देव अजूनही एखाद्या मंडळीमध्ये कार्य करीत आहे याचे दोन पुरावे असे आहेत की — तो त्यात संपूर्ण मनाने शिष्य होण्याची इच्छा असणाऱ्यांची भर घालतो, आणि ज्यांना प्रभूचे अनुसरण करण्यात रस नाही त्यांना त्या मंडळीतून काढून टाकतो. आपण पवित्रशास्त्रात वाचतो:
"प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे" (त्या दिवसांत, फक्त ज्यांनी शिष्यत्वाचा संदेश स्वीकारला होता त्यांनाच "तारण पावलेले" मानले जात होते) (प्रेषितांची कृत्ये २:४७).
प्रभु म्हणतो, "मी तुझ्या मध्ये असलेले गर्विष्ठ आणि अभिमान धरणाऱ्यास काढून टाकीन, आणि तुझ्यामध्ये नम्र व दीन लोक राहू देईन. देव तुझा परमेश्वर (तेव्हा) तुझ्या ठायी असेल आणि तो तुजविषयी आनंदोत्सव करेल . (सपन्याह ३:८-१७).
आम्ही आमच्या मंडळीत सुरुवातीपासूनच आमच्या स्वर्गीय पित्याला या दोन्ही प्रकारे कार्य करताना पाहिले आहे.
भारतासारख्या देशात, जिथे एक अब्जाहून अधिक लोकसंख्या आहे, तेथे प्रभु येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्याची इच्छा असणाऱ्यांना शोधणे म्हणजे जणू एक लाख गवताच्या ढीगाऱ्यांमध्ये काही सुया शोधण्यासारखे आहे !! आपण आयुष्यभर या गवताच्या ढीगाऱ्यांमध्ये शोधत राहिलो तरीही कदाचित आपल्याला फक्त एक-दोनच सुया सापडतील. पण अधिक कार्यक्षम पद्धत म्हणजे त्या गवताच्या ढीगाऱ्यां समोर अतिशय शक्तिशाली चुंबक ठेवणे. मग त्या चुंबकांमुळे त्या सुया कमी श्रमात गवताच्या ढीगाऱ्यांमधून बाहेर काढता येतील ! संपूर्ण मनापासून शिष्य असलेल्यांना शोधण्यासाठी हे सर्वोत्तम आणि कार्यक्षम साधन आहे — आणि देवालाही ह्याच पद्धतीने ते करायचे आहे. येशू म्हणाला की जेव्हा इतरांना आपले एकमेकांवरचे प्रेम दिसेल तेव्हा ते ओळखतील की आपण त्याचे शिष्य आहोत. (योहान १३:३३-३५). मंडळी म्हणून आपली ही साक्ष इतरांना आपल्याकडे आकर्षित करणारी असावी .
म्हणून आम्हाला आमची मंडळी (आणि प्रभुने आमच्यामार्फत स्थापन केलेल्या सर्व मंडळ्या) अशा चुंबकासारखी हवी होती की, जी भारतातून — आणि इतर ठिकाणांहूनही हजारो गवताच्या ढीगाऱ्यांमध्ये असलेले शिष्य बाहेर काढेल .
प्रभुने आम्हाला शिष्य बनविण्याची (आणि फक्त धर्म परिवर्तन घडविण्याची नव्हे) आज्ञा दिली आहे (मत्तय २८:१८-२०), म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच शिष्यत्वाच्या तीन अटी (लूक १४:२६-३३) — येशूवर सर्वोच्च प्रेम करणे, दररोज स्वतःसाठी मरणे, आणि आपल्याकडे असलेल्या भौतिक वस्तूंशी असलेल्या आसक्तीपासून मुक्त असणे — यांचा प्रचार केला. आम्हाला आमच्या मंडळीमध्ये फक्त अशा लोकांना एकत्र करायचे होते ज्यांना शिष्यत्वाच्या या अटी पूर्ण करण्यात रस होता.
म्हणून आम्ही प्रार्थना केली की प्रभु आमच्या संख्येत अशा लोकांना जोडो ज्यांना असे शिष्य व्हायचे होते. आम्ही कधीही कोणालाही आमच्या मंडळीत सामील होण्यास आमंत्रित केले नाही. लोकांनी स्वतःहून आमच्याबरोबर जोडले जावे अशी आमची इच्छा होती. १९७५ पासून आजवर मी कधीही कोणालाही आमच्या कोणत्याही मंडळीचा सभासद होण्यासाठी बोलावले नाही. आम्ही फक्त त्यांनाच स्वीकारले जे स्वतःहून आमच्याकडे आले. आम्हाला विश्वास होता की प्रभुच आमच्याकडे त्या लोकांना पाठवेल ज्यांचा मेंढपाळ होण्यासाठी व सेवा करण्यासाठी आम्हाला बोलावले आहे. येशू म्हणाला, मंडळीत लोकांची भर घालणारा स्वतः प्रभुच आहे. येशू म्हणाला "पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येतील, आणि जो माझ्याकडे येईल त्याला मी कधीच बाहेर घालवून देणार नाही"(योहान ६:३७). आम्हाला विश्वास होता की पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या शरीरासारखे हे आमच्याबाबतही खरे असेल.
प्रभुने आश्चर्यकारक मार्गांनी आमच्यात शिष्यांची भर घातली. याची काही उदाहरणे ही आहेत.
शेजारच्या एका देशात युद्ध झाले, ज्यामुळे अनेकांना आपले सर्व काही सोडून कुटुंबासह लहान बोटींमधुन पळून जावे लागले. काही बोटी समुद्रात बुडाल्या आणि बरेच लोक बुडून मरण पावले. पण काही जिवंत राहिले आणि भारताच्या किनाऱ्यावर पोचले. भारत सरकारने या निर्वासितांना एका छावणीत ठेवले. आमच्या दोन मंडळ्या त्या छावणीच्या जवळ होत्या. त्यामुळे आमच्या काही भावांनी त्या निर्वासितांना (जे परिवर्तन न झालेले नामधारी ख्रिस्ती होते ) भेट दिली आणि त्यांना सुवार्ता सांगितली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांपैकी बरेच लोक नव्याने जन्मले. मग आमच्या भावांनी त्यांना नियमित भेटायला सुरुवात केली आणि त्यांना मंडळी म्हणून स्थापन केले. साधारण दोन वर्षे बंगलोर आणि इतर ठिकाणी असलेल्या आमच्या अनेक परिषदांना ते हजर राहिले. त्यांची साक्ष देण्याची उत्सुकता इतकी होती की ते परिषदांमध्ये लगेच व्यासपीठावर धावत येत असत आणि धाडसीपणे साक्ष देत असत. ते असताना, आमच्या इतर सदस्यांना क्वचितच साक्ष सांगण्याची संधी मिळत असे !! त्यांच्या या उत्साहामुळे आम्हाला सर्वांनाच आव्हान मिळाले.
एका परिषदेत, “पत्नींनी आपल्या पतीच्या अधीन राहावे जसे मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे”, हे बाईबल ज्या प्रकारे शिकवते या विषयावर बोलल्यानंतर, त्यांच्यापैकी एका नवविवाहित पत्नीने प्रभुजवळ तिला लग्नाच्या सुरुवातीपासूनच पतीच्या अधीन राहण्यासाठी परमेश्वराणे कृपा द्यावी यासाठी तिने रडुन प्रार्थना केली. माझ्या आयुष्यात मी कधीच अशा विनंतीसाठी रडत आणि तळमळून प्रार्थना करणाऱ्या पत्नीबद्दल मी कधी ऐकले नव्हते !!
सुमारे दोन वर्षांनंतर, भारत सरकारने त्यांना त्यांच्या मातृभूमीत परत पाठवायचे ठरवले. पण तेव्हापर्यंत, हे विश्वासणारे विश्वासात दृढ झाले होते आणि ते पुनः परत जाण्याच्या आधी आम्ही त्यांच्यातील तिघांना वडील म्हणून नेमू शकलो. देवाने त्यांच्या भारतात राहण्याच्या वेळेचे अचूक नियोजन केले होते . ते परत गेल्यानंतर काही काळात त्यांच्या देशात पुन्हा युद्ध झाले आणि ते वेगवेगळ्या तीन भागात विखुरले गेले. पण अद्भुतरित्या असे झाले की या तिन्ही गटांपैकी प्रत्येक गटात आम्ही नियुक्त केलेल्या वडिलांपैकी एक होता ! म्हणून ते त्या वडिलांच्या नेतृत्वाखाली तीन मंडळ्या म्हणून काम करू शकले. त्यांच्या साक्षीमुळे तेथेही अनेकजण जोडले गेले. आमच्या भावांपैकी एकाने त्यांना बऱ्याच वेळा भेट दिली, सभा घेतल्या आणि त्यांना प्रोत्साहित केले.
आमच्या आणखी एका भावाने नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एका नवीन ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. येथेही, ख्रिस्ताच्या काळापासून एकही मंडळी नव्हती. त्या भावाच्या साक्षीमुळे तेथे काही लोक शिष्य झाले आणि आज तेथे २००० वर्षांत प्रथमच एक चांगली मंडळी आहे.
पण गेल्या ५० वर्षांत देवाने आमच्यामध्ये केलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे, २००० वर्षात जिथे मंडळ्या नव्हत्या तिथे त्या स्थापन करणे नव्हे, तर अनेक मंडळ्यांचे नेतृत्व करण्यासाठी धार्मिक वडीलजनांना उभे करणे हा आहे. भारतासारख्या देशात - कोणत्याही मोबदल्याशिवाय देवाच्या मेंढरांची सेवा करण्यास आणि त्यांचे पालन करण्यास तयार असलेले आध्यात्मिक वृत्तीचे प्रतिनिधि शोधणे हा एक आश्चर्यकारक चमत्कार आहे - जिथे बहुतेक ख्रिस्ती कामगार पगारदार कामगार आहेत - आणि त्यांचा पैसा प्रामुख्याने परदेशी स्रोतांकडून येतो. पण देवाने आम्हाला असे पुरुष दिले आहेत जे आमच्या मंडळ्यांमध्ये ज्येष्ठ आणि मेंढपाळ म्हणून अनेक दशके विनामूल्य सेवा करत आहेत.आम्ही कोणत्याही ज्येष्ठाला पगार देत नाही म्हणूनच अनेक "व्यवसायीक वृत्ती असलेल्या ख्रिस्ती लोकांपासून" आम्ही सुरक्षित आहोत, जे अन्यथा आमच्यात सामील झाले असते. आज ही समस्या अनेक ख्रिस्ती मंडळ्या आणि संघटनांना भेडसावत आहे.
देशभर पसरलेल्या आमच्या चुंबकांनी गवताच्या ढीगाऱ्यांतून काही बारीक आणि खऱ्या सुया काढल्या आहेत. येणाऱ्या काळात आम्ही आणखी बऱ्याच सुया काढू अशी आशा आहे.
प्रभूची स्तुती असो !