धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारख आहे. (नीतिसूत्रे ४:१८)
हे खरोखरच नवीन कराराचे वचन आहे. आपल्याला माहीत आहे की, एखादी व्यक्ती तेव्हाच नीतिमान ठरते, जेव्हा ती व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवते, जेव्हा त्या व्यक्तीचे पाप क्षमा होतात आणि देवाकडून त्या व्यक्तीला नीतिमान घोषित केले जाते, ख्रिस्ताच्या नीतिमत्त्वाने त्या व्यक्तीला आच्छादित करून नीतिमान ठरवले जाते. पण मग, त्या व्यक्तीचे जीवन केवळ सूर्योदयासारखे असावे, ही देवाची इच्छा नाही. वचन म्हणते, "नीतिमानांचा मार्ग सूर्योदयासारखा आहे....." पण तुम्हाला माहीत आहे की, जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा प्रकाश असतो, पण सूर्य अजून त्याच्या पूर्ण तेजाने तळपत नसतो. आकाशात उगवणाऱ्या सूर्याचा विचार करा; दुपारी जेव्हा त्याचे पूर्ण तेज असते तोपर्यंत हा प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होत जातो. आपण असे म्हणू शकतो की, सूर्य वर चढत असताना सावल्या कमी होत जातात ; आपल्या स्व-जीवनाची सावली कमी होत जाते, कमी होत जाते, आणि शेवटी सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा सावली पूर्णपणे नाहीशी होते. आणि हीच आपल्यासाठी देवाची इच्छा आहे. आपण नवीन जन्म घेतल्यापासून, त्याच्या कोणत्याही मुलाचे जीवन चढ-उतारांचे असावे, ही देवाची इच्छा नाही.
बहुतेक ख्रिस्ती लोकांचे जीवन चढ-उतारांचे असते, आणि जेव्हा आपण ऐकतो की इतर लोकांचे जीवनही चढ-उतारांचे आहे, आणि एखाद्या उपदेशकाचे जीवनही चढ-उतारांचे आहे, तेव्हा आपण आपल्या पराभवात समाधान मानतो. आपण देवाच्या वचनाऐवजी जे सांगते की- नीतिमानांचा मार्ग चढ-उतारांचा नाही, एखाद्या दैहिक विचारसरणीच्या विश्वासणाऱ्याकडून किंवा दैहिक विचारसरणीच्या उपदेशकाकडून आपले आदर्श घेतो. तो कधी तेजस्वी आणि कधी अंधकारमय, आणि पुन्हा तेजस्वी आणि पुन्हा अंधकारमय असा नाही. कधी पर्वताच्या शिखरावर, तर कधी निराशेच्या गर्तेत. कधी प्रभूची स्तुती करत आणि आनंदित, तर दुसऱ्या दिवशी उदास आणि दुःखी. जर हाच आपला अनुभव असेल, तर मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, ही देवाची इच्छा नाही. तो नीतिमानांचा मार्ग नाही. जर एखादी व्यक्ती त्या मार्गाने चालत असेल, तर आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की तो नीतिमानांच्या मार्गावर चालत नाही.
नवीन करारामध्ये नीतिमानांच्या मार्गाला "नवीन आणि जिवंत मार्ग" असे म्हटले आहे. तो समजून घेण्याचा एखादा सिद्धांत नाही; तो नीतिमानांचा मार्ग आहे. आता, आपण अशा लोकांबद्दल ऐकतो जे 'नवीन आणि जिवंत मार्गावर' विश्वास ठेवतात. या आठवड्यात मला एका व्यक्तीबद्दल एक पत्र आले, ज्याने "नवीन आणि जिवंत मार्गाचे बंधू आणि भगिनी" यांच्याबद्दल सांगितले होते. 'नवीन आणि जिवंत मार्गाचा' बंधू किंवा भगिनी म्हणजे कोण? तो ख्रिश्चन फेलोशिप चर्चमध्ये बसणारा कोणी नाही. तो केवळ सिद्धांत समजून घेणारा नाही, तर तो असा आहे ज्याचा मार्ग वर-खाली होत नाही. ज्या व्यक्तीचा मार्ग वर-खाली होत असतो, तो 'नवीन आणि जिवंत मार्गावर' चालत नाही; तर त्याचा मार्ग जुना, मृत आहे. 'नवीन आणि जिवंत मार्ग' अधिक तेजस्वी, अधिक तेजस्वी, अधिक तेजस्वी, अधिक तेजस्वी असतो. नवीन करार ज्या एकमेव 'नवीन आणि जिवंत मार्गाबद्दल' बोलतो, तो हाच आहे: नीतिमानांचा मार्ग. 'निराश होणे ‘ हेच सिद्ध करते की आपण सिद्धांत समजून घेतला आहे, पण आपण खऱ्या मार्गावर अजिबात आलेलो नाही.
नीतिमानांचा मार्ग सूर्योदयासारखा आहे, जो अधिकाधिक तेजस्वी होत जातो; सूर्य मागे-पुढे जात नाही. तो अचानक आपला विचार बदलत नाही. तो फक्त स्थिरपणे पुढे जात राहतो, आणि बंधू आणि भगिनींनो, हीच आपल्या जीवनासाठी देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा हीच आहे की ते अधिकाधिक चांगले, चांगले आणि चांगले होत जावे. याचा अर्थ असा की, माझ्या शरीरात काय वास करते यावर मला अधिकाधिक प्रकाश मिळतो. माझ्या शरीरात काय वास करते जे मला ६ महिन्यांपूर्वी माहित नव्हते यावर मला आता प्रकाश मिळत आहे. जर आपण त्या स्थितीत नसू, तर आपण नीतिमानांच्या मार्गावर नाही. आपण हे अगदी स्पष्टपणे शिकूया, जेणेकरून केवळ काही सिद्धांत समजून घेऊन आपण स्वतःला फसवणार नाही. नाही; हा तो मार्ग आहे जिथे प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होत जातो, जिथे मला माझ्या शरीरात काय वास करते यावर अधिकाधिक प्रकाश मिळतो. किंवा जसे १ योहान १:७ म्हटले आहे , " जसा देव प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर ,......." देव प्रकाश आहे, आणि जर मी त्या प्रकाशात चालत असलो, तर मी देवाच्या जितका जवळ जातो, तितका प्रकाश अधिकाधिक तेजस्वी होत जातो. याचा अर्थ असा की, माझ्या शरीरात काय वास करते यावर मला अधिकाधिक प्रकाश मिळत जातो. मी माझ्या जीवनातील अधिकाधिक गोष्टीं मृत करत चाललो आहे आणि मी अधिक ज्ञानी होत आहे. अशा प्रकारे येशू ज्ञानाने वाढत गेला: तो 'नवीन आणि जिवंत मार्गावर' चालला. लूक २:५२ मध्ये म्हटले आहे की तो ज्ञानाने वाढत गेला. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने शलमोन येथे (नीतिसूत्रे ४:१८ मध्ये) तेच सांगत आहे.
२ करिंथकर ३:१८ मध्ये म्हटले आहे की पवित्र आत्मा आपल्याला येशूचे गौरव दाखवतो. ते गौरव एक प्रकाश आहे, आणि तो आपल्या जीवनात अधिकाधिक तेजस्वी होत जातो जसे प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत जातो. नीतिसूत्रे ४:१८ हे जुन्या करारातील वचन आहे, जे २ करिंथकर ३:१८ या वचनाशी संबंधित आहे. जर तुम्हाला हे वचन समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला नवीन करारातील संबंधित वचन, २ करिंथकर ३:१८, पाहावे लागेल आणि तिथे तुम्हाला दिसेल, "...गौरवाकडून गौरवाकडे, गौरवाकडे, गौरवाकडे."
पवित्र आत्मा तुम्हाला येशूच्या प्रतिरूपात गौरवाकडून गौरवाकडे बदलत असताना, तुम्हा सर्वांना २०२६ हे वर्ष आशीर्वादाचे ठरो यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो.