WFTW Body: 

"कारण तुम्ही कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तारलेले आहा; आणि हे तुम्हापासून नव्हे, तर हे देवाचे दान आहे" (इफिस २:८).

आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात - कृपेने विश्वासाच्या द्वारे - पापांची क्षमा आणि आत्म्यात बाप्तिस्मा स्वीकारून केली. एके दिवशी जेव्हा आपला प्रभु येशू ख्रिस्त वैभवाने परत येईल, तेव्हा आपण त्याला भेटण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ. हेही कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे होईल. तर, पृथ्वीवर आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आणि शेवट कृपेने व विश्वासाच्या द्वारे होते. आपल्याला हे शिकण्याची गरज आहे की, या दोन्हीच्या मधल्या काळातल्या सर्व गोष्टीही, याच नियमाने स्वीकारायच्या आहेत. कृपेने, विश्वासाच्या द्वारे आपण सर्व प्रकारच्या वाईटावर मात करू शकतो आणि पृथ्वीवर देवाने आपल्याला नेमलेले कार्य पूर्ण करू शकतो. देव सर्व भविष्यकाळ जाणतो. उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या वर्षी आपल्यासोबत असे काहीही घडणार नाही की जे देवाला चकित करेल. त्याला आरंभीच शेवट माहीत आहे. यामुळे आम्हाला मोठे सांत्वन मिळाले पाहिजे. कारण जर देवाला उद्या किंवा पुढच्या आठवड्यात तुमच्यावर येणारी मोठी कसोटी किंवा परीक्षा अगोदरच माहित आहे, तर त्याला सामोरे जाण्यासाठी लागणारी कृपा तो तुम्हाला नक्कीच पुरवील.

परमेश्वराने पौलाला सांगितले, "माझी कृपा तुला पुरे आहे, कारण शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते" (२ करिंथ १२:९). त्याची कृपा प्रत्येक गरजेसाठी पुरेशी आहे. "देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होईल असे करण्यास समर्थ आहे, याकरिता की, तुम्हास सर्व गोष्टीत पुरवठा सर्वदा होत असता, तुम्ही प्रत्येक चांगल्या कामात अधिकाधिक तत्पर असावे" (२ करिंथ ९:८). आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला मदत करण्यासाठी विपुल कृपा उपलब्ध आहे. "तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या"(इब्री ४:१६). तुमची जी काही गरज असेल, ती पूर्ण करण्यासाठी देवाची कृपा उपलब्ध आहे. म्हणूनच ती कृपा स्वीकारण्यासाठी आम्हाला धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ येण्याचे आमंत्रण दिले आहे. भूतकाळात आपण पराभूत झालो, कारण ती कृपा आम्ही स्वीकारली नाही. भविष्यकाळात गोष्ट वेगळी असू शकेल. जर आपण स्वतःला नम्र केले आणि आपल्या गरजेच्या वेळी कृपेसाठी आरोळी मारली, तर देव आपल्याला निराश करणार नाही.

पवित्र शास्त्र म्हणते, की जे विपुल कृपा स्वीकारतील ते येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. "कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करितील" (रोम.५:१७). आदामासाठी देवाची हीच इच्छा होती - की त्याचे प्रभुत्व असावे आणि त्याने प्रत्येक गोष्टीवर राज्य करावे. उत्पत्ति१:२६ म्हणते, "मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्या सदृश असा मनुष्य आपण करू ; ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवतील" आदामाच्या आज्ञाभंगामुळे हे त्याच्या जीवनात पूर्ण होण्यापासून रोखले गेले. परंतु आता देवाने पृथ्वीवर एक नवा वंश उभा केला आहे - येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगणाऱ्या देवाच्या पुत्रांचा - ज्यांना राजांच्या सन्मानाने जगायचे आहे व पृथ्वीवर राज्य करायचे आहे.

जर तुम्ही स्वतःला नम्र करून देवाची कृपा स्वीकाराल, तर कोणत्याही पापाची तुमच्यावर सत्ता असणार नाही. कोणतीही भीती किंवा चिंता पुन्हा कधीही तुमच्या हृदयात प्रवेश करू शकणार नाही. पृथ्वीवरील कोणीही आता तुमचे जीवन कष्टी करू शकणार नाही - तुमच्या वरचा अधिकारी नाही, तुमचा शेजारी नाही, तुमचे नातेवाईक नाही, तुमचे शत्रू नाही आणि सैतानही नाही. देवाचा धन्यवाद असो जो सर्वदा ख्रिस्तामध्ये आम्हास आपल्या विजयात नेतो (२ करिंथ २:१४)! देवाच्या कृपेच्या नव्या कराराखाली जगणे किती अद्भुत आहे! वचनदत्त भूमी तुमच्यासमोर खुली आहे!

आत जा व ती हस्तगत करा!