WFTW Body: 

जसे अनेक लोक राग, पैशाचा लोभ, माणसांकडून मान मिळवण्याची इच्छा, शत्रूचा द्वेष करणे किंवा एखाद्याच्या भावना दुखावू नयेत म्हणून बोललेले खोटे या गोष्टींना पाप मानत नाहीत अगदी तसेच अनेक लोक चिंता करण्याला पाप मानत नाहीत.

अनेकजण अशा गोष्टींना केवळ 'कमजोरी' म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्याला केवळ "कमजोरी" म्हणत राहाल, तोपर्यंत तुम्ही त्यापासून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. येशू आपल्याला कमकुवतपणापासून वाचवण्यासाठी आला नव्हता; तो आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी आला होता. जर आपण एखाद्या गोष्टीची 'पाप' म्हणून कबुली दिली, तर येशू आपल्याला त्यापासून मुक्त करेल. परंतु, जर तुम्ही त्या पापाला एखादे अधिक 'सभ्य' नाव देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्यापासून कधीच मुक्त होऊ शकणार नाही. ह्या गोष्टिना तुम्हाला सुचेल असे सर्वात घाणेरडे नाव द्या - वासनेला "व्यभिचार" म्हणा, रागाला "खून" म्हणा, पैशाच्या लोभाला "देवाचा द्वेष" म्हणा; असे केल्यास तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल, कारण ते किती भयंकर पाप आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

जर तुम्ही एड्स किवा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांना केवळ खोकला किंवा सर्दीइतकेच किरकोळ मानले, तर तुम्ही त्याकडे गांभीर्याने पाहणार नाही. जरी येशूने या पापांच्या विरोधात अत्यंत कडक शब्दांत ताकीद दिलेली असली तरी अनेक लोक हि पापे अत्यंत सहजपणे घेतात . मी त्यांना दोष देत नाही; कारण मी असे म्हणेल की, त्यांच्या प्रमुखांनी आणि शिक्षकांनी त्यांना या गोष्टींचे योग्य शिक्षणच दिलेले नाही. देवाचे संपूर्ण सत्य निर्भीडपणे सांगणारे आणि माणसांकडून मान मिळवण्याची इच्छा न बाळगणारे ख्रिस्ती उपदेशक व शिक्षक आज खूप कमी आहेत. असे उपदेशक फारच थोडे आहेत, ज्यांना कोणाच्याही पैशाची हाव नसते, उलट देवाच्या लोकांना आत्मिक मदत मिळावी या उद्देशाने ते केवळ सत्य बोलू इच्छितात. हे अगदी एका अशा डॉक्टरसारखे आहे, ज्याला तुमच्या पैशात नव्हे, तर तुम्हाला निरोगी करण्यात अधिक रस असतो. असे उपदेशक आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.

लोक चिंतेलाही एक 'कमजोरी' असे संबोधतात. परंतु, ती केवळ एक 'कमजोरी' नाही.

मत्तय ६:२५ - ३४ या वचनांमध्ये, विश्वाचा प्रभू असलेल्या येशू ख्रिस्ताने तीन वेळा असे म्हटले आहे: "चिंता करू नका." केवळ दहा वचनांच्या या छोट्याशा भागात, प्रभूने तीन वेळा "चिंता करू नका" असे म्हंटले आहे. हा तोच प्रभू आहे, ज्याने आपल्याला खून न करण्याचा, व्यभिचार न करण्याचा आणि चोरी न करण्याचा आदेश दिला आहे. या सर्व गोष्टी एकत्र करून पहा: "खून करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका आणि चिंता करू नका." यापैकी कोणती गोष्ट 'पाप' नाही? तुम्ही असे म्हणू शकता का की, "अरे, मी आठवड्यातून फक्त एक-दोनदाच काळजी करतो?" हे असे म्हणण्यासारखेच आहे की, "मी आठवड्यातून फक्त एक-दोनदाच लोकांची हत्या करतो," किंवा "मी आठवड्यातून एक-दोनदाच व्यभिचार करतो; फार काही वारंवार करत नाही."

असे का की आपण काही पापांना गांभीर्याने घेतो, पण काहींना नाही ? कारण तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला तसे शिकवलेच नाही. भीती ही काही "कमजोरी" नाही, तर ते एक पाप आहे - ज्याप्रमाणे हत्या करणे हे एक पाप आहे. पाप कशाला म्हणतात, हे आपल्याला कसे समजते? जर देवाने सांगितले आहे की तुम्ही अमुक गोष्ट करू नका , तर ती गोष्ट पाप आहे. जर परमेश्वराने सांगितले आहे की तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे - मग तुमची पत्नी दुष्ट स्वभावाची असली तरीही - तरीही तुम्हाला तिच्यावर प्रेम करावेच लागेल; कारण देवाने तसे सांगितले आहे. आणि जर देवाने एखादी गोष्ट करू नका असे सांगितले असेल - मग ती गोष्ट तुम्हाला पाप वाटत नसली तरीही - ती करू नका; कारण ती गोष्ट पापच आहे. व्यभिचार करणे वाईट आहे असे 'मला' वाटते म्हणून नव्हे, तर परमेश्वराने सांगितले आहे की, "ते करू नका" म्हणून ते वाईट आहे . त्याने सांगितले आहे की, "काळजी करू नका आणि घाबरू नका." देवाने ज्या गोष्टींविषयी "करू नका" असे सांगितले आहे, त्या गोष्टींकडे मला 'पाप' म्हणूनच पाहायचे आहे.

चिंता देवाबरोबर असलेली माझी सहभागीता नष्ट करते. चिंता करणे म्हणजे असे म्हणण्यासारखे आहे की, देवाला माझी काहीच पर्वा नाही. हा देवाचा अपमान आहे. एखादे चार वर्षांचे मुल जे कचराकुंडीतून उचलून खात आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? आपल्या देशात अशा मुलांची संख्या खूप मोठी आहे. दुर्दैवाने, त्यांना पालक नाहीत जे त्यांची काळजी घेतील . आपला स्वर्गीय पिताही तसाच आहे का? आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेत नाही का? आपल्या स्वर्गीय पित्याला, त्या कचराकुंडीतून खाणाऱ्या मुलांच्या पित्यांच्याच श्रेणीत बसवणे, हा त्याचा अपमान करण्यासारखे आहे. त्या मुलांना हेच ठाऊक नसते की त्यांचे पुढचे जेवण त्यांना कुठून मिळणार आहे - त्यांना काळजी करण्याचा पूर्ण अधिकार आहे; कारण त्यांचा जगिक पिता त्यांची काळजी घेत नाही. परंतु, जर तुम्हाला एक स्वर्गीय पिता लाभलेला आहे आणि तरीही तुम्ही काळजी करत असाल, तर तुम्ही अप्रत्यक्षपणे असेच म्हणत असता की, तुमचा स्वर्गीय पिताही त्याच श्रेणीतील आहे.

"म्हणूनच मी तुम्हाला सांगतो: तुमच्या जीवनाविषयी काळजी करू नका" (वचन २५). तुमच्या जीवनाविषयी—तुम्ही काय खाल, काय प्याल किंवा तुमच्या शरीराविषयी—चिंता करू नका. तुमचे जीवन हे केवळ अन्न, शरीर आणि वस्त्र यांपेक्षा अधिक मोलाचे नाही का? लूक, येथे आकाशातील पक्ष्यांचे उदाहरण देतो - ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत आणि कोठारांमध्ये साठवणूकही करत नाहीत; तरीही तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाऊ घालतो. रस्त्यावर एखादा मृत पक्षी पडलेला तुम्ही किती वेळा पाहिला आहे? रस्त्यावर मृत पक्षी दिसणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. मला वाटते, माझ्या संपूर्ण आयुष्यात रस्त्यावर मृत पक्षी पाहिल्याची उदाहरणे मी माझ्या बोटांवर मोजू शकेन इतकीच आहेत. पक्षी अन्नावाचून उपाशी मरताना तुम्ही कुठे पाहिले आहेत का ? ही खरोखरच एक दुर्मिळ बाब आहे. पृथ्वीवर अशा पक्ष्यांची संख्या लक्षावधी आहे; ते पेरणी किंवा कापणी करत नसले, आणि अन्नाच्या शोधात त्यांना इकडे-तिकडे भटकावे लागत असले, तरीही त्यांना अन्न मिळतेच. त्यांना कोण खाऊ घालतो ? येशू म्हणाला: तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खाऊ घालतो. तो त्यांचा स्वर्गीय पिता नाही; तर तो तुमचा स्वर्गीय पिता आहे. तो त्यांचा सृष्टिकर्ता आहे आणि तो त्यांना खाऊ घालतो; परंतु तुमच्या बाबतीत, तो केवळ तुमचा सृष्टिकर्ताच नाही, तर तो तुमचा 'पिता' देखील आहे. तुम्ही या पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक मोलाचे नाही का?

मी एकदा एक छोटीशी कविता वाचली होती, जी अत्यंत रंजक आहे. ती कविता एकमेकांशी संवाद साधणाऱ्या दोन छोट्या पक्ष्यांबद्दल आहे. रॉबिन पक्षी चिमणीला म्हणाला, "मला हे जाणून घ्यायला खरोखरच आवडेल की, हे चिंतेने ग्रासलेले लोक इतकी धावपळ का करतात आणि इतकी काळजी का करतात "? त्यावर चिमणी रॉबिनला म्हणाली, "मित्रा, मला असे वाटते की याचे कारण कदाचित हे असावे की, जसे आपली प्रेमपूर्वक काळजी घेणारा 'स्वर्गीय पिता' आपल्याकडे आहे तसा स्वर्गीय पिता त्यांच्याकडे नाही."

आपण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, ही केवळ एक सुंदर कथा नाही. आपल्या प्रत्येक चिंतेची देवाला पर्वा नाही, असा विचार करणे हा देवाचा अपमान करण्यासारखेच आहे.

यावर उपाय काय आहे? पवित्र शास्त्रामध्ये 'फिलिप्पैकरांस पत्र ४:६' या वचनात असे म्हटले आहे की, "कशाविषयीही चिंता करू नका." हे एक अत्यंत ठाम विधान आहे: "कशाविषयीही चिंता करू नका." परंतु, चिंतेच्या मूळ कारणाबाबत मात्र आपण काहीतरी करणे आवश्यक आहे. कदाचित सध्या तुम्ही एखाद्या समस्येचा सामना करत असाल आणि ती समस्या कशी सुटेल, हे तुम्हाला समजत नसेल. अशा वेळी तुम्ही काय करावे? देव असे म्हणत नाही की तुम्ही काहीच करू नका; उलट, तो असे सांगतो की त्या समस्येविषयी प्रार्थना करा. 'विनंती' करणे म्हणजे देवासमोर एखादी विशिष्ट मागणी करणे आणि देवाला आपली समस्या नेमकी काय आहे, हे स्पष्टपणे सांगणे होय. विनंती केल्यानंतर, आपली प्रार्थना ' धन्यवाद ‘ देऊन पूर्ण करायला विसरू नका. धन्यवाद देणे म्हणजे असे म्हणणे: "हे पित्या, माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल तुझे आभार; आणि माझी प्रेमपूर्वक काळजी घेतल्याबद्दलही तुझे आभार." देवाला धन्यवाद देणे हे एखाद्या 'पावती'सारखे असते - ही एक अशी पावती आहे जी या गोष्टीची खात्री देते की, माझे पत्र देवाला पोहोचले आहे आणि त्याने ते स्वीकारले आहे. जेव्हा मी "माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला धन्यवाद " असे म्हणतो, तेव्हा मी नेमके हेच सांगत असतो.

जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी करता, तेव्हा 'फिलिप्पैकरांस पत्र ४:७' हे वचन सांगते, “ मग सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखेल ." (येथे 'राखेल' हा शब्द लष्करी संदर्भातील आहे - जसे एखादा अभेद्य किल्ला रक्षण करतो, अगदी त्याप्रमाणे.)

चिंता न करणे ही एक आज्ञा आहे, जिचे आपण पालन करणे अनिवार्य आहे. जेव्हा मी चिंतेपासून मुक्त होईन, तेव्हा मी अनेक प्रकारच्या नैराश्यापासूनही मुक्त होईन. हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे आपण प्रत्येकाने उचलणे गरजेचे आहे.