लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देवाने तुमच्यासाठी जे सर्व काही केले आहे ते लक्षात घेता त्याला तुमचा पुरेसा प्रतिसाद काय आहे? तुम्ही फक्त त्याच्याबद्दल कृतज्ञतेचे शब्द बोलता हे पुरेसे नाही. रोमकरांस पत्र १२ (संपूर्ण अध्याय) हे या प्रश्नाचे उत्तर आहे. "देवाच्या करुणा" लक्षात घेता, तुम्ही काय केले पाहिजे ते हे आहे :

१. सर्वप्रथम आपले शरीर जिवंत यज्ञ म्हणून देवाला सादर करा (रोम १२:१). 'यज्ञ' या शब्दावरून असे सूचित होते की तुमचे शरीर प्रभूला देण्यासाठी तुम्हांला काहीतरी किंमत मोजावी लागणार आहे. काहीतरी त्याग करावा लागेल - आणि ते म्हणजे तुमची तीव्र इच्छाशक्ती जी स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी तुमचे डोळे, हात, जीभ, इंद्रिये आणि वासना इत्यादींचा वापर करू इच्छिते.

२. तुमचे मन नूतनीकरण करण्यासाठी सादर करा (रोम १२:२) - म्हणजे लोकांकडे आणि परिस्थितीकडे देवाच्या दृष्टीकोनातून पाहणे. मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीच्या अशुद्धतेपासून, आपल्याला इजा पोहचविलेल्या लोकांकडे तुम्ही पाहत असलेल्या पद्धतीत असलेल्या कडूपणापासून, तुम्हांला आवडणा-या आणि आवडत नसलेल्या लोकांकडे तुम्ही ज्या पद्धतीने पाहता त्या पक्षपातीपणापासून आणि परिस्थिती व भविष्याकडे पाहताना वाटणाऱ्या अविश्वास, चिंता आणि भीतीपासून स्वत:ला शुद्ध करावे लागेल. नेहमी स्वतःला विचारा, "देव या व्यक्तीकडे किंवा या परिस्थितीकडे कसे पाहतो?" आणि त्यांच्याकडे पाहण्याच्या इतर सर्व पद्धतींपासून स्वतःला शुद्ध करा.

३. स्वत:ला अधिक मानू नका (रोम १२:३). तुमच्या विश्वासाचे मोजमाप - आणि तुमच्या ज्ञानाचे किंवा तुमच्या आवेशाचे नव्हे - हेच तुमच्या अध्यात्माचे वास्तविक मोजमाप आहे.

४. देवाने तुम्हांला दिलेले प्रत्येक कृपादान व प्रतिभा वापरून तुमची, ख्रिस्ताचे शरीर उभारण्याची सेवा पूर्ण करा (रोम १२:४-८). ज्याच्याकडे एक मोहोर होती त्या माणसाप्रमाणे ते जमिनीत (जगात) गाडू नका. प्रभूची सेवा करण्यात आवेशी राहा (रोम १२:११) आणि प्रार्थना करा (=देवाचे ऐका आणि त्याच्याशी बोला), वारंवार (रोम १२:१२).

५. वाईट गोष्टींचा वीट माना आणि चांगुलपणाला चिकटून राहा (रोम १२:९). वरीलपैकी दुसरी गोष्ट अगोदर केल्याने तुम्हांला पहिली गोष्ट अधिक सहजपणे करण्यास मदत मिळेल.

६. सर्व बंधूंवर प्रीती करा आणि त्यांचा सन्मान करा - कारण ते येशूचे धाकटे भाऊ आहेत (रोम १२:९,१०). त्यांच्याशी चांगले वागा (रोम १२:१३). त्या कोणाबरोबरही चांगले झाले असता त्यांच्यासोबत आनंद करा आणि दुःखी असलेल्यांसोबत शोक करा (रोम १२:१५). सर्वांप्रती नम्र दृष्टिकोन बाळगा - खासकरून ख्रिस्ताच्या शरीरातील गरीब आणि कमी प्रतिभावान लोकांप्रती (रोम १२:१६).

७. सर्व मनुष्यांवर प्रीती करा व त्यांना आशिर्वाद द्या , विशेषतः ज्यांनी तुमचे वाईट केले आहे (रोम १२:१४,१७-२१). शक्य असेल तितके सर्वांबरोबर शांतीने राहा. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांचा कधीही सूड घेऊ नका किंवा त्यांचे काहीही वाईट चिंतू नका. त्यांचे भले करा आणि अशा प्रकारे वाईटावर बऱ्याने मात करा. संपूर्ण जग अशा लोकांनी भरलेले आहे जे दुष्टाईवर अधिक दुष्टाईने मात करण्याचा प्रयत्न करतात. पण दुष्टाई कधीही दुष्टाईवर विजय मिळवू शकत नाही. फक्त चांगुलपणाच दुष्टाईवर विजय मिळवू शकतो , कारण चांगुलपणा दुष्टाईपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असतो. येशूने कालवरीवर हेच दाखवून दिले. आलेल्या संकटांमध्ये टिकून राहा आणि या सर्वांचा आनंद घ्या आणि आशा ठेवा की ती सर्व देवाने तुम्हांला अधिक येशूसारखे बनवण्यासाठी रचली आहेत (रोम १२:१२).

अशा प्रकारे आपण देवाला सिद्ध करतो की त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आणि आपल्याला वारंवार क्षमा करण्यात त्याने आपल्याप्रती दाखवलेल्या विपुल करूणेबद्दल आपण त्याचे खरोखर आभारी आहोत.