मत्तय ५:३ मध्ये येशू म्हणतो, “जे आत्म्याने दीन ते धन्य”. “धन्य” या शब्दाचा अर्थ “आनंदी” किंवा अॅम्प्लिफाइड बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे, “हेवा करण्याजोगा कोणी ” असा होऊ शकतो. जर तुम्हाला पृथ्वीवरील एखाद्याचा हेवा करायचा असेल तर श्रीमंत व्यक्तीचा हेवा करू नका, प्रसिद्ध व्यक्तीचा हेवा करू नका आणि देखण्या व्यक्तीचा हेवा करू नका. आत्म्याने दीन असलेल्याचा हेवा करा, कारण स्वर्गाचे राज्य त्याचे आहे. प्रभावी व्यक्तिमत्व आणि संपत्ती यासारखे इतर अनेक गुण असलेले लोक या पृथ्वीवरील गोष्टी मिळवू शकतात आणि आणि पृथ्वीवर राज्य मिळवू शकता, परंतु स्वर्गाचे राज्य आत्म्याने दीन असणाऱ्यांचे आहे. दीर्घकाळात, ह्याचाच हेवा केला पाहिजे, कारण त्याची संपत्ती अनंतकाळ टिकणार आहे. जेव्हा आपण पृथ्वीवरील आपल्या आयुष्याचा विचार करतो, जरी ते ७० किंवा ८० वर्षे असले तरी, जर तुम्हाला खरोखरच असे वाटते की माणूस एक शाश्वत प्राणी आहे (अनंतकाळ हा कधीही न संपणारा आहे, अनंतकाळातील लाखो वर्षे एका सेकंदासारखी असतात), तर ७० वर्षे किती असतील? काहीच नाही! पेत्राच्या दुसऱ्या पत्रात असे म्हटले आहे की हजार वर्षे ही प्रभूसमोर एका दिवसासारखी आहेत आणि एक दिवस हा हजार वर्षांसारखा आहे! अनंतकाळाच्या प्रकाशात, पृथ्वीवरील आपले संपूर्ण जीवन खूप लहान आहे.
सुज्ञ माणूस तो आहे जो खरोखर त्याचे भविष्य देवाच्या राज्यात असण्यासाठी झटतो, आणि येथे आपल्याला सांगितले आहे की जो आत्म्याने दीन आहे, त्याच्याकडे देवाच्या राज्यात जास्तीत जास्त संपत्ती असेल. हा एक वाक्यांश अनेक ख्रिस्ती लोकाना समजत नाही कारण ते पवित्र शास्त्रातील अश्या गोंधळात टाकणाऱ्या विधानांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त वाचतात आणि पुढे जातात. एका गोष्टीची मला खूप मदत होते ती म्हणजे उदाहरणाद्वारे विचार करणे. मला असे आढळते की, मी चित्रांद्वारे जेव्हा विचार करतो तेव्हा मला पवित्र शास्त्र अधिक स्पष्टपणे समजते. खरं तर, येशूने स्वतः अनेक सिद्धांतांचे स्पष्टीकरण अनेक दाखले वापरून आणि चित्रांच्या स्वरूपात केले आहे जसे मीठ आणि प्रकाश.
आपण "आत्म्याने दीन " ची तुलना "शरीराने दीन" असण्याशी करू शकतो कारण माणूस हा आत्मा आणि शरीर आहे आणि आपल्याला माहीत आहे की शरीराने दीन असणे म्हणजे काय. एक भटका किंवा भिकारी शरीराने दीन असतो, म्हणजेच त्याच्याकडे त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी नसतात. रस्त्यावर राहणारा एक खरोखरच गरीब भिकारी फक्त दिवसभराच्या त्याच्या गरजा भागवण्यासाठी घरोघरी जाऊन भीक मागतो, आणि नंतर पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी काही मिळवण्यासाठी पुन्हा त्याला त्याच घरी परत यावे लागते. म्हणून ते चित्र "आत्म्याने दीन " या वाक्यांशाशी जोडल्यावर आपल्याला दिसून येते की इथे येशू अश्या व्यक्ती बद्दल बोलत आहे ज्याला दररोज त्याच्या आत्मिक गरजेची जाणीव असते. तो अशा एका व्यक्तीचे वर्णन करत आहे जो त्या भिकाऱ्यासारखाच आहे, ज्याला दररोज त्याच्या शारीरिक गरजांची जाणीव आहे आणि त्यासाठी तो एखाद्या उदार माणसाच्या घरी मदत मिळण्यासाठी जातो. आणि जर त्या माणसाने त्याला विचारले की, "मी तुला काल जे दिले त्याचे काय?" तर तो म्हणेल, “ते काल संपले – तूम्ही मला काल दिलेले पैसे कालच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पुरेसे होते, आणि पुन्हा मला गरज आहे. मी कंगाल आहे, मला गरज आहे.”
जो व्यक्ती “आत्म्याने दीन” आहे तो देवाकडे अशा प्रकारे येतो आणि म्हणतो, “प्रभू, मी एक गरजू व्यक्ती आहे.” जसा भिकारी त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मागतो, तसा तो दररोज देवाकडे त्याच्या आत्मिक गरजेची जाणीव ठेवून येतो आणि त्याची आत्मिक गरज पूर्ण करण्यासाठी मदत मागतो.
नीतिसूत्राच्या पुस्तकात, असे एक वचन आहे जे या स्थितीबद्दल बोलते . नीतिसूत्रे ८ हा ज्ञानाची थोरवी बद्दलचा अध्याय आहे आणि ख्रिस्ताचे येथे ज्ञान म्हणून चित्रण केले आहे, तो म्हणतो, “मी, जे ज्ञान…....” (वचन १२ पासून सुरू होते). तो पुढे म्हणतो की ज्ञानाद्वारेच जग निर्माण झाले. आणि २४ व्या वाचनात म्हटले आहे की शेते आणि पृथ्वी आणि इतर सर्व काही अस्तित्वात येण्यापूर्वी तो होता - जेव्हा त्याने आकाश स्थापन केले (वचन २७), तो तेथे होता. म्हणून आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते म्हणते, “जो माझ्या दाराशी नित्य जागत राहून, माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य.” आता देवाच्या दारापाशी वाट पाहणाऱ्या त्या भिकाऱ्याचा विचार करा. ज्याप्रमाणे एक भिकारी त्याच्या दैनंदिन पैशाच्या बक्षीसाची वाट पाहातो, त्याचप्रमाणे आपल्याला दररोज देवासमोर आत्मिक दीन म्हणून यायचे आहे.
गरजू असल्याशिवाय आपण असे येणार नाही. श्रीमंत लोक इतरांच्या घरी भीक मागायला जात नाहीत; त्यांना ते करायला लाज वाटेल. भिकारी गरजू असल्याने त्याला त्याची लाज वाटत नाही. त्याच्याकडे अन्नासाठी किंवा त्याच्या दैनंदिन गरजांसाठी पैसे नाहीत याची त्याला जाणीव आहे. ज्या व्यक्तीला दररोज त्याच्या आपण गरजांची जाणीव असते तोच दररोज देवासमोर येईल आणि म्हणेल, “प्रभु मी एक गरजू व्यक्ती आहे. कृपया मला आजसाठी ज्ञान दे.” आणि नीतिसूत्रे ८:३५ मध्ये म्हटल्याप्रमाणे, “जो मला शोधतो त्याला जीवन प्राप्त होते.”
आत्म्याने दीन असण्याचा अर्थ हा आहे: आपल्या आत्मिक गरजांची सतत जाणीव असणे. जो आपल्या आत्मिक गरजेची सतत जाणीव ठेवतो आणि देवाकडून ज्ञान मिळवण्याचा सतत प्रयत्न करतो, त्याला स्वर्गाचे संपूर्ण राज्य मिळेल. जर तुम्ही स्वर्गाचे राज्य देवाच्या राज्याची संपत्ती म्हणून पाहिले तर, इफिसकरांस पत्र १:३ मध्ये पवित्र शास्त्र म्हणते की देवाने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्ता मध्ये आशीर्वादित केले आहे. पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद स्वर्गीय ठिकाणी ख्रिस्तामध्ये आपला आहे. आपण स्वर्गीय राज्यातील सर्व आत्मिक आशीर्वादांना हजारो खोल्या असलेल्या एका मोठ्या वाड्यासारखे समजू शकतो आणि त्या वाड्याचे प्रत्येक दार उघडणारी मुख्य किल्ली म्हणजे आत्म्याची दीनता. जो आत्म्याने दीन आहे तो धन्य आहे, कारण तो स्वर्गाचे संपूर्ण राज्य - म्हणजेच वाड्यातील प्रत्येक खोली - मिळवू शकतो. जर त्याने ही गुरुकिल्ली घट्ट धरून ठेवली तर प्रत्येक खोलीतील खजिना त्याचा असेल.