WFTW Body: 

नवीन वर्षाची सुरुवात करत असताना, आपल्या आध्यात्मिक जीवनात या वर्षी आपण काय प्राधान्यक्रम बाळगला पाहिजे याचा गांभीर्याने विचार करणे चांगले आहे. येथे काही सूचना आहेत. त्यांचा गांभीर्याने विचार करा - आणि प्रार्थना करा की ते सर्व आपल्या जीवनात पूर्ण होतील. परमेश्वर तुम्हाला मदत करो.

१. एक नवीन सुरुवात करा : लूक १५ मध्ये, त्या उधळ्या पुत्राच्या कथेत, आपण वाचतो की वडिलांनी अगदी वाईट प्रकारे अपयशी ठरलेल्या मुलासाठी सर्वोत्तम झगा बाहेर आणला. हाच शुभवर्तमानाचा संदेश आहे: जे पतन पावले आहेत त्यांनाही देव त्याचे सर्वोत्तम देतो. ते एक नवीन सुरुवात करू शकतात, कारण देव कधीही कोणाचीही आशा सोडून देत नाही. भूतकाळात अपयशी ठरलेल्यांसाठी हे एक मोठे प्रोत्साहन आहे. तुमच्या घोडचुका किंवा अपयश काहीही असो, तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आता देवापासून एक नवीन सुरुवात करू शकता.

२. शिस्त पाळा : २ तीमथ्य १:७ मध्ये पौल म्हणतो, "देवाने आपल्याला सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे". देवाचा आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो, इतरांबद्दल प्रीती देतो आणि आपल्याला स्वतःला शिस्त लावण्यास सहाय्य करतो. पवित्र आत्म्याचा तुम्हाला जो काही अनुभव आला असेल, जर तुम्ही पवित्र आत्म्याला तुम्हाला शिस्त लावू दिली नाही - तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमचा पैसा शिस्तबद्ध पद्धतीने खर्च करता येत नसेल आणि तुमच्या बोलण्याला तुम्ही शिस्त लावली नाहीत , तर देवाला जसे हवे आहात तसे तुम्ही कधीच होणार नाही. मंडळीच्या इतिहासात देवाचे सर्वात मोठे सेवक असे पुरुष आणि स्त्रिया होते ज्यांनी पवित्र आत्म्याला त्यांच्या जीवनाला शिस्त लावू दिली. त्यांना त्यांच्या झोपेच्या सवयी, खाण्याच्या सवयी, प्रार्थना आणि शास्त्रवचनांच्या अभ्यासात शिस्त होती. त्यांच्या सर्व पृथ्वीवरील इच्छांपेक्षा देवाला प्रथम स्थान देण्यात त्यांना शिस्त होती . अनेक ख्रिस्ती पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा घेतल्याबद्दल समाधानी असतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्व काही सुरळीतपणे होईल अशी त्यांची कल्पना असते . पण या वर्षात तुमच्या आयुष्यासाठी देवाची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हालाही शिस्त असणे गरजेचे आहे.

३. अग्नी ज्वलंत ठेवा : तीमथ्याला विश्वास आणि आध्यात्मिक दाने होती आणि तरीही पौल त्याला याची आठवण करून देतो ,"की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे."(2 तीमथ्य 1:6) पवित्र आत्मा हा भित्रेपणाचा आत्मा नाही. पौलाने त्याला तो प्रज्वलित ठेवण्याची विनंती केली. यावरून आपल्याला कळते की, येशू जरी आपल्याला पवित्र आत्म्यात आणि अग्नीत बाप्तिस्मा देत असला (मत्तय ३:११) , तरी ती आग नेहमी प्रज्वलित ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागते. देव अग्नी पेटवतो. आपल्याला इंधनाचा पुरवठा करत राहावे लागते - देवाच्या इच्छेला पूर्णपणे समर्पित असलेले जीवन. देवाने एकदा अभिषेक केला तर तुम्ही निश्चिन्त होऊन "एकदा अभिषेक केला म्हणजे नेहमीसाठी अभिषेक झाला" असे म्हणू शकता, अशी कल्पना करू नका. "एकदा तारले गेले की, नेहमीसाठी तारले गेले" असे म्हणण्याइतकीच ही एक भ्रामक गोष्ट आहे. मी असे लोक पाहिले आहेत ज्यांना देवाने खरोखर अभिषेक केला होता जे एक वर्षानंतर आध्यात्मिकरित्या मरण पावले. अग्नी नाहीसा झाला. ऐहिक ओढ आणि गर्व आत आले आहेत आणि त्यांनी अग्नी काढून घेतला आहे. ते आता पैशाच्या मागे आणि आरामदायक जीवनाच्या मागे धावत आहेत - आणि देवाचा अग्नी हरवला आहे. हे दुःखद आहे आणि देवाच्या राज्यासाठी हे मोठे नुकसान आहे. म्हणून पौलाने तीमथ्याला सांगितले, "देवाचे जे कृपादान तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर." हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही तो ज्वलंत ठेवला नाही तर तो मरून जाईल. सद्सद्विवेकबुद्धी ठेवून, देवाच्या शब्दाचा अभ्यास करून, सतत नम्र होऊन, मनापासून देवाचा शोध घेऊन, पैशाच्या प्रेमापासून दूर राहून आणि इतरांशी वाद विवाद टाळून आणि ही आग शमवणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहून ती ज्वलंत ठेवा."

४. स्थिर आध्यात्मिक प्रगती करा : इब्री लोकांस पत्र ६:१-३ मध्ये आपल्याला प्रौढतेपर्यंत नेटाने जाण्यासाठी बोध केला आहे . पर्वत चढण्यासारखे प्रौढतेपर्यंत नेटाने जाण्याचा विचार करा (समजा, १०,००० मीटर). येशू आधीच शिखरावर पोहोचला आहे. नवा जन्म झाल्यावर आपण या पर्वताच्या पायथ्याशी सुरुवात करतो. येशूचे अनुसरण करणे आणि कितीही वेळ लागला तरी वरच्या दिशेने नेटाने चढणे हे आपले ध्येय आहे. मग आपण आपल्या लहान भावांना आणि बहिणींना म्हणू शकतो, "जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा" (१ करिंथकरांस पत्र ११:१), जरी आपण फक्त १०० मीटर चढलो असलो तरी. आध्यात्मिकता ही देवाशी झालेल्या एका भेटीतून येणारी गोष्ट नाही. स्वत:ला नाकारण्याचा मार्ग निवडणे आणि देवाची इच्छा दिवसागणिक, आठवड्यानंतर आठवडे आणि वर्षानुवर्षे सातत्याने करण्याचा हा परिणाम आहे. त्याच्या इच्छेचा सातत्याने नाकार केल्यानेच येशू आध्यात्मिक माणूस बनला. आणि आपल्या आत्मइच्छेचा सतत नाकार केल्यानेच आपणही आध्यात्मिक बनू शकू. १ तीमथ्य ४:१५ मध्ये पौल तीमथ्याला "या गोष्टींचा अभ्यास " करण्याची विनंती करतो. एक व्यावसायिक पैसे मिळवण्यासाठी आणि आपला व्यवसाय दृढपणे स्थापित करण्यासाठी खूप कष्ट घेतो. जर तुम्ही ख्रिस्ती जीवनाबद्दल गंभीर असाल, तर शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी, आत्म्याची दाने शोधण्यासाठी आणि प्रत्येक अशुद्ध गोष्टीपासून आपले जीवन शुद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या वचनाच्या एका भाषांतरात असे लिहिले आहे, "त्याच्यात गढून जा ." जेव्हा आपण या गोष्टींत स्वतःला गढवून घेऊ तेव्हा आपली प्रगती प्रत्येकाला स्पष्टपणे दिसेल. येशू ख्रिस्त आणि त्याच्या वचनात इतके गढवून घ्या की या जगाचे प्रलोभन आपल्याला इतके आकर्षित करणार नाही. आणि आम्ही अशा अनेक गोष्टींमागे धावणार नाही ज्यामागे ऐहिक लोक धावतात. जर तुम्ही असे "गढून घेतलेले" जीवन जगलात, तर तुम्ही सतत प्रगती कराल. दरवर्षी तुम्ही एक चांगले ख्रिस्ती आणि परमेश्वराचे अधिक प्रभावी सेवक व्हाल.

५. मात करणारे व्हा : इब्री लोकांस १२:१-३ मध्ये आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे असा बोध केला आहे. आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि या शर्यतीत धावतो. आम्ही स्थिर उभे राहत नाही. विश्वासाची शर्यत अशी आहे ज्यात आपण स्थिर उभे राहू शकत नाही. वेळ कमी आहे आणि म्हणून आपल्याला धावावे लागते. जर तुम्ही खाली पडलात, तर उठून धावत रहा. असे अनेक धावपटू आहेत जे शर्यतीत खाली पडले आहेत, जे उठले, धावत राहिले आणि तरीही प्रथम आले. त्यामुळे कधीकधी परमेश्वराबरोबर चालताना खाली पडलात तर निराश होऊ नका. तिथेच पडून राहू नका. उठा, आपल्या पापाची कबुली द्या आणि धावत रहा. वधस्तंभ सहन करणाऱ्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत धावणाऱ्या येशूकडे पहा. जेव्हा अनेक शत्रू तुम्हाला विरोध करतात, तेव्हा येशूचा विचार करा ज्याचे अनेक शत्रू त्याला विरोध करत होते (इब्री लोकांस पत्र १२:३). त्याच्याप्रमाणे रक्त सांडण्यापर्यंत तुम्ही अद्याप पापाचा प्रतिकार केलेला नाही. (इब्री लोकांस पत्र १२:४)येथे आपण पाहतो की येशूने पापाचा प्रतिकार केला.दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, पापाबद्दलचा त्याचा दृष्टिकोन असा होता की, "पाप करण्यापेक्षा मी माझे रक्त सांडेन." जर तुमची हीच वृत्ती असेल - की तुम्ही पाप करण्यापेक्षा मरणे पसंत कराल - तर तुम्हीही मात कराल. जेव्हा तुम्हाला खोटे बोलण्याचा मोह होतो, आणि तुम्ही म्हणाल, "खोटे बोलण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन", तर तुम्ही मात करणारे व्हाल. जेव्हा तुम्हाला जास्त पैसे कमवण्यासाठी थोडी फसवणूक करण्याचा मोह होतो, तेव्हा जर तुम्ही म्हणाल, "मी थोडीशीही फसवणूक करण्यापेक्षा मरणे पसंत करेन", तेव्हा तुम्ही मात करणारे व्हाल. जेव्हा तुम्हाला एखाद्या स्त्रीबद्दल वासना वाटण्याचा मोह होतो आणि तुम्ही म्हणता, " वासनेपेक्षा मी मरणे पसंत करेन", तेव्हा तुम्ही मात कराल. हे विजयी जीवन जगण्याचे रहस्य आहे.

६. देवाच्या प्रेमात सुरक्षित राहा : "तो आपल्या प्रीतीत निवांत राहील "हे शब्द सफन्या ३:१७ मध्ये अशाप्रकारे भाषांतरित केले गेले आहेत: "तोशांतपणे तुमच्यासाठी प्रीतीत योजना आखत आहे". देव आपल्या जीवनात प्रवेश करू देतो ती प्रत्येक गोष्ट प्रीतीतून आपल्यासाठी योजना आखत असलेल्या हृदयातून येते हे तुमच्या लक्षात येते का? आपल्या जीवनात येणारी प्रत्येक कसोटी आणि समस्या आपल्या अंतिम भल्यासाठी नियोजित केली गेली आहे. जर तुम्ही रोम ८:२८ वर विश्वास ठेवलात, तर तुम्ही आयुष्यभर लोकांना किंवा परिस्थितीला पुन्हा कधीही घाबरणार नाही. तुम्हाला अपघात होऊ शकतो, किंवा कर्करोगाने मरण येईल किंवा ख्रिस्तीविरोधी धर्मांध तुम्हांला नुकसान करू शकतात किंवा इतर कोणत्याही भीतीने तुम्ही जगणार नाही - कारण तुमचा स्वर्गीय पिता सर्व काही आणि प्रत्येकाला नियंत्रित करतो.

आपल्याला आध्यात्मिक प्रगतीचे खरोखर आशीर्वादित वर्ष मिळावे अशी आमची इच्छा आहे.