WFTW Body: 

ईयोबाच्या कथेत आपण देवाने त्याची मालमत्ता, त्याची मुले आणि त्याचे आरोग्य गमावण्याची परवानगी देऊन त्याला कसे तळाशी आणले हे पाहतो. एका अर्थाने त्याने आपली पत्नी (जिने सतत कटकट केली ) आणि त्याचे तीन चांगले मित्र (ज्यांनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊन त्याच्यावर टीका केली) गमावले. त्याचे मित्र स्वनीतिमान उपदेशक ठरले ज्यांनी "तो तळाशी असताना त्याला लाथ मारण्यात" आनंद घेतला. देवाने त्याच्या दयेने ते संपवेपर्यंत ते त्याला "लाथ" मारत राहिले. या सर्व दबावांच्या दरम्यान, ईयोबाने स्वत:ची बाजू वारंवार मांडली. शेवटी परमेश्वर त्याच्याशी बोलला तेव्हा ईयोबाला त्याच्या स्वनीतिमानतेतील भ्रष्टता दिसली - आणि त्याने पश्चात्ताप केला. तो एक नीतिमान माणूस होता. ते चांगले होते. पण त्याला त्याच्या नीतिमत्वाचा गर्व होता. ते वाईट होते. पण देवाने त्याच्याशी व्यवहार केल्यावर तो एक भग्नहृदयी माणूस होता. त्यानंतर तो फक्त देवातच गौरव पावणार होता. अशा प्रकारे देवाचा ईयोबासाठीचा उद्देश साध्य झाला.

जेव्हा ईयोब मोडला गेला तेव्हा देवाला काय म्हणाला ते लक्षात घ्या, "मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे"(ईयोब ४२:५). त्याने देवाचे मुख पाहिले आणि त्याचे जीवन राखले गेले. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याने धूळ आणि राखेमध्ये पश्चात्ताप केला (वचन ६). त्या चार उपदेशकांना अनेक दिवस उपदेश करूनही जे साध्य करता आले नाही, ते देवाने एका क्षणात आपल्या दयाळूपणाच्या प्रकटीकरणाने ईयोबामध्ये पूर्ण केले. देवाच्या दयाळूपणामुळेच ईयोब मोडला गेला आणि त्याला पश्चात्ताप झाला.

आपल्यापैकी बहुतेकजण सभांमध्ये प्रचारकांकडून देवाबद्दल ऐकतात. आपल्याला देवाशी समोरासमोर भेटण्याची गरज आहे, जिथे आपण त्याच्या आपल्याबद्दलच्या दयाळूपणाकडे पाहतो आणि त्याद्वारे मोडले जातो. पेत्राच्याबाबतीतही असेच घडले. पेत्राने प्रभूला नाकारल्यानंतर आणि कोंबडा दोनदा आरवल्यावर घडलेली पुढची गोष्ट काय होती हे तुम्हाला आठवते का? त्याने प्रभूचे मुख पाहिले. पेत्रही देवाच्या मुखाला (पनिएलाला) सामोरे गेला! आम्ही वाचले की "प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली" (लूक २२:६१). आणि त्याचा परिणाम काय झाला: "पेत्र बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला." (वचन ६२). येशूच्या दया आणि क्षमेच्या त्या नजरेने त्या दणकट मच्छिमाराचे अंतःकरण मोडले. जुन्या करारानुसार देवाने इस्राएलला आरोग्य, संपत्ती आणि अनेक भौतिक आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते. पण एक आशीर्वाद होता जो त्या सर्वांपैकी सर्वात मोठा होता - ज्याचे वर्णन गणना ६:२२ ते २६ मध्ये केले गेले होते. तिथे आम्ही वाचतो की, अहरोनाला लोकांना अशा प्रकारे आशीर्वाद देण्याची आज्ञा देण्यात आली होती: "परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो; परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो."

ही खेदाची गोष्ट नाही का की आज अनेक विश्वासणारे लोक आरोग्य आणि संपत्तीच्या निकृष्ट आशीर्वादाचा (जे अविश्वासी लोकांनाही प्रार्थनेशिवाय मिळतात) आणि भावनिक अनुभवांचा (त्यापैकी बरेच बनावट आहेत) शोध घेतात - त्यांच्या जीवनात पूर्णपणे बदल घडवून आणू शकणाऱ्या सर्वांत मोठ्या आशीर्वादाचा शोध घेण्याऐवजी - देवाशी समोरासमोर भेट घेणे? जरी आपण कधीही श्रीमंत झालो नाही, आणि कधीही बरे झालो नाही, पण परमेश्वराचे मुख पाहिले तर ते आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल.

देवाशी भेट झाली तेव्हा ईयोबाच्या संपूर्ण शरीरावर गळू आले होते, पण त्याने देवाला बरे करण्यास सांगितले नाही. तो म्हणाला, "मी परमेश्वराचे मुख पाहिले आहे आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे." "विवेक" आणि "देवाकडून दृष्टांत" असल्याचा आव आणणाऱ्या तीन उपदेशकांनी ईयोबाला सांगितले होते की त्याच्या आयुष्यातील काही गुप्त पापांमुळे त्याला शिक्षा दिली जात आहे. आज ही असे स्वयंनियुक्त संदेष्टे आहेत, ज्यांच्याकडे खोटे "अशा प्रकारे देव बोलला" संदेश आहेत, जे देवाच्या लोकांना दोषाखाली आणतात. पण त्या तीन उपदेशकांप्रमाणे देवाने ईयोबाला न्यायाची धमकी दिली नाही.

देव ईयोबाशी त्याच्या अपयशाबद्दल बोलला नाही किंवा त्याच्यावर दबाव असताना त्याने (देवाविरुद्ध) केलेल्या तक्रारींची आठवणही देवाने करून दिली नाही. देवाने फक्त ईयोबावर आपली दया प्रकट केली - त्याने माणसाच्या आनंदासाठी तयार केलेल्या सुंदर सृष्टीत आणि त्याने तयार केलेल्या प्राण्यांनी माणसाच्या अधीन राहण्यात दिसणारी त्याची दया. देवाच्या दयाळूपणाच्या त्या प्रकटीकरणामुळेच ईयोबाला पश्चात्ताप झाला. अनेकजण देवाच्या दयाळूपणाचा फायदा घेतात आणि त्याचा गैरवापर करतात. पण त्यामुळे ईयोबाला पश्चात्ताप झाला. आणि मग परमेश्वराने ईयोबाला सुरुवातीला जे काही होते त्याच्या दुप्पट आशीर्वाद दिले.

आपल्याला मोडण्याचा देवाचा अंतिम उद्देश आपल्याला पुरेपूर आशीर्वाद देणे हा आहे - जसे आपण याकोब ५:११ मध्ये वाचतो. देवाने ईयोबासाठी जो उद्देश आपल्या मनात ठेवला होता तो म्हणजे, त्याची स्वनीतिमानता आणि त्याचा गर्व भंग करून त्याला एक मोडलेला माणूस बनवणे - जेणेकरून परमेश्वर त्याला आपले मुख दाखवू शकेल आणि त्याला भरपूर आशीर्वाद देईल. देव आपल्याला जे भौतिक आणि ऐहिक आशीर्वाद देतो, तेसुद्धा आपल्याला त्याच्यापासून दूर नेत आपला नाश करू शकतात, जर आपण त्या सर्वांच्या मागे असलेले त्याचे मुख पाहिले नाही. आज असे कितीतरी विश्वासणारे आहेत, जे भौतिक समृद्धीमुळे देवापासून दूर गेले आहेत.

परमेश्वराच्या मुखाची एक झलक आपल्याला हे जग देऊ शकेल अशा सर्व गोष्टी मिळवण्याच्या तळमळीपासून वाचवू शकते.