लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल” (मत्तय ५:७). येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवले, “हे आमच्या स्वर्गातील पित्या, ज्याप्रमाणे आम्ही इतरांना आमच्या विरुद्ध केलेल्या पापांसाठी क्षमा करतो त्याचप्रमाणे तू आमच्या पापांची क्षमा कर.” त्या प्रार्थनेचा अर्थ काय? याचा अर्थ, जर मी एखाद्याला त्याने माझ्याविरुद्ध केलेल्या पापांसाठी क्षमा केली नाही, तर प्रभु मला क्षमा करणार नाही. मी देवाला काय प्रार्थना करत आहे, “प्रभु, मी या व्यक्तीला ज्या प्रकारे क्षमा केली आहे त्याच प्रकारे तू मला क्षमा कर.” पण जर मी या व्यक्तीला क्षमा केली नाही, तर मी खरोखरच प्रभूला मला क्षमा करू नको अशी विनंती करत आहे.

तुम्हाला हे समजते का की जेव्हा तुम्ही प्रभूची प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाला अगदी त्याच प्रकारे तुम्हाला क्षमा करण्याची विनंती करत आहात ज्याप्रकारे तुम्ही इतरांना क्षमा केली आहे? जेव्हा तुम्ही दुसऱ्याला क्षमा करण्यास नकार देता , तुम्ही प्रार्थना करत असता, “ज्या प्रकारे मी या व्यक्तीला क्षमा केली आहे त्याच प्रकारे मला क्षमा कर; कारण मी त्याला क्षमा केली नाही, त्यामुळे तु मला क्षमा करू नको.” किंवा, “मी त्याला क्षमा केली आहे पण त्याने माझ्याबरोबर जे केले त्यामुळे मला त्याच्याबद्दल भयंकर राग आहे, म्हणून प्रभू, जेव्हा तू मला क्षमा करतोस तेव्हा तूही माझ्याबद्दल राग ठेव.

जेव्हा जेव्हा लोक आपल्याला कोणत्याही प्रकारे नुकसान करतात किंवा दुखावतात तेव्हा आपल्या मनात दोन परस्परविरोधी विचार येतात.

एक म्हणजे दयेचा विचार आणि दुसरा म्हणजे न्यायाचा विचार. पवित्र आत्मा आपल्याला क्षमा करण्यास आणि दयाळू राहण्यास सांगतो, परंतु आपले शरीर आपल्याला त्या व्यक्तीबरोबर कठोर राहण्यास आणि त्याचा न्याय करण्यास सांगते आणि देवानेही त्याचा न्याय करावा अशी प्रार्थना करण्यास सांगते. परंतु याकोब २:१३ मध्ये म्हटले आहे, “कारण ज्याने इतरांवर दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल.” जर मी एखाद्बरोबर निर्दयी असेल तर देव माझ्याबरोबर निर्दयी असेल. आणि न्यायाच्या दिवशी, आपल्याला एक मोठा आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा देव इतरांना क्षमा न करणाऱ्या विश्वासणाऱ्यांवर खूप मोठा न्याय लादेल - ते देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.

याकोब २:१३ पुढे म्हणते, “दयेने न्यायावर विजय मिळवला पाहिजे.” याचा अर्थ असा की जेव्हा आपल्या मनात एखाद्याचा न्याय करणे किवा त्याच्यावर दया करणे या दोन गोष्टीमध्ये संघर्ष असतो, तेव्हा न्यायाचा नाही तर दयेचा विजय होऊ द्या. देवाच्या माणसाचे हेच लक्षण आहे. दया न्यायावर विजय मिळवते.

रोमकर १२:१९ म्हणते, “सूड उगवू नका ” कारण ते देवाचे काम आहे. देव म्हणतो, “सूड घेणे माझे काम आहे. ते तुझे काम नाही.” “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभु म्हणतो. म्हणून जर तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खायला दे. जर तो तहानलेला असेल तर त्याला काहीतरी प्यायला दे. आपण सूड घेऊ नये. आपण दयाळू असले पाहिजे आणि इतरांचे भले करण्यासाठी शक्य तितके चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. न्यायाच्या दिवशी आपल्याला कळेल की जर आपण इतरांना क्षमा केली नाही तर देव आपल्याला क्षमा करणार नाही. प्रभूच्या प्रार्थनेत येशू हीच सूचना पुन्हा देतो .

“जर तुम्ही इतरांना क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही” (मत्तय ६:१५). येथे “तुमचा स्वर्गीय पिता” हे असे सूचित करते की तो आधीच तुमचा पिता आहे आणि तुम्ही देवाचे मूल आहात. त्याने असे म्हटले नाही की, “देव तुम्हाला क्षमा करणार नाही.” जर त्याने “देव” हा शब्द वापरला असता, तर आपण असे म्हणू शकलो असतो की हे वचन अविश्वासणाऱ्यां लोकांच्या संदर्भात आहे .पण हे लक्षात घ्या की मत्तय ६:१५ मध्ये "तुमचा पिता" असे लिहिले आहे. देव अविश्वासणाऱ्यांचा पिता आहे का ? नाही ! पण जर तुम्ही देवाचे नवीन जन्म झालेले मूल असाल तर देव तुमचा पिता आहे. आणि ते वचन म्हणते "तुमचा पिता तुमचे अपराध क्षमा करणार नाही." का ? कारण तुम्ही दुसऱ्या कोणालातरी क्षमा केली नाही.

जर तुमचे अपराध क्षमा झाले नाहीत, तर तुम्ही जगात देवाच्या राज्यात कसे प्रवेश करू शकता ? तुम्हाला वाटते का की तुमच्या मृत्यूनंतर ते क्षमा होतील ? आपल्या मृत्यूनंतर आपल्याला दुसरी संधी आहे का? जर तुम्ही एखाद्याला क्षमा न करता मरण पावला तर अनंतकाळात तुमचे काय होणार आहे ? तुम्ही नरकात जाल ह्याबाबत माझ्या मनात शंका नाही , कारण पृथ्वीवर पापांची क्षमा न होता कोणीही स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. आपल्या मृत्यूनंतर पापांची क्षमा होण्यासाठी संधी नाही. त्यांची आताच क्षमा झाली पाहिजे आणि म्हणूनच इतरांबरोबर दयाळू असणे खूप महत्वाचे आहे. ते करूण तुम्ही दुसऱ्या कोणावर दया करत नाही. प्रत्यक्षात ती दया तुम्ही स्वतःवर करत आहात, कारण देवाने तुमच्याबरोबर दयाळू असावे असे तुम्हाला वाटते.