WFTW Body: 

येशू, जो आपला अग्रगामी (तो की जो शर्यतीत आपल्या अगोदर धावला) त्याने आपल्यासाठी पित्याच्या सानिध्यात जाण्यासाठी व राहण्यासाठी मार्ग उघडला आहे. या मार्गाला "नवीन आणि जिवंत वाट " (इब्री १०:२०) असे म्हणतात. पौलाने "सर्वदा आपल्या शरीरात येशूचे मरण वागवणे" (२ करिंथ ४:१०) असे म्हटले आहे. एकदा त्याने आपली वैयक्तिक साक्ष म्हणून म्हटले होते की, तो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिला गेला आणि आता तो स्वत: जगत नाही (गलती२:२०). ख्रिस्तच आता त्याच्यात जगत होता, कारण तो स्वत: कालवरीवर मरण पावला होता. हे त्याच्या आश्चर्यकारक जीवनाचे आणि देवाच्या उपयुक्ततेचे रहस्य होते.

येशू नेहमीच वधस्तंभाच्या वाटेने चालला - स्वमृत्यूचा मार्ग. त्याने एकदाही स्वत:ला संतोषविले नाही (रोम.१५:३). स्वत:ला संतोषविणे हे सर्व पापाचे सार आहे. स्वतःला नाकारणे म्हणजे पवित्रतेचे सार आहे. येशूने एकदा म्हटले होते की, जोपर्यंत एखादा दररोज स्वत:ला नाकारण्याचा आणि दररोज स्वत:ला मरणे याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत कोणीही त्याचे अनुसरण करू शकणार नाही (लूक ९:२३). हे स्पष्ट आहे. जर आपण स्वतःला दररोज नाकारत नाही तर येशूचे अनुसरण करणे अशक्य आहे. कदाचित ख्रिस्ताच्या रक्तात आपण शुद्ध केलेले असू, पवित्र आत्मा मिळाला असेल आणि आपल्याला वचनाचे सखोल ज्ञान असेल. पण जर आपण दररोज आपल्या स्वतःला मरत नसू , तर आपण प्रभू येशूचे अनुसरण करू शकत नाही. हे निश्चित आहे.

येशूने एकदा एका जुन्या वस्त्रावर नवीन कापडाचे ठिगळ लावणाऱ्या लोकांबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले की ते वस्त्र फाडून टाकेल (मत्तय ९:१६). जुने वस्त्र सोडून नवेकोरे वस्त्र मिळवण्याची गरज होती. दुस-या एका दाखल्यात त्याने जर आम्हाला फळ चांगले हवे असेल तर झाडालाच चांगले बनवण्याबद्दल सांगितले , फक्त वाईट फळ तोडून काही उपयोग नव्हता (मत्तय ७:१७-१९).

या सर्व दाखल्यात मूलत: एक धडा आहे: जुन्या मनुष्याला सुधारता येत नाही. त्याला देवाने वधस्तंभावर चढवले आहे (रोम.६:६). आता आपण देवाने त्याच्या केलेल्या न्यायाशी सहमत असले पाहिजे आणि त्याला दूर घालवले पाहिजे आणि नवीन मनुष्याला परिधान केले पाहिजे.

वधस्तंभाची वाट ही आध्यात्मिक उन्नतीची वाट आहे. राग, चिडचिड, उतावीळपणा, वासनापूर्ण विचार, अप्रामाणिकपणा, मत्सर, दुष्टपणा, कटुता आणि पैशाचे प्रेम इत्यादी पापांवर मात करत नसाल तर त्याचे उत्तर येथे आहे: तुम्ही वधस्तंभाचा मार्ग टाळला आहे.

एक मृत माणूस आपल्या हक्कांसाठी उभा राहत नाही. तो प्रतिकार करत नाही. त्याला आपल्या प्रतिष्ठेची पर्वा नाही. तो सूड घेणार नाही. तो कोणाचाही तिरस्कार करू शकत नाही किंवा कोणाविरुद्धही कटुता ठेवू शकत नाही. स्वत:ला मरणे याचा हाच अर्थ आहे.जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर, देवाने आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी केलेल्या इतर सर्व तरतुदींप्रमाणे वधस्तंभाची वाटही आपल्याला दररोज आवश्यक आहे.