गणना २२ ते २४ मध्ये आपण बलामा ची कहाणी वाचतो. येथे एक महत्त्वाचा परिच्छेद आहे ज्यामध्ये बर्याच गोष्टींचा विचार केलेला आहे. जेव्हा बालाक राजाने बलाम संदेष्ट्याला इस्राएलला शाप देण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा बलामाने देवाची इच्छा जाणून घेतली. आणि देवाने बलामला स्पष्टपणे सांगितले की जाऊ नकोस. परंतु नंतर राजा बालाक म्हणाला की, तो आला तर आपण त्याला अधिक सन्मान आणि अधिक पैसे देऊ. मग बलाम म्हणाला, की तो पुन्हा देवाची इच्छा जाणून घेईल. सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत जाणणाऱ्या देवाने त्याला जाऊ नये म्हणून आधीच सांगितले होते तेव्हा पुन्हा एकदा देवाची इच्छा जाणून घेण्याची काय गरज होती? परंतु तो पैसा आणि सन्मान मिळविण्यासाठी आतुर होता. पवित्र शास्त्र म्हणते की बलामला “अनीतीचे वेतन प्रिय वाटले” (२ पेत्र २:१५).
आपणदेखील स्वतःला अशा परिस्थितीत पाहाल, जिथे आपण देवाचा शोध घ्याल आणि आपल्या आत्म्याद्वारे अगदी स्पष्टपणे जाणवेल की आपण एखाद्या ठिकाणी जावे अशी देवाची इच्छा नाही. मग तुम्हाला तिथला पगार खूप आकर्षक वाटतो आणि तुम्हाला “पुन्हा ईश्वराची इच्छा जाणून घेण्याचा" मोह होतो!! भविष्यकाळात जेव्हा तुम्हाला अशा मोहांचा सामना करावा लागेल तेव्हा बलामाला स्मरणात ठेवा. पगार अधिक आकर्षक असला किंवा सन्मान जास्त असला म्हणून देव त्याचे मन बदलत नाही. परंतु जेव्हा देव पाहतो की एखाद्या माणसाला एखाद्या मार्गाने जायचे आहे, तेथे देव त्याला थांबवणार नाही. तो त्याला जाऊ देईल. म्हणूनच जेव्हा बलामाने दुसऱ्यांदा विचारले तेव्हा देवाने बलामाला जाण्यास सांगितले. ही देवाची परिपूर्ण इच्छा नव्हती. तो बलामाच्या स्वतंत्र इच्छेला डावलुन त्याला यंत्रमानव बनवणार नाही. त्याने पाहिले की बलामाला खरोखर जायचे होते. म्हणून देव म्हणाला “जा”. हे असे काहीतरी होते जे उधळ्या पुत्राच्या वडिलांनी आपल्या मुलाला दूर देशात जाऊ दिले. देवाने आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे आणि तो आमचे निवडीचे स्वातंत्र्य कधीही डावलणार नाही.
परंतु बलामाला थांबवण्यासाठी देवाने त्याचा देवदूत पाठवला. बलाम स्वत: देवदूताला पाहू शकला नाही, परंतु त्या गाढवाला ते शक्य झाले. यावरून आपण कोणता धडा शिकतो? फक्त हा: जेव्हा पैशाच्या प्रेमामुळे माणूस आंधळा झाला असेल, तर गाढवसुद्धा त्याच्यापेक्षा आध्यात्मिक वास्तविकता अधिक स्पष्टपणे पाहण्यास सक्षम असेल! ते गाढव देवदूताला स्पष्टपणे पाहू शकले कारण त्याचे पैशावर प्रेम नव्हते! बलामाने देवदूताला पाहिले नाही कारण त्याचे पैशावर प्रेम होते. बलामाने देवाचा आत्मा त्याच्यावर उतरण्याचा अनुभव घेतला; आणि त्याने ख्रिस्ताच्या येण्याविषयी भविष्यवाणी केली (गणना २४: २, १७) पण पैशावरील प्रेमामुळेच त्याने सर्व काही गमावले.
ती गाढवी आपल्या धन्याशी बोलू लागली. पवित्र शास्त्रामध्ये “अन्य भाषा बोलण्याची” ही पहिली घटना आहे - एक गाढवी अज्ञात भाषेत अस्खलितपणे बोलत आहे - ही भाषा जी ती कधीही शिकली नव्हती! ते अलौकिक होते. ते निःसंशयपणे देवाकडून आले होते. परंतु पवित्र शास्त्रातील अन्य भाषेत बोलण्याच्या या पहिल्या उदाहरणातून आपण शिकूया की अन्य भाषा बोलण्याने कोणीही आध्यात्मिक बनत नाही - ते गाढव अन्य भाषेत बोलले तरीसुद्धा ते मूर्ख गाढवच राहिले - आणि जरी अन्य भाषेत बोलण्याद्वारे त्याने देवाच्या अलौकिक सामर्थ्याचा अनुभव घेतला तरीही! ते नेहमी लक्षात ठेवा.