WFTW Body: 

एकदा येशूकडे आलेल्या दोन आंधळ्यांच्या गोष्टीचा विचार करा. मत्तय ९:२७ मध्ये, आपण वाचतो की दोन आंधळे येशूच्या मागे गेले आणि म्हणाले, "आमच्यावर दया करा," आणि येशूने त्यांना विचारले, "मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?" (दुसऱ्या शुभवर्तमानातील समांतर उताऱ्यात जे स्पष्ट होते.) ते म्हणाले, "आमचे डोळे उघडावेत अशी आमची इच्छा आहे!" आणि मग तो मत्तय ९:२८ मध्ये त्यांना एक प्रश्न विचारतो, "तुमच्यासाठी हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का ?"

हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही देवाला एखाद्या गोष्टीसाठी विनंती करता,तेव्हा प्रभुने वचन दिलेल्या कोणत्याही गोष्टीबाबतीत परमेश्वर तुम्हाला हा एक महत्वाचा प्रश्न विचारतो. "प्रभु, मला माझे बंद डोळे उघडावेत अशी माझी इच्छा आहे," किंवा, "माझा आजार बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे," किंवा, "मला एका विशिष्ट पापी सवयीपासून सुटका पाहिजे आहे," किंवा, "प्रभु मला नोकरी पाहिजे आहे," किंवा, "मला राहण्यासाठी जागा शोधायची आहे." अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण देवाकडे मागू शकतो. देव आपल्या सर्व आध्यात्मिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करतो, परंतु आपण देवाला आपल्या विशिष्ट गरजांसाठी विनंती केल्यानंतर प्रभु आपल्याला हा प्रश्न विचारेल: "तुम्हाला विश्वास आहे का की मी तुमच्यासाठी हे करू शकतो ? " ते येशू बोलत आहे.

तुम्हाला माहिती आहे का की प्रभु आपल्या जीवनात त्याच्या क्षमतेनुसार नाही तर आपल्या विश्वासानुसार कार्य करतो ? जर तुमच्याकडे एखाद्या गोष्टीसाठी विश्वास नसेल, तर जरी प्रभूकडे तुमच्यासाठी त्यापेक्षा जास्त करण्याची क्षमता असली तरी, प्रभू तुमच्यासाठी जे काही करू इच्छितो ते तुम्हाला अनुभवता येणार नाही. तुम्हाला सुटकेचा अनुभव तुमच्या विश्वासाच्या पातळीनुसारच तुम्हाला मिळेल.

कल्पना करा की जर पहिला आंधळा माणूस म्हणतो, "बरं प्रभू, जर तुम्ही माझा फक्त एक डोळा उघडू शकले तरी मला आनंद होईल. माझ्यासाठी ते पुरेसे आहे. मी एका डोळ्याने या पृथ्वीवर जगू शकतो आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते करू शकता." प्रभु त्याला मत्तय ९:२९ मध्ये म्हटल्याप्रमाणे उत्तर देईल, "तुमच्या विश्वासानुसार तुम्हास प्राप्त होवो." प्रभु म्हणतो, "माझ्या क्षमतेनुसार नाही, पण तुमच्या विश्वासानुसार होवो." हा माणूस त्या खोलीतून एक डोळा उघडलेला आणि दुसरा डोळा अजूनही बंद असलेला असा बाहेर पडेल. हे खूप चांगले आहे; एका आंधळ्या माणसासाठी एक डोळा उघडणे हे विलक्षण आहे.

मग कल्पना करा की दुसरा आंधळा येतो आणि प्रभु त्याला तोच प्रश्न विचारतो, "तुला विश्वास आहे का की मी तुझ्यासाठी हे करू शकतो?" आणि तो म्हणतो, "हो प्रभु ! मला विश्वास आहे की तू माझे दोन्ही डोळे उघडू शकतोस ! तुला काय अशक्य आहे?" त्याचे दोन्ही डोळे उघडतात. जर तो दुसऱ्या आंधळ्या माणसाला भेटतो (ज्याचा फक्त एक डोळा उघडला होता) आणि तो माणूस त्याला विचारतो, " तूझे दोन्ही डोळे कसे उघडले ? ही काही तरी खोटी शिकवण असावी !" ही खोटी शिकवण नाही; दुसऱ्या आंधळ्या मनुष्याला पहिल्यापेक्षा जास्त विश्वास होता, एवढंच.

आपण या दोन्ही डोळ्यांना आपल्या पापांची क्षमा आणि आपल्या पापांपासून वाचलेले असे समजू शकतो. एका व्यक्तीला दोन्ही गोष्टी मिळतात; दुसऱ्या व्यक्तीला फक्त पहिलेच मिळते . असे का? देव त्या व्यक्तीशी पक्षपाती होता म्हणून का ? ती व्यक्ती चांगली व्यक्ती होती म्हणून का? नाही. ख्रिस्ताने त्याच्यासाठी जे काही करण्याचे वचन दिले होते त्यावर त्याला विश्वास होता. एका व्यक्तीला फक्त असा विश्वास होता की ख्रिस्त त्याचे फक्त पाप क्षमा करू शकतो आणि म्हणून त्याला तेच मिळाले. दुसऱ्या व्यक्तीला असाही विश्वास नाही की ख्रिस्त त्याचे पाप क्षमा करू शकतो, म्हणून त्याला क्षमाही मिळत नाही.

जगात असे अनेक लोक आहेत. एखाद्याला असा विश्वास आहे की ख्रिस्त त्याचे पाप क्षमा करेल आणि त्याला क्षमा मिळेल. दुसऱ्याला "दोन्ही डोळ्यांसाठी" विश्वास आहे की ख्रिस्त मला फक्त माझ्या पापांची क्षमाच करू शकत नाही, तर त्या पापी सवयीपासून मला वाचवूही शकतो. त्याला दोन्ही गोष्टी मिळतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती दोन्ही घोषित करते की ख्रिस्त आपल्याला फक्त क्षमा करू शकत नाही तर आपल्याला सोडवूही शकतो, तेव्हा ज्या लोकांनी फक्त क्षमा अनुभवली आहे ते त्या मोठ्या सुटकेला खोटी शिकवण म्हणतील. कारण त्यांनी स्वतः ते अनुभवले नाही, ते म्हणतात की ते अशक्य आहे. ते म्हणतात की कोणत्याही मनुष्याला पापापासून सुटका मिळणे अशक्य आहे. पण प्रश्न असा नाही की ते मनुष्यासाठी अशक्य आहे का. प्रश्न असा आहे की, देवासाठी ते अशक्य आहे का?

येशू म्हणाला की देवासाठी काहीही अशक्य नाही. मनुष्यासाठी अनेक गोष्टी अशक्य आहेत. देवाच्या सामर्थ्याशिवाय मनुष्याला पापांची क्षमा मिळणे अशक्य आहे, पण देवासाठी काहीही अशक्य नाही. कृपया लक्षात ठेवा की जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने केलेल्या गोष्टीचा अनुभव आला नाही तर जे त्याच्याकडे आहे ते काही खोटी शिकवण असल्यामुळे आहे असे नाही; तर कदाचित तुम्ही त्याच्याइतका विश्वास ठेवत नसल्यामुळेही असेल.

दुसरे उदाहरण वापरायचे झाले तर, कल्पना करा की प्रत्येकाच्या घराबाहेर सारखाच पाऊस पडत आहे आणि शहरात पाण्याची कमतरता आहे, म्हणून लोक पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी बाहेर भांडी ठेवतात. जर एका माणसाने त्याच्या घराबाहेर एक छोटासा कप ठेवला तर त्याला किती पाऊसाचे पाणी मिळेल ? फक्त एक कपभर. जर दुसऱ्या माणसाने त्याच्या घराबाहेर एक मोठा टब ठेवला तर त्याला किती पाणी मिळेल? एक पूर्ण टब! एक पूर्ण टबभर पाणी आणि एक कपभर पाणी यात काही फरक आहे का? नक्कीच ! कपभर पाणी असलेला माणूस म्हणेल, "तुम्हाला पूर्ण टबभरून पाणी कसे मिळाले ? देवाने तुमच्या घरासमोर जास्त पाऊस पाडून पक्षपात केला!" टबभरून पाणी असलेला माणूस उत्तर देईल, "नाही; भावा, तुझ्या घराबाहेरही तेवढाच पाऊस पडला, पण तुझ्या घरच्या बाहेर फक्त एक छोटासा कप होता! तुमच्या विश्वासाची पातळी तेवढीच होती आणि म्हणूनच तुमच्याकडे एवढेच आहे."

आपल्या विश्वासाच्या प्रमाणात आपल्याला देवाकडून मिळते. देवाचा आशीर्वाद अमर्यादीत आहे. इफिसकरास पत्र १:३ म्हणते की त्याने “स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे,” पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद आपल्याला आपला पूर्वज आदाम याच्याकडून मिळालेल्या प्रत्येक वाईट पापी सवयीपासून मुक्त करण्यासाठी दिला आहे. परंतु आज प्रभु आपल्याला हा प्रश्न विचारतो: “तुम्हाला विश्वास आहे का की मी तुमच्यासाठी हे करू शकतो?”