लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

१. आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी देवाची एक परिपूर्ण योजना आहे यावर विश्वास ठेवणे :
"आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली."(इफिस २: १०) फार पूर्वी, जेव्हा देवाने ख्रिस्तामध्ये आपली निवड केली, तेव्हा आपण आपल्या पृथ्वीवरील जीवनात काय करावे याविषयीही त्याने योजना आखली. ती योजना शोधणे -दररोज - आणि त्या योजनेचे पालन करणे हे आता आपले कर्तव्य आहे. देवापेक्षा चांगली योजना आपण कधीही बनवू शकत नाही. इतर लोक काय करतात त्याचे आपण अनुकरण करू नये कारण देवाची योजना त्याच्या प्रत्येक मुलासाठी वेगळी आहे. उदाहरणार्थ, योसेफासाठी देवाची योजना होती की, त्याने मिसराच्या राजवाड्यात रहावे आणि आयुष्यातील शेवटची ८० वर्षे सर्व प्रकारच्या सुविधांमध्ये रहावे. दुसरीकडे, मोशेसाठी देवाची योजना अशी होती की त्याने मिसरामधील राजवाडा सोडावा आणि आपल्या आयुष्यातील शेवटची ८० वर्षे - वाळवंटात अत्यंत गैरसोयीत रहावे. जर मोशेने योसेफाच्या उदाहरणाचे अनुकरण केले असते तर, आराम आणि सुविधांविषयीच्या प्रेमामुळे त्याने स्वतःच्या जीवनाबद्दलची देवाची इच्छा गमावली असती. आज अगदी त्याच प्रकारे ,एका भावाने संपूर्ण आयुष्य अमेरिकेत आरामात राहावे आणि कोणी दुसऱ्या भावाने उत्तर भारतातील उष्णता आणि धूळ खात आयुष्यभर कष्ट करावे अशी देवाची इच्छा असू शकते. इतरांशी त्यांना मिळालेल्या वाट्याबद्दल तुलना करण्याऐवजी, त्यांच्याबद्दल ईर्ष्या बाळगण्याऐवजी आणि टीका करण्याऐवजी प्रत्येकाला स्वतःच्या जीवनासाठी केलेल्या योजनेबद्दल खात्री असणे आवश्यक आहे. मला माहित आहे की देवाने मला भारतात त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. परंतु मी कधीही आग्रह धरला नाही की माझ्याप्रमाणेच इतर कोणाचे बोलावणे असावे. जर आपण स्वतःचा सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करीत असू किंवा पैसा, आराम अथवा मनुष्यांच्या मान्यतेवर जर आपले प्रेम असेल तर आपण कधीही देवाची इच्छा शोधू शकणार नाही.

२. देवाला जवळून ओळखणे हे बलवान असण्याचे रहस्य आहे:
"जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील."(दानीएल ११:३२) आज आपण इतरांद्वारे देवाला ओळखावे अशी देवाची इच्छा नाही. तो अगदी सर्वांत लहान विश्वास ठेवणार्‍यालाही त्याला वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी आमंत्रित करतो (इब्री ८: ११). देव आणि येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखणे अशी सार्वकालिक जीवनाची व्याख्या येशूने केली (योहान १७: ३). ही पौलाच्या जीवनातील उत्कट इच्छा होती आणि ती आमचीही उत्कट इच्छा असायला हवी. (फिलिप ३: १०) ज्याला देवाला जवळून जाणून घ्यायचे असेल, त्याने नेहमीच त्याचे ऐकले पाहिजे. येशूने म्हटले की मनुष्याने स्वतःला आत्मिकरित्या जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवाच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ऐकणे (मत्तय ४: ४). त्याने असेही म्हटले की त्याच्या पायाजवळ बसणे आणि त्याचे ऐकणे ही ख्रिस्ती जीवनातील सर्वांत महत्वाची गोष्ट आहे (लूक १०: ४२). दररोज पहाटे येशूला असलेली पित्याचे ऐकण्याची सवय आपण विकसित केली पाहिजे (यशया ५०:४), पूर्ण दिवसभर; आणि जेव्हा आपण झोपी जातो तेव्हादेखील रात्रीच्या वेळी ऐकण्याच्या तयारीने - जेणेकरून जर आपण रात्री झोपेतून उठलो तर आपण म्हणू शकतो, "बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे." (१ शमुवेल ३:१०). देवाची इच्छा जाणून घेतल्यामुळे सर्व परिस्थितींमध्ये आपण विजय मिळवू शकतो - कारण आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक समस्येचे देवाकडे समाधान आहे - आणि जर आम्ही त्याचे ऐकले तर तो उपाय काय आहे ते तो आपल्याला सांगेल.

३.ज्यांचा देवाने स्वीकार केला आहे त्या सर्वांचा स्वीकार करा:
"तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी." (१ करिंथ .१२: १८,२५). देवाने वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी त्याची खरी साक्ष पुनर्स्थापण्यासाठीं पुरुषांना उभे केले. परंतु देवाच्या माणसांच्या मरणानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचे गट अनन्य आणि पंथाला अनुसरणारे बनविले. परंतु ख्रिस्ताचे शरीर कोणत्याही गटापेक्षा मोठे आहे. आणि आपण हे कधीही विसरू नये. ख्रिस्ताची वधू आज पुष्कळ, पुष्कळ गटांमध्ये आढळते. म्हणूनच आपण देवाच्या शब्दाच्या स्पष्टीकरणात मतभेद केल्यामुळे, त्यांच्यापैकी बहुतेकजण एकत्र काम करू शकणार नसतानाही आपण प्रभुने ज्यांना स्वीकारले आहे त्या सर्वांबरोबर सहभागिता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.