प्रकटीकरण २:१२-१७ मध्ये आपण वाचतो, “पर्गम येथील मंडळीच्या देवदूताला लिही; ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो:‘तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे, सैतानाचे आसन आहे तेथे; तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा जो तुमच्यामध्ये जिवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
पर्गम हे असे एक शहर होते, जे इतके वाईट होते की प्रभु म्हणतो की तिथे सैतानाचे पृथ्वीवरील मुख्यालय होते. हे प्रकटीकरण २:१३ मध्ये दोनदा नमूद केले आहे. आणि त्या शहराच्या मध्यभागी प्रभुने त्याची मंडळी ठेवली होती.
परमेश्वराने त्यांना सांगितले, “तुम्ही कुठे राहता हे मला माहित आहे”. आपण कुठे राहतो आणि कोणत्या परिस्थितीत आपण राहतो हे परमेश्वराला अचूकपणे माहित आहे. जरी आपण जिथे राहतो तिथे सैतानाचे पृथ्वीवरील सिंहासन असले तरी तो आपल्याला तिथे शुद्ध आणि विजयी ठेवू शकतो. आत्म्याच्या तलवारीने आपणही त्यावर मात करू शकतो.
कोणताही दीपस्तंभ कधीही अशी तक्रार करत नाही की आजूबाजूच्या परिसरात खूप अंधार आहे त्यामुळे तो त्यात चमकू शकत नाही. दीपस्तंभाच्या तेजाचा त्याच्या सभोवतालच्या परिसराशी काहीही संबंध नसतो. त्याचा प्रकाश केवळ त्यात असलेल्या तेलाच्या प्रमाणावर अवलंबून असतो.
कोणत्याही स्थानिक मंडळीच्या बाबतीत असेच आहे. आजूबाजूचा परिसर वाईट असू शकतो. त्या शहरात सैतानाचे सिंहासन असू शकते. परंतु जर मंडळी पवित्र आत्म्याच्या तेलाने भरलेली असेल तर तीचा प्रकाश तेजस्वीपणे चमकेल. खरं तर, परिसरात जितका जास्त अंधार असेल तितका अधिक तेजस्वीपणे अशा परिसरात कोणताही प्रकाश दिसेल ! तारे रात्री दिसतात - दिवसा नाही.
परमेश्वर या मंडळीची त्याचे नाव दृढ धरून ठेवल्याबद्दल आणि छळाच्या काळातही विश्वास न नाकारल्याबद्दल प्रशंसा करतो. तो विशेषतः अंतिपासचा उल्लेख करतो, जो एक विश्वासू साक्षीदार होता ज्याने आपल्या विश्वासासाठी आपले जीवन दिले.
अंतिपास हा असा एक होता जो देवाच्या सत्यासाठी जरी त्याला एकटे उभे राहावे लागले तरीही तो उभा राहिला. तो दृढनिश्चयी व्यक्ती होता आणि लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणारा नव्हता. जे देवाला ओळखतात त्यांना त्यांच्या विश्वासावर किती लोक विश्वास ठेवतात हे पाहण्यासाठी आजूबाजूला पाहण्याची गरज नाही. गरज पडल्यास ते संपूर्ण जगाविरुद्ध प्रभूसाठी एकटे उभे राहण्यास तयार असतात. अंतिपास हा असाच एक माणूस होता. आणि परिणामी, त्याला मारण्यात आले.
जर तो मनुष्याला प्रसन्न करणारा असता, तर तो मृत्युपासून वाचू शकला असता. परमेश्वरानी प्रकट केलेल्या सत्यासाठी तो कोणतीही तडजोड न करता उभा राहिला म्हणून त्याला मारण्यात आले. लोक कदाचित त्याला संकुचित मनाचा, हट्टी, जुळवून घेण्यास कठीण आणि वेडा म्हणत असतील. पण त्यामुळे त्याला काही फरक पडला नाही. तो फक्त त्याच्या प्रभूशी प्रामाणिक राहिला, सर्व पाप, जगिकता, तडजोड, देवाच्या वचनाची अवज्ञा आणि सैतानाविरुद्ध उभा राहिला. तो एक असा माणूस होता जो सैतानाच्या राज्यासाठी धोका होता.
कदाचित अंतिपास पर्गममध्ये असल्यामुळे सैतानाने त्याचे सिंहासन तिथे ठेवण्याचा निर्णय घेतला. जर सैतान देखील अंतिपासला घाबरत असेल तर अंतिपास किती भला माणूस असेल !
देवाला, आज जगाच्या प्रत्येक भागात अंतिपाससारख्या लोकांची गरज आहे. लवकरच अशी वेळ येत आहे जेव्हा आपल्याला आपल्या विश्वासाची किंमत मोजावी लागेल. आपल्या सभोवतालचे सर्व बॅबिलोनियन ख्रिस्ती धर्मजगत तडजोड करतील आणि अँटीक्राइस्टसमोर नतमस्तक होतील. त्या दिवशी आपण अंतिपासप्रमाणे खंबीरपणे उभे राहू का ? की आपला जीव वाचवण्यासाठी आपण सैतानासमोर गुडघे टेकू ? देवाच्या सत्यासाठी आपला जीव गमावणे योग्य आहे याची आपल्याला खात्री आहे का?
आज, देव छोट्या छोट्या परीक्षांमधून आपली परीक्षा घेत आहे. जर आपण या छोट्या छोट्या परीक्षांमध्ये विश्वासू राहिलो तरच भविष्यात येणाऱ्या मोठ्या परीक्षांमध्ये आपण विश्वासू राहू शकतो. सैतानाने तुम्हाला त्याच्या राज्यासाठी इतका धोका समजावा की त्याने त्याचे सिंहासन तुम्ही जिथे राहता त्या शहरात हलवले पाहिजे.
दुःखाची गोष्ट अशी होती की अंतिपासच्या मृत्यूनंतर पर्गम येथील मंडळीची आध्यात्मिकरित्या घसरण झाली. अंतिपास जिवंत असताना कदाचित तो मंडळीचा संदेशवाहक होता. जेव्हा तो मरण पावला तेव्हा दुसऱ्या कोणीतरी त्याची जबाबदारी घेतली आणि मंडळीची घसरण झाली. हा अनेक मंडळींचा दुःखद इतिहास आहे.