WFTW Body: 

बरेच लोक केवळ त्यांच्या पापांची क्षमा झाल्याबद्दल आनंदी असतात फक्त तेवढेच. असे लोक येशूला त्यांचा तारणहार म्हणून ओळखत नाहीत; ते त्याला त्यांच्या पापांची क्षमा करणारा म्हणून ओळखतात.

आपण राग आणि लैंगिक वासनायुक्त विचार या दोन्ही पापांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यांचे केवळ गांभीर्यच कळणार नाही, तर आपण त्यांच्यावर मात कशी करू शकतो हे देखील आपल्याला समजेल. त्यांची गंभीरता या वस्तुस्थितीवरून दिसून येते की येशूने डोंगरावरील प्रवचनात या दोनच पापांचा संबंध माणसाला नरकात नेण्याच्या शक्यतेशी जोडला आहे. माझे निरीक्षण असे आहे की ९९% ख्रिस्ती लोकांना असे वाटत नाही की राग करणे हे खूप गंभीर पाप आहे. त्यांना खरंच असे वाटत नाही की राग त्यांना नरकात नेऊ शकतो. अशाप्रकारे मत्तय ५:२२ मध्ये येशूने जे सांगितले त्यावर ते खरोखर विश्वास ठेवत नाहीत. जर ते येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत तर ते कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती आहेत? त्याने रागाबद्दल जे सांगितले त्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? की तुम्ही मानसशास्त्रज्ञांवर विश्वास ठेवता? मानसशास्त्रज्ञ तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, ९९% ख्रिस्ती लोक असा विश्वास ठेवत नाहीत की एखाद्या स्त्रीकडे कामुक नजरेने पाहणे हे नरकात नेण्याइतके गंभीर पाप आहे. बहुतेक लोक ते अजिबात गांभीर्याने घेत नाहीत, सैतानाने ह्या पापाला इतके सहज आणी कमी महत्वाचे बनवले आहे याचा हा पुरावा आहे.

एड्स किंवा कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराचा विचार करा: एड्स होणे किंवा कर्करोग होणे हे किती लोक सहजतेने घेतील ? असे लोक जे अशा आजारांमुळे काय होऊ शकते याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत फक्त तेच लोक हे आजार सहजतेने घेतील. जर तुम्ही एखाद्या दुर्गम गावातील एखाद्या अशिक्षित, गरीब महिलेला सांगितले की तिला कर्करोग झाला आहे, तर ती अस्वस्थ होणार नाही, कारण तिला कर्करोग काय आहे हे माहित नाही. दुसरीकडे, एका सुशिक्षित व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या शरीरात कर्करोग पसरला आहे तर ती व्यक्ती खूप अस्वस्थ होईल. तो का अस्वस्थ होतो ? कारण तो कर्करोगाचा धोका पाहतो.

त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या अशिक्षित असता, तेव्हा तुम्ही रागाला गंभीर पाप मानत नाही. जेव्हा तुम्ही अध्यात्मिकदृष्ट्या अशिक्षित असता, तेव्हा तुम्ही स्त्रियांकडे कामुक नजरेने पाहणे हे गंभीर पाप मानत नाही. हे तुमच्या आध्यात्मिक अशिक्षिततेचे लक्षण आहे, जसे त्या अशिक्षित महिलेला कर्करोग किती गंभीर आहे हे माहित नसते. त्याचप्रमाणे, आध्यात्मिकदृष्ट्या साक्षर असलेला माणूस ही पाप खूप गांभीर्याने घेईल. हे सांगायला त्याला देवाच्या वचनाची गरज पडणार नाही, कारण त्याला सहजतेने माहित आहे की ही गंभीर पाप आहेत, कारण एक पाप दुसऱ्यांना दुखावते आणि दुसरे स्वतःला दुखावते. म्हणूनच आपण या पापांकडे अधिक काळजीपूर्वक पाहिले पाहिजे आणि आपण त्यावर कशी मात करू शकतो हे आपण विचारले पाहिजे.

मत्तय १ मध्ये देवदूत योसेफाकडे आला तेव्हा त्याने नवीन कराराचे पहिले वचन दिले. मत्तय १:२१ मध्ये म्हटले आहे, “येशू त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल.” येशूच्या नावाचा हा अर्थ आहे. येशूचे नाव घेणाऱ्या अनेक लोकांना त्याच्या नावाचा अर्थ देखील माहित नाही. मत्तय १:२१ आपल्याला सांगते की “येशू” या नावाचा अर्थ असा आहे की “जो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल”.

आपल्या पापांपासून सुटका आणि आपल्या पापांची क्षमा होणे यात काय फरक आहे, कारण ते राग आणि लैंगिक वासनापूर्ण विचारसरणीशी संबंधित आहे?

जर तुम्ही पापी वृत्तीने रागावलात आणि नंतर त्याबद्दल पश्चात्ताप केलात आणि प्रभूला क्षमा मागितलीत तर तो तुम्हाला क्षमा करेल. आणि दुसऱ्या दिवशी , जर तुम्ही पुन्हा पापी वृत्तीने रागावलात आणि प्रभूला क्षमा मागितलीत तर तो तुम्हाला क्षमा करेल. आणि पुढच्या आठवड्यात, जर तुम्ही तेच केले आणि तुम्ही त्याला क्षमा मागितलीत तर तो तुम्हाला क्षमा करेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एखाद्या स्त्रीकडे कामुक नजरेने पहिले आणि तुम्हाला कळले की ते पाप आहे, आणि तुम्ही प्रभूला क्षमा मागितलीत तर तो तुम्हाला क्षमा करेल. आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा ते केले आणि तुम्ही प्रभूला क्षमा मागितलीत तर तो तुम्हाला क्षमा करेल. तुम्ही इंटरनेटवर पोर्नोग्राफी पाहता आणि प्रभूला क्षमा मागता आणि तो तुम्हाला क्षमा करतो.

पण तुम्हाला या पापांपासून सुटका मिळाली आहे का? नाही. तुम्हाला क्षमा मिळाली आहे का? हो. तुमच्या जीवनाची पद्धत पाप करणे, प्रभूला क्षमा मागणे, पुन्हा पाप करणे आणि प्रभूला पुन्हा क्षमा मागणे अशी आहे. हे एक अंतहीन वर्तुळ आहे. तुम्हाला क्षमा झाली आहे का? हो! तुम्ही हजार वेळा पाप केले असेल आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, पण तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका मिळाली आहे का? नाही, कारण तुम्ही ते करत राहता ! ते खड्ड्यातून बाहेर पडण्यासारखे आहे आणि पुन्हा खड्ड्यात पडण्यासारखे आहे; तुम्ही एखाद्याला तुम्हाला बाहेर काढायला सांगता, तो तुम्हाला बाहेर काढतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा खड्ड्यात पडता. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याला तुम्हाला बाहेर काढायला सांगता तेव्हा तुम्ही पुन्हा खड्ड्यात पडता. ते कधी संपणार आहे?

आतापर्यंत येशूने तुमच्यासाठी काय केले आहे? येशूने तुम्हाला क्षमा केली आहे. मग प्रामाणिक राहा आणि म्हणा, "मी येशूला माझ्या पापांची क्षमा करणारा म्हणून ओळखतो, पण मी त्याला माझा तारणारा म्हणून ओळखत नाही. मी त्याला माझ्या पापांची क्षमा करणारा म्हणून ओळखतो, पण माझ्या पापांपासून मला सुटका देणारा म्हणून ओळखत नाही." आपण प्रामाणिक असले पाहिजे. जर आपण स्वतःशी बेईमान असलो, तर बायबल आपल्याला जे वचन देते त्याच्या पूर्णतेत आपण कधीही येऊ शकणार नाही. देव प्रामाणिक लोकांवर प्रेम करतो. मी तुम्हाला देवासमोर प्रामाणिक राहण्यास प्रोत्साहित करतो ,त्याला प्रामाणिकपणे, तुमच्या मनापासून म्हणा , "प्रभु येशू, मी फक्त तुला माझ्या पापांची क्षमा करणारा म्हणून ओळखतो. मी तुला माझा तारणारा म्हणून ओळखत नाही."

एखादी फांदी जर झाडावर नसेल तर ती फळ देऊ शकत नाही आणि प्रत्येक फांदी ५० वर्षे त्या झाडावर राहिल्यानंतरही त्या झाडाला म्हणू शकते की, "तुझ्याशिवाय मी फळ देऊ शकत नाही."; पण जर मी तुझ्यामध्ये असले तर मला फळ देणे फार सोपे आहे." तुम्हाला वाटते का की फांदी फळ देण्यासाठी धडपड करते ? आंब्याच्या झाडाकडे पहा: त्याची फांदी आंबे उत्पन्न करण्यासाठी धडपड करते का? नाही. पण जर तुम्ही त्या झाडाची ती फांदी तोडली, तर जरी ती ५० वर्षांपासून आंबे देत असली तरी, ती लगेच आंबे देणे थांबवते, कारण ती सुकते. जोपर्यंत ती झाडात असते तोपर्यंत झाडाचा रस तिच्यातून वाहतो आणि त्यामुळे आंबे तयार होतात. पापावर मात करण्याचा हाच सिद्धांत आहे आणि प्रत्येक राष्ट्रातील शिष्य असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण हेच शिकवले पाहिजे.

प्रिय मित्रांनो, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की ख्रिस्ताशिवाय तुम्ही कोणत्याही पापावर मात करू शकत नाही. तुम्ही नक्कीच बाह्य पापांवर मात करू शकता. पण हे काय सिद्ध करते? जगात असे असंख्य नास्तिक आहेत जे कोणाचाही खून करत नाहीत आणि शारीरीकरीत्या व्यभिचारही करणार नाहीत. प्याला बाहेरून स्वच्छ राखण्यासाठी, तुम्हाला येशू ख्रिस्ताची गरज नाही; तुम्हाला फक्त एक चांगला परूशी असण्याची गरज आहे. असे अनेक गैर-ख्रिस्ती आहेत, अगदी नास्तिक देखील आहेत जे कधीही फसवणूक करत नाहीत, जे प्रामाणिक आहेत आणि ज्यांचे बाह्य जीवन खूप सरळ आहे; परंतु जेव्हा आतील जीवनाचा विचार केला जातो तेव्हा ते आतून भ्रष्ट असतात. आतून प्रामाणिकपणा आत्म-नियंत्रणापेक्षा जास्त महत्वाचा आहे. तुम्ही योगाच्या शक्तींनी बाहेरून राग व्यक्त करण्यापासून रोखू शकता, परंतु ती सुटका नाही. ते फक्त बाटली घट्ट बंद करण्यासारखे आहे जेणेकरून विष आत राहील; जे तरीही तुमचा नाश करते. ख्रिस्त जी सुटका देतो ती ही सुटका नाही.

ख्रिस्त आतील रागापासून मुक्ती देतो. मी बाटली उघडू शकतो, आणि त्यात कोणतेही विष नाही. जर तुम्ही माझ्या हृदयात पाहिले तर तिथे कोणताही राग नाही; मी फार मोठ्या प्रयत्नाने माझे तोंड बंद ठेवण्याचा आणि रागावरील नियंत्रण न सुटू देण्याचा प्रयत्न करतो असे नाही - ते योगामुळे होते, परंतु ती रागापासून सुटका नाही. रागापासून मुक्तता म्हणजे ख्रिस्त आपल्याला आपल्या हृदयातील रागापासून मुक्त करतो. तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे, आणि जर तुम्ही अशा एका हृदयाच्या आत पाहिले तर तिथे राग नसेल . जर तुम्ही त्या हृदयाच्या आत पाहिले तर तिथे स्त्रियांबद्दलची वासना नसेल . हे फक्त येशूच करू शकतो.