WFTW Body: 

जेव्हा येशूने मत्तय २४ मध्ये आपल्या शिष्यांना स्वतःच्या पुनः येण्याविषयी सांगितले, तेव्हा त्याने एकापेक्षा अधिक वेळा या गोष्टीवर भर दिला की त्यांनी सावध राहिले पाहिजे (मत्तय २४:४२, ४४; २५:१३). तेव्हा, कोणत्याही वेळी आत्मिकदृष्ट्या सावध आणि सज्ज असणे हीच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे - भविष्यसूचक तथ्यांचे केवळ ज्ञान असणे नव्हे. येशूने मत्तय २५ मध्ये (जो मत्तय २४ मधील भविष्यवाण्यांचा पुढील भाग आहे), तीन क्षेत्रांविषयी सांगितले आहे, त्या तीन क्षेत्रांमध्ये त्याच्या आगमनासाठी सज्ज होण्याकरिता आपण सावध आणि विश्वासू असणे अपेक्षित आहे.

१. गुप्त जीवनातील विश्वासूपणा
या दृष्टांतामध्ये, येशूने दहा कुमारींविषयी सांगितले (मत्तय २५:१-१३). हे लक्षात घ्या की, त्यांच्यापैकी कोणीही वेश्या नव्हती (आत्मिक व्यभिचाराच्या व्याख्येसाठी याकोब ४:४ पहा). त्या सर्वजणी कुमारी होत्या. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, लोकांच्या नजरेत त्यांची साक्ष चांगली होती. त्यांचे दिवे तेवत होते (मत्तय ५:१६). त्यांची चांगली कृत्ये इतरांना दिसत होती. तरीही, या सर्व कुमारींमध्ये केवळ पाचजणीच सुज्ञ होत्या. परंतु सुरुवातीला ही गोष्ट प्रत्येकाच्या सहज लक्षात येण्यासारखी नव्हती. केवळ पाचजणींनीच आपल्या कुप्यांमध्ये सोबत तेल घेतले होते (मत्तय २५:४).

कुपीमधील ते तेल रात्रीच्या वेळी, दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे, दिसत नव्हते; ते तेल आपल्या अशा 'गुप्त जीवना'चे प्रतीक आहे जे देवाच्या नजरेत असते, परंतु या जगाच्या अंधकारात लोकांना दिसत नाही. आपल्या सर्वांकडेच अशी एक कुपी असते. प्रश्न हा आहे की, त्या कुपीमध्ये आपल्याकडे तेल आहे की नाही. संपूर्ण शास्त्रामध्ये 'तेल' हे पवित्र आत्म्याचे प्रतीक म्हणून वापरले गेले आहे; आणि येथे त्याचा संदर्भ देवाच्या त्या जीवनाशी आहे, जे जीवन पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला प्रदान करतो. त्या जीवनाचे बाह्य प्रकटीकरण म्हणजे 'प्रकाश' होय (योहान १:४). तर त्याचा आंतरिक गाभा म्हणजे 'तेल' होय. अनेक लोक केवळ आपल्या बाह्य साक्षीतच मग्न असतात. हाच त्यांचा मूर्खपणा आहे. परीक्षा आणि कसोटीच्या काळातच आपल्याला हे कळते की केवळ बाह्य प्रकाश पुरेसा नाही. आपल्याला विजयाने पार नेण्यासाठी, ईश्वरीय जीवनाचा आंतरिक गाभा असणे अत्यंत आवश्यक आहे .

"जर संकटाच्या वेळी तू दुर्बल ठरलास, तर खऱ्या अर्थाने तू दुर्बलच आहेस" (नीतिसूत्रे २४:१६). जीवनातील संकटेच आपल्याला दाखवून देतात की आपण किती बलवान किंवा दुर्बल आहोत. या दृष्टांतामध्ये, संकट हे होते की वराला येण्यास उशीर झाला. आपली आध्यात्मिकता किती खरी आहे, हे सिद्ध करणारी गोष्ट म्हणजे 'वेळ' होय. ज्याच्याकडे विश्वास आहे, तो शेवटपर्यंत टिकून राहतो आणि तारण पावतो. कोणाच्या जीवनात 'आंतरिक गाभा' आहे आणि कोणाच्या नाही, हे सिद्ध करणारी गोष्टही 'वेळ'च आहे. अनेक लोक त्या बीजासारखे असतात जे लगेच रुजते आणि उगवते, पण त्याच्यामध्ये कोणताही 'अंतर्गत जीव' नसतो. त्यांच्या अंतःकरणात मातीचा पुरेसा खोलपणा नसतो (मार्क ४:५). म्हणूनच, नवीन विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिकतेचे किंवा त्यांच्या मनाच्या एकनिष्ठतेचे मूल्यमापन करणे कठीण असते. जर आपल्याकडे वाट पाहण्याचा संयम असेल, तर वेळ सर्व काही उघड करेल. तेव्हा, ख्रिस्ताच्या आगमनासाठी सज्ज राहण्याचा मार्ग म्हणजे, आपल्या विचारांमध्ये, दृष्टिकोनांमध्ये आणि हेतूंमध्ये; ज्या गोष्टी आपल्या सभोवतालच्या लोकांना दिसत नाहीत तर देवाच्या दृष्टीसमोर शुद्धता आणि एकनिष्ठतेने भरलेले 'आंतरिक जीवन' जगणे हा होय. जर आपल्याकडे हे 'अंतर्गत जीवन' नसेल, आणि तरीही आपण ख्रिस्ताच्या आगमनासाठी सज्ज आहोत असे मानत असू, तर आपण स्वतःचीच फसवणूक करत आहोत.

२. आपल्या सेवेतील एकनिष्ठता
दुसऱ्या दृष्टांतामध्ये, देवाने आपल्याला दिलेल्या विविध 'देणग्यांचा' विश्वासाने वापर करण्यावर भर दिला आहे (मत्तय २५:१४-३०). या देणग्या म्हणजे भौतिक संपत्ती, पैसा, उपजत क्षमता, जीवनातील संधी, आत्मिक वरदाने, इत्यादि आहेत. या बाबतीत सर्वजण समान पातळीवर नसतात—कारण आपण दृष्टांतात पाहतो की, एकाला पाच, दुसऱ्याला दोन आणि तिसऱ्याला केवळ एकच देणगी मिळाली होती. परंतु, आपल्याला जे काही मिळाले होते, त्याबाबत विश्वासू राहण्यासाठी सर्वांना समान वेळ मिळाला होता. ज्याला अधिक दिले गेले, त्याच्याकडून अधिकचीच अपेक्षा केली जाते. म्हणूनच, ज्याने आपल्या दोन देणग्यांचे रूपांतर चारमध्ये केले, त्याला तेच बक्षीस मिळाले जे पाच देणग्यांचे रूपांतर दहामध्ये करणाऱ्याला मिळाले होते. मात्र, शिक्षा त्या व्यक्तीला झाली ज्याने आपली देणगी 'जमिनीमध्ये' गाडून ठेवली होती (मत्तय २५:१८) - म्हणजेच, ज्याने देवाने दिलेल्या देणग्यांचा वापर देवासाठी न करता, केवळ या जगासाठी केला. कोणीही असे म्हणू शकत नाही की आपल्याला काहीच मिळाले नाही - कारण प्रत्येकालाच देवाकडून कोणती ना कोणती देणगी नक्कीच मिळालेली असते. खरा प्रश्न हा आहे की, आपण या देणग्यांचा वापर कशासाठी करतो. आपण स्वतःसाठी ज्या गोष्टींचा वापर करतो, त्या गोष्टी जमिनीत गाडून ठेवलेल्या देणग्यानसारख्याच आहे. केवळ देवाच्या गौरवासाठी आपण ज्या गोष्टींचा वापर करतो, केवळ त्याच गोष्टींची गणना 'शाश्वत संपत्ती' म्हणून केली जाईल. या निकषावर पाहिल्यास, बहुसंख्य विश्वासणाऱ्यांचे दारिद्र्य आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. "सर्व काही देवासाठी आणि स्वतःसाठी काहीच नाही," हेच आपले ब्रीदवाक्य असायला हवे. तरच आपण ख्रिस्ताच्या पुनरागमनासाठी सज्ज होऊ शकू. जोपर्यंत आपण आपल्याकडील सर्वस्वाचा त्याग करत नाही, तोपर्यंत आपण येशूचे शिष्य ठरू शकत नाही. ज्या व्यक्तीने देवाने दिलेली आपली सर्व मालमत्ता आणि देणग्या प्रभूच्या सेवेसाठी वापरल्या नाहीत; अशी व्यक्ती जर आपण ख्रिस्ताच्या पुनरागमनासाठी सज्ज आहोत असा दावा करत असेल, तर ती केवळ स्वतःचीच फसवणूक करत आहे.

३ विश्वासणाऱ्या भावांची सेवा करण्यातील विश्वासूपणा
मागील भागात, येशूने आपल्या गरजू विश्वासू भावाविषयी असलेल्या आपल्या दृष्टिकोनाविषयी चर्चा केली आहे (मत्तय २५:३१-४६). ही गरज आत्मिक किंवा शारीरिक असू शकते. येथे आपण पाहतो की, काही लोक राज्याचे वारस ठरतात; याचे कारण असे की, त्यांनी आपल्या विश्वासू भावाची सेवा ही 'प्रभूचीच सेवा' आहे असे मानून केली. त्यांची सेवा इतकी गुप्तपणे केली गेली होती की, त्यांच्या उजव्या हाताने काय केले, हे त्यांच्या डाव्या हातालाही समजले नाही (मत्तय ६:३). इतकेच काय, पण जेव्हा प्रभू त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची आठवण करून देत होता , तेव्हा त्यांना स्वतःलाही त्या गोष्टी आठवत नव्हत्या ! (मत्तय २५:३८).

येशूने येथे हे देखील शिकवले की, त्याच्या बंधूंमधील 'सर्वात लहानाची' आपण जी काही सेवा करतो, ती सेवा थेट त्याचीच सेवा मानली जाते (मत्तय २५:४०). येथे त्याने 'सर्वात लहान' असा उल्लेख केला आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे; कारण आपली प्रवृत्ती अशी असते की, आपण केवळ 'महत्त्वाच्या' किंवा प्रतिष्ठित विश्वासूंचीच सेवा करतो आणि गरीब व तुच्छ मानल्या जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो ! जे लोक केवळ स्वतःसाठीच खाण्या-पिण्यात, खरेदी-विक्रीत, आणि बांधकामात व लागवड करण्यात मग्न असतात, ते येशूच्या पुनरागमनाच्या वेळी नक्कीच मागे राहतील (लूक १७:२८, ३४). केवळ तेच लोक वर उचलले जातील , ज्यांच्या प्रभूसेवेमध्ये विश्वासणाऱ्या भावाची सेवा करण्याविषयीची प्रेमळ आस्था आणि काळजी सामावलेली होती. दुसऱ्या एका भागात , येशूने लोकांच्या आणखी एका गटाविषयी सांगितले आहे - जो गट वरील गटाच्या अगदी विरुद्ध आहे. हे असे लोक आहेत ज्यांना प्रभूच्या नावाने आपण केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची पूर्ण आठवण असते. हे लोकही न्यायसनासमोर उपस्थित असतात आणि ते प्रभूला आठवण करून देतात की, त्यांनी येशूच्या नावाने भुते काढली, सुवार्ता सांगितली, आजारी लोकांना बरे केले, इत्यादी. परंतु, या सर्व गोष्टी करूनही, प्रभू त्यांना नाकारतो ; याचे कारण असे की, त्यांच्यामध्ये सर्वात पहिली आणि मूलभूत जी आवश्यकता आहे त्याची कमी होती - ती म्हणजे, देवाच्या समोर पवित्रतेचे गुप्त जीवन जगणे. ते आपल्याकडे असलेल्या आध्यात्मिक देणग्यांच्या किंवा सामर्थ्याच्या मोठेपणातच मग्न होते.