लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

येशूने एकदा लोकसमुदायला जेवू घालण्यासाठी ५ भाकरी वापरल्या. त्याने सर्वप्रथम भाकरी आशीर्वादित केल्या. तरीही त्या पाच भाकरी पाच भाकरीच राहिल्या व लोकांना खायला मिळाले नाही. त्या भाकरी मोडल्या तेव्हाच लोकांना जेवण दिले गेले. म्हणून, आत्म्याद्वारे आशीर्वाद मिळालेले (अभिषिक्त) असणे पुरेसे नाही. देवाने आपल्याला मोडणेही आवश्यक आहे. मग आम्ही आपला चेहरा धुळीमध्ये झाकू आणि देवाचे सामर्थ्य आपल्याद्वारे अडथळा न होता वाहात राहिल.

निर्गम ४ मध्ये देवाच्या लोकांचे नेते म्हणून एकाच वेळी मोशे व अहरोन यांची नियुक्ती केली गेली. अहरोन अस्खलित वक्ता होता, परंतु मोशे तसा नव्हता (निर्गम ४: १०, १४). तरीही देवाने मोशेचा उपयोग केला आणि अहरोनाचा नाही - कारण मोशे एक मोडलेला मनुष्य होता, परंतु अहरोन तसा नव्हता. देवाने मोशेला अरण्यात ४० वर्षे मोडण्याच्या काळातून नेले. देवाने त्याला राजवाड्यातल्या शासकापासून वाळवंटातील मेंढपाळापर्यंत खाली खेचून नम्र केले. मग त्याने त्याला चाळीस वर्षे सासर्‍याच्या घरी राहायला ठेवले इतकेच नव्हे तर त्याच्यासाठी कामही करायला लावले! त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ते पुरेसे होते. अहरोन अशा रीतीने कधीही मोडला गेला नव्हता. त्यामुळेच त्या दोघांमध्ये फरक निर्माण झाला.

निर्गम ३२ मध्ये या दोन माणसांच्या परिणामकारकतेत फरक दिसून येतो. जोपर्यंत मोडलेला मनुष्य मोशे त्यांच्यामध्ये होता तोपर्यंत इस्राएली लोक परमेश्वराला अनुसरले. परंतु जेव्हा मोशे त्यांच्यापासून केवळ ४० दिवस दूर गेला आणि अहरोन तात्पुरता त्यांचा नेता झाला, तेव्हा ते मूर्तिपूजेकडे वळले आणि लगेचच सोन्याच्या वासराची उपासना करु लागले. अहरोन एक वक्तृत्वपूर्ण वक्ता होता . परंतु तो देवाच्या लोकांना शुद्ध राखू शकला नाही कारण त्याने मनुष्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. न मोडेलेले वडीलजन नेहमीच स्वतःचा सन्मान शोधतात आणि त्यांच्या मंडळीमधील लोकांना खूष करतात. म्हणूनच त्यांचे लोक परमेश्वरापासून दूर जातात.

मोशे हा एक मोडलेला मनुष्य होता, ज्याने वाळवंटात ४० वर्षे, वीस लाख लोकांना देवाच्या मार्गात राखले. मंडळीच्या इतिहासात शतकानुशतके असेच होत आले आहे. देवाने आपल्या मार्गांत आपल्या मंडळीला राखण्यासाठी मोडलेल्या माणसांचा उपयोग केला आहे.

देव आम्हांला आमच्या वडीलजनांच्या अधीन राहण्यास सांगून आम्हाला मोडतो. “देवभीरू माणसाच्या अधीन राहणे आपल्याला अनेक मूर्ख गोष्टी करण्यापासून वाचवेल, इतकेच नव्हे तर त्याच्याकडून आपल्याला बरेच शहाणपण शिकण्यास देखील सक्षम करेल. तो स्वतः ज्या धोक्यांना सामोरे गेला जे कदाचित आपल्याला माहीत नसतील त्याबद्दल चेतावणी देण्यास पात्र असेल. म्हणूनच आध्यात्मिक अधिकाराखाली राहणे आपल्यासाठी तितकेच सुरक्षित आहे जसे की मुलांनी त्यांच्या पालकांच्या अधीन असणे. “ १ पेत्र ५:५ मध्ये आपण वाचतो की तरुणांनी वडिलांच्या अधीन असले पाहिजे, कारण देव गर्विष्ठाचा विरोध करतो पण नम्र जनांवर तो कृपा करतो. येथे आपण देवाकडून आध्यात्मिक अधिकार मिळवण्याचे एक मोठे रहस्य पाहतो. मी बर्‍याच चांगल्या बांधवांना ओळखतो ज्यांना कधीच देवाकडून आध्यात्मिक अधिकार देण्यात आलेला नाही, फक्त एका कारणास्तव: ते आयुष्यात कोणाच्याही अधीन राहण्यास कधीही शिकले नाही. आणि म्हणूनच त्यांची प्रबळ इच्छाशक्ती कधीही मोडली गेली नाही. न मोडलेल्या मनुष्याच्या हातात अधिकार ही एक अतिशय धोकादायक गोष्ट आहे. जर आपण प्रथम मोडलेले नसाल आणि आपण लोकांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण त्यांचा नाश कराल आणि या प्रक्रियेत स्वत:ला देखील नष्ट कराल. देवाने आपल्यापैकी कोणालाही आध्यात्मिक अधिकार देण्यापूर्वी त्याला आपल्या गर्वाची ताकद मोडावी लागते.

मला माझ्या स्वत:च्या अनुभवाबद्दल तुम्हांला थोडक्यात सांगू द्या. माझ्या आयुष्यातील २० ते ३० वयोगटातील दहा वर्षे, एकापेक्षा जास्त मंडळींमध्ये मला माझ्या सेवेबद्दल इर्षा असलेल्या वडिलांकडून खाली ओढणे आणि जाहीरपणे अपमानित करणे असे देवाने होऊ दिले. अशा सर्व घटनांमध्ये, प्रभुने मला तोंड बंद ठेवण्यास सांगितले आणि त्या वडिलधार्‍यांना जाब न विचारता त्यांच्या अधीन राहायला सांगितले. आणि मी तसे केले. मी त्यांच्या मंडळीमध्ये असताना आणि त्यांची मंडळी सोडल्यानंतरही मी त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले. त्या काळात, भविष्यात देवाने माझ्यासाठी कोणती सेवा ठेवली आहे हे मला कधीच ठाऊक नव्हते. परंतु देव मला बरीच वर्षे मोडून आध्यात्मिक अधिकारासाठी तयार करत होता. मला त्याने मोडण्याचे अजून संपवलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये, देव मला नवीन परीक्षांतून घेऊन गेला ज्याचा मी पूर्वी कधीही अनुभव घेतला नव्हता - जसे की धार्मिक लोकांद्वारे मला न्यायालयात नेले गेले आणि १० वर्षे तिथे माझ्यावर खोटे आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतु माझ्या आयुष्यातला त्याचा हेतू तसाच आहे - मला आणखी मोडणे, जेणेकरून तो अधिकतेने त्याचे जीवन आणि त्याचा अधिकार मला देईल.

देव आमच्या पुढार्‍यांद्वारे आम्हाला दुरुस्त करून आमची शक्ती आणि आमचा गर्व मोडून काढतो. जवळजवळ सर्व विश्वासणार्‍यांना सुधारणा स्वीकारणे फार कठीण जाते. दोन वर्षांच्या मुलासाठीसुद्धा सुधारणा स्वीकारणे सोपे नाही - विशेषत: जर ते सर्वांसमोर सांगितले गेले असेल तर. शेवटच्या कोणत्यावेळी तुम्ही आनंदाने लोकांसमोर सुधारणा स्वीकारली? आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी ती स्वीकारली आहे का? नसल्यास हे आश्चर्यकारक नाही की आपल्याकडे आध्यात्मिक अधिकाराचा अभाव आहे. “न मोडलेले लोक एकाकी होत चाललेले असतात. ते कधीही कोणाच्या अधीन होत नाहीत. जिथे त्यांना जायचे आहे तेथे ते जातात आणि त्यांना जे करायचे आहे ते करतात. असे न मोडलेले विश्वासणारे जे केवळ त्यांच्या आज्ञा पाळतात आणि त्यांचे म्हणणे मानतात अशांबरोबरच कार्य करू शकतात. देव अशा "एकाकी" लोकांना आध्यात्मिक अधिकार कधीही देऊ शकत नाही, कारण तो शरीर निर्माण करत आहे आणि व्यक्तिवादी विश्वासणार्‍यांचा समूह नाही!”