लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

पवित्र आत्मा हा नव्या कराराच्या मुख्य विषयांपैकी एक आहे आणि पवित्र आत्मा हाच यशया अध्याय ४० ते ६६ मधील मुख्य विषयांपैकी एक आहे.

"पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे ...." (यशया ४२:१). देवाचा खरा सेवक तोच आहे ज्याला देवाने आधार दिला आहे, पैशाने किंवा एखाद्या संस्थेने किंवा कोणत्याही मानवी हस्तकाने नव्हे. फक्त प्रभूकडूनच आपल्याला प्रत्येक वेळी आधार मिळाला पाहिजे. मनुष्य आपल्याला भेटवस्तू देऊ शकतात. परंतु आपण कधीही मनुष्यावर किंवा पैशांवर अवलंबून राहता कामा नये. "आधार " हा शब्द आपण ज्यावर अवलंबून आहोत त्या गोष्टीला सूचित करतो. आपण केवळ परमेश्वरावर अवलंबून असले पाहिजे. जेव्हा आपण असहाय होतो तेव्हा देव त्याचा आत्मा आपल्यावर आणतो.

यशया ४२:२, ३ मध्ये असे लिहिले आहे: "तो ओरडणार नाही व आपली वाणी उंचावणार नाही, आणि ती रस्त्यात ऐकू येऊ देणार नाही." हे मत्तय १२:१८-२० मध्ये येशूच्या संदर्भात उद्धृत करण्यात आले आहे ज्यात पुढे असे म्हटले आहे, "... रस्त्यांवर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही ...."

याचा अर्थ असा की ज्याने आपल्या जीवनात गोंधळ घातला आहे त्याला प्रभू कधीही निराश करणार नाही परंतु त्याला उत्तेजन देईल आणि त्याला बरे करेल. प्रभू मिणमिणत्या मेणबत्तीची वात विझवणार नाही. तर , तो तिचे एका ज्वालेत रूपांतर करील. अपयशी ठरलेल्या दुर्बल विश्वासणाऱ्या बांधवांना मदत करण्यात देवाला रस आहे. जे निरूत्साहित आणि निराश आहेत त्यांना मदत करण्यात आणि त्यांचा उत्साह उंचावण्यात त्याला रस आहे.

प्रभूच्या एका खऱ्या सेवकाची सेवा नेहमी अशीच प्रोत्साहन देणारी; निरूत्साहित व निराश झालेल्या व ज्यांना आशाहीन वाटते व जे जीवनाला कंटाळले आहेत अशांचा उत्साह उंचावणारी असते. आपण सर्वजण अशा प्रकारच्या सेवाकार्याचा शोध घेण्यासाठी झटूया, कारण सर्वत्र लोकांना त्याची गरज आहे.

यशया ४२:६-८: परमेश्वर आपल्याला सांगतो: "मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे…. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन." ही एक महान सेवा आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: "परमेश्वर म्हणतो, मी आपले गौरव दुसर्‍यास देणार नाही (यशया ४२:८).

आपल्या सेवाकार्यात आपण कधीही स्वतःकडे गौरव घेऊ नये. श्रेय किंवा गौरव स्वत:कडे घेणे हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे पैसे चोरण्यापेक्षा वाईट आहे. देव कदाचित तुम्हाला व तुमच्या सेवाकार्याला आशीर्वाद देईल आणि तुमचा मोठ्या प्रमाणात उपयोग करेल. परंतु तो आपले गौरव कधीही कोणालाही देणार नाही. एकदा का तुम्ही देवाच्या गौरवाला स्पर्श करायला सुरुवात केलीत, की तुम्ही स्वतःचा नाश कराल, जसे की परमेश्वराच्या अनेक सेवकांचा नाश झाला आहे. ज्यावेळी तुम्ही लोकांपुढे स्वत:चा प्रचार करू लागतात, लोकांना परमेश्वराकडे नेण्याऐवजी स्वत:कडे आकर्षित करू लागतात आणि देवाने जे काही केले त्याचे श्रेय तुम्ही घेऊ लागतात, तर तुम्ही अतिशय धोकादायक जागेवर आहात . अशाप्रकारे हजारो लोकांनी देवाचा आपल्या जीवनावरील अभिषेक गमावला आहे.

यशया ४२:१९: "माझ्या सेवकाखेरीज कोण आंधळा आहे? मी पाठवतो त्या माझ्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्याशी शांतीने असणाऱ्यासारखा कोण आंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण आंधळा आहे?" हे एक गोंधळात टाकणारे वचन असल्यासारखे दिसते, कारण खासकरून, हे वचन स्पष्टपणे येशूच्या संदर्भात आहे (जसे की आपण पहिल्या वचनात पाहतो).

याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो, की देवाचा एक खरा सेवक त्याला दिसणाऱ्या अनेक गोष्टींसाठी आंधळा व त्याला ऐकू येणाऱ्या अनेक गोष्टींसाठी बहिरा असेल. त्याला पुष्कळ गोष्टी दिसतात, पण तो त्या ध्यानात ठेवत नाही (यशया ४२:२०). तो इतरांमध्ये पाप शोधत फिरत नाही. लोकांना शब्दांत पकडण्यासाठी तो लोकांचे ऐकत फिरत नाही. परूशी असे होते - येशूवर दोष लावण्यासाठी तो जे काही बोलेल त्यात त्याला शब्दांत पकडण्याची ते नेहमी वाट पाहत असत. पुष्कळ ख्रिस्ती दुर्दैवाने असेच असतात- नेहमी एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीत त्याला दोष देण्यासाठी टपून बसलेले असतात- कारण पुष्कळदा त्यांना त्याच्या सेवाकार्याचा हेवा वाटतो. त्यांच्यासारखे होऊ नका .

आपण आपल्या सभोवताली ऐकत आणि पहात असलेल्या बऱ्याच गोष्टींसाठी बहिरे आणि आंधळे व्हा. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप केला हे तुम्ही ऐकलेत का? तुम्ही बहिरे असता तर तुम्ही ते ऐकले नसते. तेव्हा 'बहिरे' व्हा ! परमेश्वराच्या सेवकाने आकर्षक स्त्रियांप्रति "आंधळे" असणे चांगले नाही का ? तुम्हांला डोळे आहेत, पण तुम्ही पाहत नाही. तुम्ही 'आंधळे' आहात ! कान आहेत, पण तुम्ही ऐकत नाही! कारण आपले डोळे काय पाहतात किंवा आपले कान काय ऐकतात यावरून तुम्ही कोणाचा न्याय करत नाही. येशू असेच जगला, आणि आपणही असेच जगले पाहिजे (यशया ११:३).