WFTW Body: 

जेव्हा देवाने इस्राएल लोकांना मिसरदेशामधील गुलामगिरीतून बाहेर काढले आणि त्यांना अरण्यातून मार्ग दाखवत नेले, तेव्हा त्याने त्यांना अशी आज्ञा दिली: "मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे" (निर्गम २५:८). या पवित्र स्थानाला 'मंडप' असे म्हटले जात असे; पुढे इस्राएल लोकांनी कनान देशात प्रवेश केल्यानंतर, या मंडपाची जागा मंदिराने घेतली.

या वचनावरून आपल्याला असे दिसून येते की, देवाची त्याच्या लोकांमध्ये निवास करण्याची इच्छा होती. ख्रिस्ताच्या आगमनापासून देव कोणत्याही जगिक इमारतीत निवास करत नाही. आता तो मनुष्याच्या हृदयात आणि घरांमध्ये वस्ती करण्यास उत्सुक असतो. आजही प्रभू असे म्हणतो: 'माझ्यासाठी एक पवित्र स्थान (देवालय) उभारा, म्हणजे मी तुमच्यासोबत निवास करेन.' याच उद्देशाने देव पती-पत्नीला विवाहाच्या पवित्र बंधनात एकत्र आणतो. देवाला त्यांच्यासोबत निवास करता यावा यासाठी त्यांनी आपले घर, हे एक पवित्र स्थान म्हणून उभारले पाहिजे.

देवाच्या गौरवासाठी घर उभारणे

साधारणपणे, जेव्हा लोकांचे लग्न होते, तेव्हा ते 'स्वतःसाठी' एक घर बांधण्याचा विचार करतात. प्रत्येक ख्रिस्तेतर जोडप्याचे हेच उद्दिष्ट असते. परंतु, विश्वासणारे म्हणून - जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे वचन यांचा सन्मान करायचा असेल - तर आपण स्वतःसाठी घर उभारता कामा नये. आपण देवाच्या निवासासाठी एक पवित्र स्थान उभारले पाहिजे. एका खऱ्या ख्रिस्ती घरामध्ये आणि ख्रिस्तेतर घरामध्ये हाच मूलभूत फरक असतो. अनेक विश्वासणाऱ्यांचे हे उद्दिष्ट नसते, म्हणूनच त्यांच्या घरांमध्ये आपल्याला इतकी दुर्दशा आणि अधार्मिकता दिसून येते. त्यांनी आपले घर स्वतःसाठी उभारले होते, देवासाठी नव्हे.

जेव्हा लोकांचे लग्न होते, तेव्हा त्यांचे जीवन किती आनंदी असेल याबद्दल त्यांच्या मनात खूप मोठ्या आशा असतात. परंतु सहा महिने उलटल्यानंतर आणि वास्तवाचे भान आल्यावर, परिस्थिती पूर्णपणे वेगळीच असते. ते सतत एकमेकांशी वाद घालत असतात आणि एकमेकांवर ओरडत असतात. त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसापर्यंत पोहोचेपर्यंत, अनेक जोडपी एकमेकांना कंटाळलेली आणि त्रासलेली असतात. असे का घडते? कारण ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी घर उभारत होते. परंतु देवाचे वचन आपल्याला हे शिकवते की, जर आपण देवाचे गौरव करण्याचा प्रयत्न केला आणि आपले घर 'त्याच्यासाठी' उभारले तरच आपल्याला एक सुखी वैवाहिक जीवन लाभू शकते.

देवाचा विवाहित जोडप्यांच्या बाबतीत जो उद्देश आहे, तोच उद्देश जुन्या कराराच्या काळात इस्राएल लोकांच्या बाबतीत होता. देव लोकांना विवाहाच्या बंधनात एकत्र आणतो, जेणेकरून त्यांनी 'त्याच्या गौरवासाठी' एक घर उभारावे. निर्गमच्या पुस्तकात, देवाने इस्राएली लोकांना निवासमंडपाच्या बांधकामासाठी अगदी अचूक आराखडा दिला होता; आणि त्यांनी तो आराखडा देवाने आज्ञा केल्याप्रमाणेच तंतोतंत पूर्ण करायचा होता. इस्राएली लोकांमध्ये देवाची योजना तंतोतंत पाळण्याइतका नम्रपणा होता. परिणामी, निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला (निर्गम ४०:३४). जर तुम्हाला परमेश्वराच्या तेजाने तुमच्या घरात निवास करावा असे वाटत असेल तर तुम्हीही तुमचे घर देवाच्या योजनेनुसारच तंतोतंत बांधले पाहिजे. तुमचे वैवाहिक जीवन पवित्र शास्त्रामध्ये प्रभूने आज्ञा केल्याप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करा. तेव्हा देवाचे गौरव तुमच्या घरावरही स्थिरावेल.

देवाच्या आज्ञे प्रमाणे घर बांधणे

अनेक ख्रिस्ती घरांमध्ये आपल्याला कटुता, मत्सर, कुरकुर आणि पैशाविषयीची हाव दिसून येते. हे एखाद्या ख्रिस्तेतर घरापेक्षा फारसे वेगळे नसते. याचे कारण स्पष्ट आहे: ते घर देवाच्या गौरवाने भरू शकत नाही; कारण त्या जोडप्याने देवाच्या वचनानुसार आपले घर बांधण्याचा प्रयत्नच केलेला नसतो. त्याऐवजी, त्यांनी आपले घर स्वतःच्या हेतू नुसार बांधलेले असते.

करिंथकरांस पत्र ११:३ मध्ये आपल्याला देवाची घराविषयीची आज्ञा स्पष्टपणे दिसून येते: "ख्रिस्त हा पुरुषाचे मस्तक आहे आणि पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे." आपल्याला अनेकदा ख्रिस्ती घरांमध्ये "ख्रिस्त हे या घराचे मस्तक आहे" हे शब्द लाकडी फलकावर लिहिलेले पाहायला मिळतात. परंतु वास्तवात, ख्रिस्त हे त्या घराचे मस्तक नसते. जेव्हा देवाने आदाम आणि हव्वा यांना निर्माण केले, तेव्हा त्याने आदाम याला हव्वेचे मस्तक म्हणून नेमले. खुद्द परमेश्वर हा आदामाचे मस्तक होता. देवाने त्या दोघांना एकत्र जोडल्यानंतर, पवित्र शास्त्रामध्ये आपण त्यानंतर लगेचच वाचतो की सैतानाचा तेथे प्रवेश झाला . यावरून आपल्याला हे शिकायला मिळते की, आजही जेव्हा परमेश्वर एखाद्या स्त्री-पुरुषाला विवाहाच्या बंधनात एकत्र जोडतो, तेव्हा लगेचच सैतान तिथे येतो. त्यामुळे, आपण सावध राहिले पाहिजे. सैतान आपल्या घरांमध्ये प्रवेश करता कामा नये.

त्या पहिल्या घरात सैतानाने प्रवेश कसा केला? कारण की, आदाम आणि हव्वा यांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले नाही. जेव्हा सैतान हव्वेपाशी आला आणि त्याने तिला देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास तिला सुचवले, तेव्हा तिने असे म्हणायला हवे होते की: "सैताना, मी हा निर्णय स्वतःहून घेऊ शकत नाही. देवाने मला एक प्रमुख (मस्तक) नेमून दिला आहे. मला आधी त्याच्याशी सल्लामसलत करू दे आणि त्यानंतर मी तुला उत्तर देईन." जर तिने तसे केले असते, तर हि हकीकत किती वेगळी असती ! परंतु तिने सैतानाशी चर्चा करणे चालूच ठेवले आणि शेवटी, आपल्या ‘प्रमुखचा’ (मस्तकाचा) सल्ला न घेताच एक निर्णय घेतला. तिने देवाच्या नियमाचे उल्लंघन केले आणि त्यानंतर आपल्या पतीलाही अवज्ञा करण्यास सांगितले. आदामाने तिला असे म्हणायला हवे होते की, " परमेश्वर माझा प्रमुख (मस्तक) आहे; मला त्याचा सल्ला घेऊ दे." परंतु, त्यानेही देवाच्या आज्ञेचे पालन केले नाही. जर फक्त त्यांनी त्यांच्या घराच्या बाबतीत देवाच्या आज्ञेचे पालन केले असते, तर आज जगात दिसून येणारे सर्व पाप, दुःख आणि गोंधळ अस्तित्वातच आले नसते. अशाच प्रकारे, सैतान आजही अनेक घरांमध्ये शिरकाव करतो आणि त्यांचा विनाश घडवून आणतो. स्तोत्रसंहिता १२७:१ मध्ये म्हटले आहे: " परमेश्वर जर घर बांधत नाही, तर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहे ."

परमेश्वर आपले घर तेव्हाच खऱ्या अर्थाने बांधू शकतो, जेव्हा आपण त्याच्या वचनाचे तंतोतंत पालन करू.