लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रेषित पौलाच्या जीवनात आत्म्याने भरलेल्या जीवनाची चार वैशिष्ट्ये आपण पाहू या.

१. परिपूर्ण समाधान : आत्म्याने भरलेले जीवन हे सर्वप्रथम परिपूर्ण समाधानाचे जीवन आहे. फिलिप्पै ४:११ मध्ये पौल म्हणतो: "मी असेन त्या स्थितीत समाधानी राहण्यास शिकलो आहे." आणि असे समाधान आपल्यासोबत परिपूर्णत आनंद आणि शांती आणते. म्हणूनच, पौल एकाच अध्यायातील ४ आणि ७ वचनांमध्ये आनंद व शांतीविषयी बोलतो. जेव्हा आपण आपल्याबरोबरच्या त्याच्या सर्व व्यवहारांवर पूर्णपणे समाधानी असतो तेव्हाच आपण देवाची स्तुती करू शकतो. जर आपण सार्वभौम असलेल्या देवावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आपल्या भल्यासाठी एकत्र काम करू शकणाऱ्या देवावर विश्वास ठेवला (रोम ८:२८) तर आपण सर्व परिस्थितीत खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. मग आपण हबक्कूकप्रमाणे देवाची स्तुती करू शकतो, जरी झाडे फळ देत नाहीत, जेव्हा आपला कळप मरतो आणि जेव्हा आपल्याला मोठी आर्थिक हानी सोसावी लागते – किंवा आणखी कोणत्याही परिस्थितीत (हबक्कूक ३:१७,१८). इफिस ५:१८-२०) असे सूचित करते की पवित्र आत्म्याच्या प्रवेशाचा बाह्य परिणाम म्हणजे देवाची स्तुती करणे होय. तुरुंगात बंदिवासात पाय खोड्यात अडकवलेले असतानाही प्रेषित पौल आनंदी होऊ शकत होता. (प्रेषितांची कृत्ये १६:२५ ). तिथेही तो समाधानी होता आणि त्याला तक्रार करण्यासारखं काहीच सापडलं नाही. आत्म्याने भरलेल्या जीवनाच्या पहिल्या चिन्हांपैकी हे एक आहे. ख्रिस्ती व्यक्तीमध्ये कुरकुर आढळते तेव्हा असे सूचित होते की अरण्यात देवाविरुद्ध कुरकुर करणाऱ्या इस्राएल लोकांप्रमाणे त्याने अजूनही विजयाच्या वचनदत्त देशात प्रवेश केलेला नाही.

२.पावित्र्यात वाढ : दुसरे म्हणजे आत्म्याने भरलेले जीवन हे पावित्र्यात वाढणारे जीवन आहे. जसजसे मनुष्याचे स्वतःचे जीवन पवित्रतेत वाढते तसतसे त्याची देवाच्या परिपूर्ण पवित्रतेबद्दलची जाणीवही वाढते. दोन्ही एकत्रच वाढतात. किंबहुना, दुसरी बाब ही एखाद्या व्यक्तीकडे पहिली बाब आहे की नाही याची एक परीक्षा आहे. पालट झाल्यावर पंचवीस वर्षांनंतर पौल म्हणतो, "मी प्रेषितांमध्ये सर्वांत कनिष्ठ आहे" (१ करिंथ १५:९). पाच वर्षांनंतर तो म्हणतो, "मी सर्व पवित्रजनांमध्ये अगदी लहानातील लहान आहे" (इफिस ३:८). आणखी एका वर्षानंतर तो म्हणतो, "त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे"(लक्षात घ्या, “मी होतो" नव्हे तर "मी आहे") (१ तीमथ्य १:१५). त्या विधानांमध्ये त्याची पवित्रेततील प्रगती तुम्हाला दिसते का? पौल जितका जवळ देवाबरोबर चालला, तितके त्याला आपल्या देहाची भ्रष्टता व दुष्टतेची जाणीव झाली. आपल्या देहात कोणतीही चांगली गोष्ट आढळत नाही हे त्याने ओळखले (रोम ७:१८). आत्म्याने भरलेला माणूस केवळ इतरांवर प्रभाव पडावा की आपण पवित्रतेत वाढत आहोत असे इच्छित नाही, तर प्रत्यक्षात तसे करेल. त्याला पवित्र करत आहेत असे वाटणार्‍या अनुभवांची तो साक्ष देणार नाही किंवा त्याच्या पवित्रीकरणाच्या दैवी सिद्धांताबद्दल इतरांची खात्री पटवून देणार नाही. त्याच्या जीवनात इतके पावित्र्य असेल की इतर जण स्वत:च त्याच्याकडे येतील आणि त्याला त्याच्या जीवनाचे रहस्य विचारतील. जे.बी. फिलिप्स जे भाषांतर करतात ते त्याच्याकडे असेल, "भ्रम नसलेले पावित्र्य" (इफिस ४:२४)

३.खिळलेले जीवन : तिसरे म्हणजे आत्म्याने भरलेले जीवन हे एक खिळलेले जीवन असते. पौल म्हणाला, "मी ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे" (गलती २:२०). क्रूसाचा मार्ग आत्म्याच्या पूर्णतेचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे आत्म्याने येशूला क्रूसाकडे नेले त्याप्रमाणे तो आपल्यालाही घेऊन जाईल. आत्मा आणि क्रूस अविभाज्य आहेत. क्रूस हे दुर्बलता, लज्जा आणि मृत्यूचे प्रतीक आहे. प्रेषित पौलाच्या जीवनात भीती, गोंधळ, दुःख आणि अश्रू होते (२ करिंथ १:८; ४:८; ६:१०; ७:५ पाहा). तो मूर्ख आणि धर्मांध मानला जात होता. त्याला सहसा इतरांकडून घाण आणि कचऱ्यासारखी वागणूक दिली जात असे (१ करिंथ ४:१३). हे सर्व आत्म्याच्या पूर्णतेशी विसंगत नाही. उलट, आत्म्याने भरलेला मनुष्य, देव त्याला अपमान व मृत्यूच्या मार्गावरून पुढे आणि पुढे नेताना पाहील.

४.सतत विस्तार: चौथे म्हणजे आत्म्याने भरलेले जीवन हे एक जीवन आहे जे सतत पूर्णतेच्या अधिक स्तराच्या शोधात असते. पालट झाल्यानंतर जवळजवळ तीस वर्षांनंतरही, आपल्या आयुष्याच्या शेवटास पौल म्हणतो: "मी लक्ष्याकडे धावत आहे “(फिलिप्पै ३:१४). त्याला ते अजूनही प्राप्त झाले नाही. तो आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याच्या पूर्णतेच्या उच्च स्तराचा अजूनही शोध घेत आहे आणि म्हणूनच हे ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक आध्यात्मिक स्नायूला ताण पडू देत आहे. तो फिलिप्पै ३:१२ मध्ये म्हणतो: "मी परिपूर्ण (पूर्ण) नाही.” पण १५ व्या वचनात तो अगदी उलट म्हणतो असे दिसते: "जे परिपूर्ण आहेत (पूर्ण) आहेत त्यांनी अशी चित्तवृत्ती ठेवावी." आत्म्याने भरलेल्या जीवनाचा हा विरोधाभास आहे - पूर्ण आणि तरीही पूर्ण नसणे; दुस-या शब्दांत सांगायचे तर पूर्ण आणि तरीही अधिक पूर्णतेची इच्छा असणे. आत्म्याने भरलेली अवस्था स्थिर नाही. पूर्णतेचे अधिक आणि अधिक स्तर असतात. पवित्र शास्त्र म्हणते की पवित्र आत्मा आपल्याला वैभवाच्या एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे नेतो. (२ करिंथ ३:१८) किंवा दुस-या शब्दांत, पूर्णतेच्या एका स्तराकडून दुसऱ्या स्तराकडे नेतो. एक कप पाण्याने भरलेला असू शकतो; बादलीही तशीच असू शकते; तसेच टाकी आणि नदीही असू शकते. पण कपाची पूर्णता आणि नदीची पूर्णता यात प्रचंड फरक आहे.

पवित्र आत्मा सतत आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तो आपल्याला मोठ्या प्रमाणात भरू शकेल. इथेच क्रूसाचा प्रवेश होतो. जर आपण क्रूसाचा मार्ग टाळला तर आपल्या जीवनात कोणताही विस्तार होऊ शकत नाही. जर आपण आपल्या आयुष्यात सातत्याने क्रूस स्वीकारला तर आपल्याला आपला कप बादली बनताना, आपली बादली टाकी बनताना, आपली टाकी नदी बनताना आणि नदी अनेक नद्या बनताना दिसेल. प्रत्येक टप्प्यावर आपली क्षमता जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्याला पुन्हा आत्म्याने भरावे लागेल. अशाप्रकारे, प्रभू येशूने दिलेले अभिवचन आपल्यात पूर्ण होईल, "जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जीवंत पाण्याच्या नद्या वाहतील(तो पवित्र आत्म्याबद्दल बोलत होता)” (योहान ७:३८, ३९).