WFTW Body: 

देवाने सैतानाला व आपल्या वासनांना इतके प्रबळ होऊ दिले आहे, जेणेकरून आपण आपल्या सामर्थ्याने त्यांच्यावर विजय मिळवू शकू अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला देवाच्या सामर्थ्याचा शोध घेण्यास भाग पाडले आहे. इस्राएली हेरांनी कनानमधील रहिवाशांचा आकार पाहून स्वत:ला टोळासारखे गणले. (गणना १३:३२,३३) तरीपण यहोशवा आणि कालेब यांनी देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवला आणि त्या देशात प्रवेश केला आणि त्या धिप्पाड लोकांना ठार मारले. आपल्या सर्व वासनांवर विजय मिळवण्यासाठी आपल्याला त्या वृत्तीची गरज आहे. म्हणून विश्वासाने असे म्हणत राहा, "मी करू शकतो आणि देवाच्या सामर्थ्याने सैतानावर व माझ्या सर्व वासनांवर विजय मिळवीन."

प्रत्येक मोहात दोन रस्ते तुमच्यासाठी खुले असतात- (i) सुखाचा मार्ग आणि (ii) दु:खाचा मार्ग, जिथे तुम्ही देहाला तो अभिलाषा धरत असलेल्या आनंदाला नाकारता. नंतरचा मार्ग म्हणजे "देहात दुःख सोसणे " (१ पेत्र ४:१). जसजसा तुम्ही प्रतिकार करत राहाल आणि दु:ख सहन करत राहाल तसतसे शेवटी तुम्ही पाप करण्याऐवजी मरायलाही तयार व्हाल. तेव्हा तुम्ही "रक्त पडेपर्यंत पापाचा प्रतिकार कराल " (इब्री लोकांस १२:४).

एक शारीरिक कसरतपटू स्वत:ला बऱ्याच क्षेत्रांमध्ये शिस्त लावतो. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला सैतानावर व तुमच्या वासनांवर मात करायची असेल आणि सरतेशेवटी या स्वर्गाच्या शर्यतीत तुम्हाला जिंकायचे असेल, तर तुम्ही तुमच्या शारीरिक इच्छांना शिस्त लावली पाहिजे. पौल म्हणाला, "तर मी आपल्या शरीराला शिस्त लावतो व त्याला हवे ते नव्हे तर त्याने जे करणे गरजेचे ते करायला लावतो; असे न केल्यास मी दुसर्‍यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन." (१ करिंथ.९:२७ - लिविंग बायबल).

मोह हा आपल्या मनातला एक विचार म्हणून येतो. आपण त्याचा ताबडतोब प्रतिकार केला पाहिजे. पण जेव्हा आपण विजयासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो, तेव्हा किमान काही सेकंद तरी त्यात गुंतत नाही तोपर्यंत त्याचा प्रतिकार करण्यात सहसा आपण यशस्वी होत नाही. याचे कारण म्हणजे अनेक वर्षे आपल्याला असलेल्या जीवनशैलीची सवय आहे. जोपर्यंत आपल्याला प्रतिकार करण्यात सुरुवातीचा हा होणारा विलंब शून्यावर येईपर्यंत आपण लढत राहिले पाहिजे! ज्याठिकाणी आपण पाप केले आहे आपण ताबडतोब कबूल केले पाहिजे आणि पश्चात्ताप आणि शोक केला पाहिजे.

जेव्हा आपल्याला मोहाचा दबाव जास्त वाटतो आणि आपण त्यास बळी पडू अशी भीती वाटू लागते, तेव्हा आपण ताबडतोब मदतीसाठी याचना केली पाहिजे, जसे पेत्र समुद्रात बुडू लागला होता तेव्हा त्याने मदतीसाठी धावा केला होता (मत्तय १४:३०). मदतीसाठी कृपेच्या सिंहासनाकडे धावत जाणे हेच आहे. तुमचे पापापासून पळून जाणे आणि पापाविरुद्ध झगडणे या दोन्ही गोष्टी देवाला पुरावा देतात की तुम्ही तुमच्या जीवनात पापावर मात करण्याचा दृढनिश्चय केला आहे. आणि देव तुम्हाला सामर्थ्याने मदत करील.