लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

यिर्मया 15:16-21 मध्ये आपण तीन अटी बघतो ज्या देवाचा प्रवक्ता होण्याकरिता आहेत.

पहिली अट : 'ट्टला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो'' (यिर्मया 15:16). देवाचे वचन आपल्या अंतःकरणाकरिता आनंद व उल्हास देणारे असावे. उद्योजकाला पैसा कमविण्यात आनंद वाटतो तसा तुम्हाला देवाच्या वचनात आनंद वाटावा. आज अनेकांना प्रचारक होण्यास आवडते. परंतु ते देवाच्या वचनाचा अभ्यास करीत नाहीत व त्यांना देवाचे वचन उल्हास व आनंद देणारे वाटत नाही.

दुसरी अट : ''विनोद करणार्या मंडळीत मी बसलो नाही. मी मजा केली नाही. तुझा हात मजवर पडल्यामुळे मी एकांती बसलो'' (यिर्मया 15:17). जेव्हा यहूदातील इतर लोक एकत्र येऊन मजा करीत होते तेव्हा यिर्मया देवासोबत एकटा होता. जर तुम्ही या जगातील विनोद करणार्या लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवले नाही तर तुम्ही देवाचा प्रवक्ता होऊ शकणार नाही. मी असे म्हणत नाही की चांगले हास्यविनोद वाईट आहेत. परंतु, अनेक ख्रिस्ती लोकांना हास्यविनोदाची सीमा कळत नाही. ते सतत विनोद करीत राहतात. यिर्मयाने अशा लोकांकरिता वेळ दिला नाही.

तिसरी अट : यिर्मयाने अठराव्या वचनामध्ये देवाकडे तक्रार केली, 'ट्टला सतत दुःख का? माझी जखम भारी व असहाय्य का? फसविणारा ओहोळ, आटून जाणारे पाणी, यासारखा तू खरोखर मला होशील काय?'' अविश्वासाच्या बोलांबद्दल देवाने यिर्मयाला दटावले (यिर्मया 15:19). देव आपल्याला खाली पाहण्यास लावत नाही. तो भरवंसा नसलेल्या झर्यासारखा नाही. यिर्मया भावनेंवर विसंबून होता व परिस्थिती बघत होता. प्रभु त्याला म्हणाला, ''तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीनकसापासून मौल्यवान वेगळे करिशील तर तू माझे मुख होशील. ते तुजकडे परत येईल पण तू त्याजकडे जाणार नाहीस.'' याठिकाणी देव यिर्मयाला सांगत आहे की तो देवाकडे वळला तर त्याला निरर्थक गोष्टींची सवय राहणार नाही व तो मौल्यवान, विश्वासाच्या व चांगल्या गोष्टी बोलेल व देवाचा प्रवक्ता होईल.

तुम्हापैकी किती लोकांना देवाचा प्रवक्ता व्हावयाचे आहे? मी त्या प्रवक्त्यांविषयी बोलत नाही जे मृत संदेश देतात ज्यांचा त्यांनी पुस्तकातून अभ्यास केलेला असतो. परंतु मी देवाच्या प्रवक्त्याविषयी सांगत आहे. जर तुम्हाला देवाचा खरा प्रवक्ता व्हावयाचे आहे तर निरर्थक संगतीत वेळ घालवू नका. तर आपला वेळ वाचवून देवाच्या वचनाचा अभ्यास करा. देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला उल्हास मिळो. निरर्थक संभाषण सोडून द्या. विश्वासाचे बोल बोलत राहा. तुमच्या संभाषणात चांगल्या गोष्टी असाव्यात आणि मग प्रभु तुम्हाला त्याचे मुख करील. देव भेदभाव करीत नाही.