लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देव आपल्या वेगवेगळ्या स्वभावांचा व दानांचा उपयोग ख्रिस्ताचे संतुलित चित्र जगाला सादर करण्यासाठी करतो. आपल्यापैकी प्रत्येकजण फारतर ख्रिस्ताची केवळ वेडीवाकडी व असंतुलित प्रतिमा सादर करू शकतो. कोणत्याही एका व्यक्तीचे सेवाकार्य असंतुलित ख्रिस्ती लोक निर्माण करू शकतात. ख्रिस्ताच्या शरीरात वेगवेगळ्या मतांवर जोर देणारे आणि वेगवेगळे स्वभाव असलेले इतर लोक आहेत याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे. उदाहरणार्थ, जर दोन बांधव एकाच विश्वासणाऱ्या बांधवांच्या गटाची वचनाची सेवा करत असतील आणि एकाचे ठाम मत असे आहे की, "तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात याची खात्री धरू नका, कारण तुम्ही स्वत:ची फसवणूक करत असाल"आणि दुस-या बांधवाचे असे ठाम मत आहे की, "तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात याची खात्री धरा", वरवर पाहाता हे परस्परविरोधी वाटले तरी या दोन्ही मतांची गरज आहे- त्यामुळे त्यांची सेवा परस्परपूरक असू शकते.

ख्रिस्ताच्या शरीरात आपल्यात कॅल्विनवादी आणि आर्मेनियसवादी असणारे एकत्र काम करू शकतात , प्रत्येकजण आपापली विशिष्ट मते मांडू शकतो - कारण दोन्ही दृष्टिकोन पवित्र शास्त्रामध्ये आहेत. चार्ल्स शिमोन एकदा म्हणाले होते, "सत्य मध्यभागी नाही, एका टोकाला नव्हे तर दोन्ही टोकांना आहे." त्यामुळे आपल्याला दोन्ही टोके सादर करणाऱ्या लोकांची गरज आहे.

मग पुन्हा एकदा 'लोकांमध्ये सहज मिसळणाऱ्या ' व्यक्तिमत्त्वांसाठी आणि लाजाळू व्यक्तिमत्त्वांसाठी जागा आहे. वेगवेगळे स्वभाव परस्परपूरक असू शकतात. काही लोक अतिसावध असू शकतात; हेतूशिवाय कधीही एक पाऊल पुढे न टाकणारे , सर्व 'साधकबाधक ' गोष्टी तोलून पाहणारे आणि हालचाल करायची की नाही याचाच बराच वेळ विचार करणारे असू शकतात. इतर जण अधिक बेफिकीर असतात आणि परिणामांचा सखोल विचार न करता उत्साहाने पुढे जातात. हे (आणि इतर) प्रकारचे व्यक्तिमत्त्व ख्रिस्ताच्या शरीरात आढळत असल्यामुळे समतोल साधला जातो. जर मंडळीत केवळ सखोल विचार करणारी पण मनाची द्विधा असणारी व्यक्तिमत्त्वे असतील तर प्रगती खूपच संथ असू शकते. याउलट, मंडळीत केवळ उतावीळ, उत्साही लोक असतील तर बरेच प्रकल्प अपूर्ण राहू शकतात.

प्रत्येक स्वभावाची बलस्थाने आणि उणिवा असतात. ख्रिस्ती या नात्याने एकत्र काम करणारे विविध स्वभाव असलेले विविध लोक ख्रिस्ताचे अधिक परिपूर्ण आणि अचूक चित्र जगासमोर मांडू शकतात. त्यामुळे शरीरातील प्रत्येकाला आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करण्यात आपण आपला वेळ वाया घालवू नये. आपण प्रत्येकाला आहे तसे राहू दिले पाहिजे. आपण, आपली बलस्थाने दुसऱ्यांच्या उणिवांना कशा प्रकारे आधार देऊ शकतात यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याउलट त्यांची बलस्थानेही आपल्या उणिवांना आधार देऊ शकतात.

एकत्र काम करण्याद्वारे पेत्र आणि योहान (वेगवेगळ्या स्वभावाचे पुरूष) यांनी स्वतंत्रपणे केले असते त्यापेक्षा देवाचे अधिक गौरव केले. पौल आणि तीमथ्य - त्यांच्या स्वभावात लक्षणीयरित्या वेगळे होते- तरीही शुभवर्तमानात एकत्र येऊन एक शक्तिशाली संघ स्थापन करू शकले.

मंडळीमध्ये हुशार बुद्धिजीवी तसेच सामान्य बुद्धी असलेले लोक असतात. साहजिकच, त्यांचे देवाच्या सत्याचे सादरीकरण वेगवेगळे असेल. पण कोणतीही श्रेणी दुस-याचा तिरस्कार करू शकत नाही किंवा टीका करू शकत नाही, कारण ख्रिस्ताच्या शरीरात बुद्धिजीवी आणि सामान्य बुद्धी असणारे,दोघांचीही; तत्त्ववेत्ते, गृहिणी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना हे शुभवर्तमान सादर करण्यासाठी तितकीच गरज आहे. देवाला पौलासारख्या अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्वानाची तसेच पेत्रासारख्या अशिक्षित मासे धरणाऱ्याचीही गरज होती. एकाच सुवार्तेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या शैली वेगवेगळ्या होत्या, पण प्रत्येकाची विशिष्ट भूमिका होती आणि देवाने दुसऱ्याच्या माध्यमातून केलेले कार्य ते एकटे सक्षमपणे करू शकले नसते.

परिवर्तनामुळे माणसाची बौद्धिक क्षमता बदलत नाही. यामुळे त्याला आपली सामाजिक प्रतिष्ठा बदलण्याची सक्तीही होत नाही. जरी ख्रिस्तात सामाजिक भेद उरत नाहीत तरी शुभवर्तमान या पृथ्वीवरील समाजाचे विषम स्वरूप नष्ट करत नाही. फिलेमोनासारख्या श्रीमंत माणसाची तसेच फिलेमोनाच्या घरात सेवक असलेल्या अनेसिमचीही देवाला गरज होती. त्यांच्या सामाजिक पातळीवर आणि जीवनमानात कोणताही बदल झाला नाही, पण ख्रिस्ताच्या शरीरात प्रत्येकाचे वेगळे योगदान होते, जे दुसरा कधीच करू शकला नसता; आणि म्हणून ते शुभवर्तमानात एकत्र काम करू शकत होते.

ख्रिस्ताच्या शरीरात सर्व प्रकारे समान असलेले लोक भरलेले असावे असा देवाचा कधीही हेतू नव्हता- जसे की कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मोटार गाड्या. नाहीच. मंडळीची सेवा तिच्या विविध प्रकारच्या सदस्यांवर अवलंबून असते. सर्व समान असते तर सेवा ठप्प झाली असती आणि मंडळीचा आध्यात्मिक मृत्यू झाला असता.

एकमेकांशी असलेले आपले मतभेदही आपली सहभागिता वाढवण्यासाठी आणि आपल्याला आध्यात्मिक परिपक्वतेकडे नेण्यासाठी देवाच्या उपयोगाचे आहेत. नीतिसूत्रे २७:१७ (लिविंग बायबल)म्हणते, "लोखंड लोखंडावर आदळताना उडणाऱ्या ठिणग्यांइतकीच मैत्रीपूर्ण चर्चा स्फूर्ती देणारी आहे". ठिणग्या उडतील पण याप्रकारे लोखंडाचे दोन्ही तुकडे तीक्ष्ण होतात . कधीकधी देव त्याच्या कार्यात वेगवेगळ्या स्वभावाच्या दोन लोकांना एकत्र ठेवतो आणि एकत्र काम करताना ठिणग्या उडू शकतात, पण त्यांना 'तीक्ष्ण' करण्याचा हा देवाचा मार्ग असू शकतो. जर एक माणूस लोखंडासारखा असेल आणि दुसरा मातीसारखा असेल तर ठिणग्या उडणार नाहीत आणि धारही लावली जाणार नाही. त्याऐवजी मातीवर लोखंडाचा ठसा उमटवला जाईल - दुर्बल इच्छा असलेल्या व्यक्तीवर एका मजबूत इच्छा असलेल्या व्यक्तीचे मत लादले जाईल . पण देवाचा हेतू असा नाही की एका व्यक्तीने दुसऱ्यावर आपली मते लादावीत, तर दोघांनीही एकमेकांकडून शिकले पाहिजे. आपण असहमत होऊ शकतो, पण तरीही आपण एकत्र राहू शकतो आणि अजूनही एकमेकांवर प्रेम करू शकतो- किंबहुना, आता आपण एकमेकांवर पूर्वीपेक्षा जास्त खोलवर प्रेम करू शकतो.