WFTW Body: 

जुन्या कराराच्या अनेक विधींना नव्या करारात पूर्णता आहे. जुन्या करारांतर्गत सुंता हा अत्यंत महत्त्वाचा विधी होता. निश्चितच, अशा महत्त्वपूर्ण विधीला नवीन करारामध्ये महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अर्थ असणे आवश्यक आहे - आणि तो आहे.

फिलिप्पै३:३, ४ मध्ये आपल्याकरता याच्या अर्थाचे वर्णन करण्यात आले आहे: "जे आपण देवाच्या आत्म्याने आराधना करणारे, ख्रिस्त येशूमध्ये अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण खरे सुंता झालेले आहोत." या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. आत्म्याने आराधना करणे म्हणजे केवळ ख्रिस्तामध्ये अभिमान बाळगणारे असणे व अशा जीवनाद्वारे ते प्रकट होते जिथे देहावर भरवसा ठेवला जात नाही.

शारीरिक सुंता करताना लोक आपल्या दैहिक शरीराचा काही भाग कापून टाकतात. आध्यात्मिक सुंता करताना आपण देहावरचा (आपल्या स्व-जीवनाचा) भरवसा कापून टाकतो आणि त्याला जिवे मारतो. जुन्या करारात ज्यांची सुंता झाली नाही ते इस्राएलचा भाग होऊ शकत नव्हते (उत्पत्ती १७:१४). नव्या करारात, ज्याला स्वतःवर भरवसा आहे तो येशू ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीचा भाग होऊ शकत नाही. जे केवळ ख्रिस्तामध्ये अभिमान बाळगतात आणि स्वतःवर भरवसा ठेवत नाहीत, तेच खऱ्या मंडळीचा भाग आहेत. इतरांनी बांधलेल्या मंडळीपेक्षा आपण आपली मंडळी अधिक चांगल्या प्रकारे बांधली आहे याचा जर आपण अभिमान बाळगला, तर देवाच्या खऱ्या मंडळीमध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही.

प्रेषितांची कृत्ये ७:४१ मध्ये अशा लोकांविषयी सांगितले आहे जे स्वतःच्या हातांच्या कृतीबद्दल अभिमान बाळगतात. आपण जे काही साध्य केले आहे त्याची जर आपण बढाई मारतो, तर आध्यात्मिकरीत्या आपली सुंता झालेली नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही स्वत:च काही साध्य केले आहे, तर तुमचा विश्वास अपयशी ठरला आहे. मग देव तुमच्यावरील त्याच्या प्रीतीपोटी तुम्हाला "रात्रभर मासे पकडण्याची आणि काहीच न मिळण्याची" अनुमती देईल (योहान २१:३), तुम्हाला हे शिकवण्यासाठी की खरा विश्वास म्हणजे केवळ त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे होय.

एके दिवशी नबुखदनेस्सर आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर उभा राहिला आणि त्याने बांधलेल्या बाबेलाचे मोठे राज्य पाहून तो हुरळून गेला (दानीएल ४:२९, ३०). असा विचार करताच देवाने त्याचे राज्य त्याच्यापासून दूर केले आणि त्याला एखाद्या वनपशुसारखे केले. त्यानंतर त्याला पुन्हा समज येण्यास बरीच वर्षे लागली. त्याच्याप्रमाणेच, अनेक विश्वासणारेही देवासाठी त्यांनी जे काही साध्य केले आहे त्याबद्दल आतून हुरळून जातात . परंतु नबुखदनेस्सराने शेवटी आपल्या मूर्खपणाबद्दल पश्चात्ताप केला आणि देवाचे गौरव केले (दानीएल ४:३४-३७). अखेर त्याच्या हृदयाची सुंता झाली. दुःखाची गोष्ट ही आहे की, अनेक ख्रिस्ती पुढाऱ्यांनाही या आध्यात्मिक सुंतेचा अनुभव आलेला नाही.

देवाची अशी इच्छा आहे की आपण आपल्या हृदयाची सुंता करावी जेणेकरून आपण त्याच्यावर पूर्ण हृदयाने प्रीती करू शकू (अनुवाद ३०:६). ही हृदयाची सुंतेची खूण आहे. जर आपण स्वतःवरच प्रेम करतो आणि स्वतःचा अभिमान बाळगतो तर आपली सुंता झालेली नाही.