा. त्याची नम्रता तुम्हाला दिसते का? त्याची इच्छा होती की सर्व गौरव पित्याला मिळावे. तो लोकांचे लक्ष वेधू इच्छित नव्हता. लोकांचे लक्ष वेधण्याकरिता तो रोग बरे करीत होता असे मुळीच नाही. आपल्यापुढे किती सुंदर कित्ता आहे. आपल्यापुढे येशू आदर्श असावा.