लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

उत्पत्ती ३२:२९ आपण मध्ये असे वाचतो, की "देवाने तेथे याकोबाला आशीर्वाद दिला." देवाने याकोबाला तेथे आशीर्वाद का दिला याची चार कारणे आहेत- पनीएल येथे.

१. देवासोबत एकटे असणे
याकोबाला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला ज्या ठिकाणी तो देवासोबत एकटाच होता. त्याने बाकीच्या सर्वांना दूर पाठवले आणि तो एकटाच राहिला (उत्पत्ती ३२:२४). विसाव्या शतकातील विश्वासणार्‍यांना फक्त देवासोबत फार वेळ घालवणे कठीण जाते. वेगवान युगाचा आत्मा आपल्यापैकी बहुतेकांमध्ये शिरला आहे आणि आपण कायमस्वरूपी व्यस्त आहोत. अडचण आपल्या स्वभावात किंवा आपल्या संस्कृतीमध्ये नाही. आपले प्राधान्यक्रम योग्य नाहीत- इतकेच. येशूने एकदा म्हटले होते की, विश्वासणाऱ्यांसाठी आवश्यक अशी एक गोष्ट म्हणजे त्याच्या पायाजवळ बसून त्याचे ऐकणे (लूक १०:४२). पण आता आपण यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणून येशूच्या शब्दाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे विनाशकारी परिणाम आपल्याला भोगावे लागतात. जर आपण नेहमीच आपल्या विविध कार्यात व्यस्त राहतो आणि उपवास आणि प्रार्थनेत देवाबरोबर एकटे असणे काय आहे हे आपल्याला माहीत नसेल तर देवाचे सामर्थ्य किंवा आशिर्वाद आपल्याला नक्कीच कळणार नाही – मला म्हणायचे आहे , त्याची खरी शक्ती (पुष्कळ लोक ज्याची बढाई मारतात त्या गोष्टी नव्हेत ).

२.देवाकडून मोडले जाणे
ज्या ठिकाणी याकोब पूर्णपणे मोडला होता त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद मिळाला. पनीएलमध्ये एक पुरुषाने याकोबाशी झोंबी केली. वीस वर्षांपासून देव याकोबाशी झोंबी करत होता, पण याकोब त्याला शरण जाण्यास तयार नव्हता. देव याकोबाला दाखवण्याचा प्रयत्न करत होता की त्याची हुशारी आणि नियोजन असतानाही त्याचा हातचे काम चुकत होते. पण याकोब अजूनही हट्टी होता. शेवटी देवाने याकोबाच्या जांघेस वार केला व ती उखळली (वचन २५). मांडी हा शरीराचा सर्वांत मजबूत भाग आहे आणि देवाने ह्याच भागावर प्रहार केला.

३. देवासाठी भुकेले असणे
देवाने याकोबाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला ज्या ठिकाणी तो देवासाठी अत्यंत उत्कंठित व भुकेला झाला. तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही." (उत्पत्ति ३२: २६). याकोबाचे हे शब्द ऐकण्यासाठी देवाने वीस प्रदीर्घ वर्षे प्रतीक्षा केली. ज्याने आपले आयुष्य ज्येष्ठपणाचा हक्क, स्त्रिया, पैसा आणि मालमत्ता हिसकावून घेण्यात घालवले तो आता ते सर्व सोडून देवाला घट्ट पकडू पाहत होता. याच गोष्टीसाठी देव याकोबाच्या जीवनात सतत काम करत होता. देवाला फार आनंद झाला असेल जेव्हा याकोबाने शेवटी पृथ्वीवरील तात्पुरत्या गोष्टींकडून नजर वळवली असेल आणि देवासाठी व त्याच्या आशीर्वादासाठी तो व्याकूळ व तहानलेला झाला असेल. होशेय १२:४ मध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की याकोबाने रडून व विनंती करून त्या रात्री पनीएल येथे आशीर्वाद मागितला.अगोदरच्या वर्षांत जेव्हा त्याला फक्त या जगातल्या गोष्टी हव्या होत्या, त्या तुलनेत त्या रात्री तो किती वेगळा माणूस होता. देवाने त्याच्याशी केलेले व्यवहार शेवटी फळास आले!

४. देवाशी प्रामाणिक असणे
ज्या ठिकाणी याकोब देवाशी प्रामाणिक राहिला त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद मिळाला. देव त्याला विचारतो, "तुझे नाव काय आहे?" वीस वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला तोच प्रश्न विचारला होता तेव्हा तो खोटे बोलला होता आणि म्हणाला होता, "मी एसाव आहे" (उत्पत्ती २७:१९). पण आता तो प्रामाणिक आहे. तो म्हणतो, "प्रभू, मी याकोब आहे" किंवा दुस-या शब्दांत सांगायचे तर, "प्रभुजी, मी लुबाडणारा, फसवणारा आणि सौदेबाजी करणारा आहे." आता याकोबात कोणतेही कपट नव्हते. आणि म्हणून देव त्याला आशीर्वाद देऊ शकला. देवाने याकोबाला तेथे आशीर्वाद दिला- जेव्हा तो प्रामाणिक झाला, जेव्हा त्याला कोणतेही ढोंग करण्याची इच्छा नव्हती व त्याने कबूल केले की, "प्रभू मी ढोंगी आहे. माझ्या आयुष्यात लाज आणि ढोंग आहे." मी तुम्हाला सांगू इच्छितो की, माणसाला हे हृदयापासून कबूल करण्यासाठी खरे भग्नहृदयी असावे लागते. पुष्कळ ख्रिस्ती पुढारी खोट्या नम्रतेने असे शब्द बोलतात- नम्र असण्याचा नावलौकिक मिळवण्यासाठी. मी अशा प्रकारच्या अमंगळपणाबद्दल म्हणत नाही. मला जे म्हणायचे आहे ते हे की तो हा प्रामाणिकपणा आहे जो खरोखर मोडल्याने आणि भग्न हृदयामधून बाहेर येतो. हे मोलवान आहे. आपल्या सर्वांमध्ये फार कपट आहे. देव आपल्यावर दया करो जेव्हा आपण इतके पवित्र नसताना पवित्र असल्याचे भासवतो. आपण आपल्या सर्व अंतःकरणाने प्रामाणिकपणा, खरेपणा आणि प्रांजळपणा यांचा लोभ धरूया आणि मग आपल्या जीवनावरील देवाच्या आशीर्वादाला कोणतीही मर्यादा राहणार नाही.